तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी
|| आम्ही अधिकारी झालो ||
जसं सगळे चांगले लेखक हे वक्ते असतात असं नाही वा उत्कृष्ट वक्ते हे लेखक असतात असं नाही वा उत्कृष्ट कलाकार हा लेखक असतो असं नाही; तसंच एखादा सरकारी अधिकारी हा लेखक असतोच असं नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत.
या अपवादात्मक मान्यवरांत महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक, दूरदर्शनचे माजी निर्माता श्री देवेंद्र भुजबळ यांचं नाव आवर्जून घ्यावे लागेल.निवृत्तीनंतर त्यांनी राज्याच्या विविध खात्यातील, क्षेत्रातील आपल्याला आलेल्या अनुभवाचा लाभ सर्व स्तरांवरील लोकांना व्हावा अन् नवोदित लेखक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “न्यूज स्टोरी टुडे” हे पोर्टल डिजिटल वर्तमान पत्र सुरू केलं. या संस्थेतर्फे याच नावाने प्रकाशन संस्था सुरू केली आहे. तत्पूर्वी भुजबळ साहेबांनी आठनऊ पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच शासकीय सेवेत असताना व आजही ते अनेकांना लेखनादी मार्गदर्शन करीत असतात नव्हे करीत आहेत, असो..
मा. देवेंद्र भुजबळ यांनी लिखित व संपादित केलेले पुस्तक “आम्ही अधिकारी झालो” नुकतेच प्रकाशित झाले आहे. यात महाराष्ट्रातील सक्षम अशा निवडक पस्तीसेक (३५) महिला तसेच पुरुषांच्या जीवनाचा समग्र आढावा त्यांनी घेतला आहे तर कांहींचे शब्दांकन इतरांनी केले आहे.
प्रख्यात कवयित्री, साहित्यिक, माजी सनदी ज्येष्ठ अधिकारी, कला, साहित्य, संस्कृती, गीत संगीतादी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा असीम ठसा उमटविणाऱ्या कै. सौ. नीला सत्यनारायण यांचे १६ जूलै, २०२० रोजी कोरोनाने निधन झाले. तत्पूवी लेखकाने त्यांची प्रेरणादायी यशोगाथेचे शब्दांकन केले. तसेच एका शासकीय अधिकारी असलेल्या नीलाताईंची माणूसकी याचेही वर्णन “अमीट नीला सत्यनारायण” यात केले आहे.
सुरुवातीला भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत असलेल्या पण नंतर जिल्हाधिकारी झालेल्या श्री.जी.श्रीकांत यांच्या खडतर जीवनाचा मनोज्ञ असा वेध ‘‘तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर’’ या लेखात घेतला आहे.’
“विदर्भ कन्या झाली आयएएस’’, “दोन सख्खे भाऊ झाले आयएएस”, “आईने घडविल्या आयएएस मुली”, “मजुराची मुलगी झाली आयएएस”, “दारू विकणारीचा मुलगा झाला आयएएस”, “फर्गुसन’चे सप्तर्षी”, “दीपस्तंभ’’ “नवरत्न”, “ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर”, “कॅन्टीन बॉय ते जॉईंट सेक्रेटरी” या कथांमधून लेखकाने त्या त्या व्यक्तींच्या व्यक्तीमत्वाचा अनोखा धांडोळा घेतला आहे.
“प्लॅन बी’ने तरलो”, “डेअरी बॉय ते सहविक्रीकर आयुक्त”, “दहावी नापास ते माहिती संचालक”, या आत्मकथनातून सामान्यातल्या सामान्य माणूस सुध्दा महत्वाकांक्षा, उच्च ध्येय बाळगून अपार मेहनत केली की हमखास नशिबाची साथ सुध्दा मिळते याचे ‘जीते जागते’ शब्दांकन यात या व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत.
चपरासी म्हणून कार्यरत असलेल्या एका माणसाच्या जिद्दीची कथा, “वॉर्डबॉय ते पशुसंवर्धन अधिकारी” या लेखात चितारलेली आहे.
