रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आजच्या चेऊल या निसर्गरम्य छोटेखानी गावाला विश्वास बसणार नाही एव्हढा प्राचीन इतिहास आहे. त्याचे धागेदोरे महाभारतापर्यत जातात. चंपावतीचा संबध तिथेच येतो. मध्ययुगात एक महत्त्वपूर्ण नगरी म्हणून चेऊलची प्रसिद्धी परदेशातही झाली होती.
महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांनी हवे तेव्हढे कोकणातील इतिहासाकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. मात्र मुंबई पुराभिलेख विभागात या नगरीविषयी अस्सल कागदपत्रांचा खजिनाच आहे. भारतातील महत्त्वपूर्ण अतिप्राचीन चेऊलचा थोडक्यात धावता परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
चेऊलचे संदर्भ परकिय ऐतिहासिक साधनामधून हजारो वर्षांपासून मिळतात. अष्टागारांतील एक प्रमुख आकर्षण अशासाठी कि, सागर किनार्यावर शांतपणे ताडामाडाच्या, सुपारी पोफळीच्या झावल्यात विसावलेला, बागेतून पहाटेपासून रहाटगाडग्यांचे मधुर संगीत, फळाफुलांची येणारी सुगंधित झुळूक आणि प्रसन्न चित्ताने स्वागत करणारी टुमदार देखणी घरे, वर्षांच्या बारामास आल्हाददायक वातावरण !
अशा ह्या नगरीच्या खाणाखुणा महाभारतापर्यत जातात त्यांचे पुरावेही अजून शाबूत आहेत. ज्योतिर्भास्कर शं बा दिक्षित आणि कररूपाने छत्रे यांची ही कर्मभूमी. रघुनाथ पंडीत व मराठीतील सुप्रसिद्ध मयुरेश कवीही येथेच.
देवगिरीच्या यादवांनी येथे राज्य केले. साहजिकच हिंदुच्या सांस्कृतिक व संस्कृतीचे जतन होऊन काही शेष अवशेष कायम राहीले. पोर्तुगीज पाद्री डाॅ.चून् हा या नगरी विषयी लिहितोय “या शहरात तीनशेहून अधिक मंदिरे होती. तितक्यात पुष्करिणी होत्या. सोळा पाडाव्यात विभागलेल्या या नगरीत 1,60,000 टुमदार इमारती, अनेक उद्याने, सुंदर तटबंदी होती. या शहराचा परिघ बारा मैलांचा असून रेवदंडा, थोडक्यात मळा, नवेदरपेठ ही उपनगरे होती आणि
“तमालतालविनराजीनीला” अशा चेऊलची ग्रामदैवत चंपावती होती”.
या नगरीने अनेक धर्माची संस्कृती पाहिली, अनेक पंथाना आश्रय दिला. तिची किर्ती तत्कालीन ज्ञात असलेल्या जगाला होती. येथे हिंदु होतेच त्याचबरोबर यहुदी, पारशी, बुध्दधर्मीय, मुसलमान, पोर्तुगीज, टोपीकर इत्यादींने व्यापारानिमीत्त वा अन्य कारणाने वास्तव्य केले. यातील काहीनी सत्ता गाजविली. अनेक नामवंत यांनी भेटी दिल्या, अनेकांनी तिचा इतिहास डायरीतून लिहीला.

चेऊलच्या च त्यावेळेस असलेल्या निर्सगदत्त बंदराने येथील व्यापारांनी उच्चांक गाठला होता. एक महत्वाची बाजारपेठ म्हणून तिची गणना होती. 1470 मध्ये बहामनी सत्ता असताना नागरी खात्यात नोकरी करणारा रशियन नागरिक निखीतीनने लिहून ठेवले आहे कि, या नगरीत धनधान्य समृद्धी आहे. नारळ, सुपारीच्या बागा विपुल आहेत, लोक कष्टाळू असून फक्त किमान एक वस्त्र असते. त्यांच्या डोक्यावर काहीही नसते हे काटक, मेहनती असतात. सुंदर पलंग, खुर्ची, व पेंटींग करण्यात तरबेज असतात.
येथे तुतीची झाडे भरपूर असून त्यापासून पीतांबर उत्तम बनवितात. येथे तयार झालेले सिल्क कापडाची निर्यात रशिया, चीन मध्ये होत असते”.
निखीतीन एव्हढ्यावरच न थांबता पुढे लिहीतो “येथील अष्टागारांतील आगरी समाज जमिनीसाठी, कोळीसमाज मत्स्याकरता आणि भंडारी, आभाळात टेकलेल्या वृक्षापासून मद्य काढण्यासाठी काटकसरीने झगडतात. या त्यांच्या नोंदीनुसार इतिहासाबरोबर तत्कालीन समाज जीवनाचे चित्रच उभे राहाते.
पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवप्रभुनी या निसर्गरम्य नगरीला 1674 पुर्वी स्वराज्यात समाविष्ट केले. इंग्रज दूत आझ्वेडन हेनरीने रायगडावर जाणेपुर्वी येथे भेट दिली होती. त्याने या शहराचे सुंदर चित्रण करून ठेवले आहे. तो लिहितोय “पोर्तुगीजांनी आपली फॅक्टरी सुरू केल्यानंतर येथे रोमन धर्तीवर चर्च मिशनरी लोकांकरिता बांधला होता”. डॉक्टर चेरी स्टोव्हन याने फंड जमा करून “मरसी हाऊस” सुरू केले होते व तेथे लॅटिन, तर्कशास्त्र, खगोल शास्त्र, पोर्तुगीज व्याकरण, संगीत आणि ख्रिश्चन धर्माची तत्वे शिकविली जात होती. आजही त्यातील इमारती रेवदंड्याच्या कोटात इतिहासाची साक्ष देत आहेत.
थोडक्यात संस्कृती, व्यापार, विद्या याची प्रगतीची भरभराट झाली होती. येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती चेऊल चंपावतीचे अधिष्ठान होते धर्माचे ! या बाबत ही नगरी अग्रेसर होती. पेशव्यांच्या अंगभूत असलेल्या व स्वसामर्थाने सागरी पराक्रम गाजवणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या नगरीवर आतोनात प्रेम केले. त्यांनी अनेक मंदिराची निर्मीती केली. त्यांत रामेश्वर नांव सर्वांची झाले. तेथील अग्नीकुंड, वायुकुंड व पर्जन्य कुंडामुळे त्याची ख्याती देशभरात झाली होती.

कोकणातील लहरी पावसाने अवकृपा केली कि, ही कुंडे शास्त्रोक्त पूजा करून उघडली जात. शितलादेवी आणि आंग्रे यांच्यातील भक्तिभाव प्रसिद्धच आहे त्यानी दिलेल्या दांपत्याच्या नोंदी साक्षीदार आहेत.
सरखेल आंग्रेंची सत्ता मावळत गेली आणि या नगरीचे दिमाखात इतिहास जमा झाला. परंतु आजही चेऊल पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.
चेऊलचे आल्हाददायक वातावरण, हिरवीगार वनराई, तिचे सौंदर्य अनेकांची मने प्रसन्न करतात. चेऊलचे पर्वतराजीतील स्वयंभू दत्त मंदिर हा येथील लाखो लोकांचा श्रद्धास्थान आहे. या मंदिरावरील चेऊलचे विलोभनीय दर्शन म्हणजे” हिरवीगार अग्रेसर गालिचा ” भासतो.

– लेखन : डॉ. भास्कर धाटावकर,
निवृत्त पुराभिलेख संचालक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.