एखाद्या शारीरिक व्यंग विशेषतः अंध व्यक्तीच्या समग्र जीवनाचा आढावा “दृष्टीहिन झाली बॅंक अधिकारी”, “भिकारी झाला अधिकारी’‘, यातही विविध स्तरांवरील उपेक्षित अशा व्यक्तींच्या जीवनावर यथार्थ प्रकाश झोत टाकला आहे. अनाथ, पोरकी असलेल्या एका अभागी मुलीच्या जिद्दीची कहाणी, “मी पोलीस अधिकारी झाले”, तसेच “सेल्स गर्ल ते माहिती अधिकारी” या कथेतही एका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यशाची यशोगाथा कथन केली आहे.
“आनंदी पापाजी” यात एका सरदारजीची अनोखी कथा सांगताना लेखकाने एकूण शीख, पंजाबी लोकांची मानसिकता, शारीरिक क्षमता, बेडर वृत्ती यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात कसे अग्रेसर असतात यात बहारदार वर्णन केले आहे.
“बिच्छु टेकडी ते दिल्ली” या कथेत प्रा.डाॅ.नरेशचंद्र काठोळे यांनी केलेले वर्णन वाचनीय झाले आहे. ‘आयआयटी’, ’आयएएम’ असो, सनदी, रिझर्व्ह बँकेच्या तसेच स्टेट बँके परीक्षा, शासनाच्या विविध स्पर्धा विशेषतः पोलीस, सैन्य दलातील परीक्षा असो त्या अत्यंत कठीण, सर्वंकष कस लावणा-या असतात. विशेषत: पोलीस आणि संरक्षण दलातील नोकरीसाठी उच्च शैक्षणिक पात्रते बरोबरच शारीरिक क्षमतेची सुध्दा कसोटी लागते.या सर्व कसोट्या पार करून एक “ग्रामकन्या ते आयपीएस” कशी होते याचे ‘ऑंखो देखा’ वर्णन लेखकाने या लेखात केला आहे.
आशा दळवी लिखित “शुभम आयपीएस झालाच” ही कथा सुद्धा खरोखरच अभिमानास्पद अशी आहे. सेना दलातील लेफ्टनंट कर्नल झालेल्या महेंद्र सासवडे यांची कहाणी “असे घडले लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे”, “सून झाली फौजदार, मग झाली तहसिलदार” , “नौसैनिक ते समाजसेवक”, “खेळता खेळता अधिकारी” , “पोरकी पोर झाली अधिकारी” यांच्या जीवनाभुवाबरोबर त्यांच्या संघर्ष, जिद्द, चिकाटी या मुळेच या सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कशी केली हे मोजक्या नेमक्या शब्दात लेखिका सौ. रश्मी हेडे यांनी शब्दांकित केले आहे.
शासकीय नोकरीत वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले मा. देवेंद्रजी यांनी आपल्या साहित्य सेवेचा घेतलेला वसा नेटाने जपला नव्हे त्यांचे संवर्धनही केले ही बाब कौतुकास्पद आहे. आजवर त्यांच्या समर्थ लेखणीतून कसदार, सकस, दर्जेदार अशा साहित्यांचा मागोवा घेतल्यास त्यांच्या साहित्य खात्यात आजवर आठ एक पुस्तकं, संपादित दहा पुस्तकं, शिवाय त्यांनी आधुनिक काळाशी सुसंगत असे पोर्टल “न्यूज स्टोरी टुडे” द्वारा सेवा साहित्य शारदाच्या प्रांगणात रुजू केली आहे.
ब्लबवर (पुस्तकाचे शेवटचे पान) गजल सम्राट कवीवर्य सुरेश भट यांचे काव्य छापले आहे.त्यातील एक ओळ खाली देत आहे. यामुळे या पुस्तकाच्या अंतरंगातील यथार्थ कल्पना सृजन वाचकांना येईल यात शंका नाही.
“विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…!”
समर्पक, आकर्षक मुखपृष्ठ, सुंदर छपाई ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. सर्वानी विशेषतः तरुणांना हे पुस्तक प्रोत्साहनात्मक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
“आम्ही अधिकारी झालो”
लेखक-संपादक : देवेंद्र भुजबळ.
पृष्ठं १४६, मूल्य रुपये ३००/-
न्यूज स्टोरी टुडे,प्रकाशिका सौ.अलका भुजबळ
मोबाईल:०९८६९४ ८४८००.
ईमेल: alka.bhujbal1964@gmail.com