मा. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केलेले मौलिक विचार त्यांच्याच शब्दात सांगायचे तर “शिकण्याने निर्मिती क्षमता येते, निर्मिती क्षमतेने विचारशीलता प्रकट होते, विचाराशिलतेने ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हांला महान बनवते . रचनात्मक + साहस + धर्मभाव + वाचन = ज्ञान !” ज्ञान प्राप्त झालं की माणुस विचारवंत होतो.
हे आठवायचं निमित्त म्हणजे जंजिरे मुरुडचे सार्वजनिक वाचनालय. रायगड जिल्हातील सर्वात जुनं असं, स्थापना १८८२ सालची, यंदा १४२ वर्ष पुर्ण झालेलं. या जुन्या वाचनालयावर लेख लिहावा म्हणून खास मी मुरूडला भेट दिली.
तिथे गेल्यावर वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संजय भायदे या हरहुन्नरी माणसाबरोबर काही तास चर्चा केली, त्यांनी उत्साहानं छान माहिती सांगितली. हे सुंदर वाचनालय पाहून मन समाधानानं भरून पावलं.
अर्बन व रुरल बोर्डाची निर्मिती जंजिऱ्यात 1887 – 88 या वर्षात झाली .त्याच वर्षी मुरूड व श्रीवर्धन येथे नगरपालीका स्थापन झाल्या. तत्पुर्वीच म्हणजे सन १८८२ सालात मुरूडला “नेटीव जनरल लायब्ररी” या नांवाने वाचनालय सुरू झाले. १८७० सालातच मुरूड गावांत जंजिरे संस्थानची पहिली शाळा सुरू झाली, तशा काही खासगी शाळा होत्या. जंजिऱ्याचे नबाब सर सिद्दी अहमदखान हे प्रगतीचे शिल्पकार समजले जातात. राजकोट येथील कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं, इंग्रजी भाषेबरोबरच त्यांना उर्दू, मराठी, पर्शियन व गुजराथी भाषांचे चांगलेच ज्ञान होते. बडोद्याचे महाराज सन्माननीय सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, ग्वाल्हेरचे संस्थानिक महादजी शिंदे हे या नबाबांचे मित्र होते. शिक्षणाची कास अन ज्ञानाची आस असलेल्या या समकालीन मित्रांमुळे शाळा, वाचनालये यांची स्थापना त्या जुन्या काळात करून प्रागतिक विचारांचा पायंडा घातला. त्या वेळच्या मुरूड तहसीलची वस्ती आताच्या मानाने फारच कमी होती अन वाचनालयाची स्थापना होणं हे बडोद्याचे महाराज व कोल्हापूरचे महाराज यांच्या विचारांचा पगडा नबाब साहेबांवर होता म्हणून या प्रगतीच्या घटना घडल्या असं वाटतं.
एकशे छत्तीस वर्षापुर्वी बांधलेली वेगळ्याच घाटणीची वाचनालयाची वास्तु एकपाखी असुन अत्यंत देखणी रचना असलेली आहे अन या वास्तुचे जतन ही तितक्याच आत्मियतेने, काळजीपुर्वक मुरूडकरवासीयांनी केलं आहे हे पाहून समाधान वाटते. फोटोच्या एका स्नॅपमधे या वास्तुला कॅच करणे हे खरंच अवघड काम आहे. कसाही फोटो घेतला तरी पुर्ण ईमारत फोटोत उतरतच नाही. जुन्या काळच्या छोटया चपट्या वीटांचं बांधकाम लाल रंगाचे, अन तितकेच आखीव रेखीव सांधे भरलेले पांढऱ्या रंगाचे. आतील सागवानी लाकडाचे लाकूड काम, संबंध वास्तुला फिरवलेली पान पट्टी, नीट नेटकी रचना सप्तकोनी अशी सुंदर वास्तु डोळयात भरण्यासारखीच आहे. तीन वर्षापुर्वी या इमारतीला आतुन बाहेरून सिमेंट प्लास्टरचे काम करून पुढील शंभर वर्ष टिकावी याची दक्षता घेतली आहे. १८८२ सालात इतकी सुंदर आकर्षक रचना करणारा सौंदर्य दृष्टीचा रचनाकार कोण होता, हे जरी मला कळले नाही तरी त्याची दूरदृष्टी आपल्या नजरेत भरणारी अशीच आहे.
या वास्तुच्या छपराचे पोटमांडवळ, आढे, लग, वासे यांची रचना ही तितकीच नजरेत भरणारी सुबक अशीच आहे. या इमारतीला कौलाची शाकारणी असून ब्रिटीश कालीन HAND – RAND कंपनीची हाताचा लोगो असलेली कौले वापरली आहेत. मुरूडमधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मार्गावर ही दिमाखदार वास्तु दिमाखात उभी आहे, अन त्याच्याच बाजूला शंभर वर्ष जुनी असलेली नगरपालिकेची शाळा क्र. दोन जुन्या घाटणीची देखणी ईमारत अजूनही ज्ञानभांडार संपन्नतेने वाटण्याचे काम अविरत करत आहे.
१८८२ सालात नेटीव जनरल लायब्ररी या नांवाने सुरू झालेल्या या लायब्ररीचे “सार्वजनिक वाचनालय” मुरूड असे नामकरण १९७४ साली झाले आहे. फारच थोड्या वाचनालयांमधे अद्ययावत सी सी टी व्ही कॅमेरांची व्यवस्था असते अन ती तशी सोय या वाचनालयाने केली आहे. सतत वीजेचा खेळखंडोबा असणाऱ्या मुरूड या गावात वाचकांची गैरसोय होऊ नये म्हणून या वाचनालयानी इन्व्हर्टरची सुविधाही ठेवली आहे, यातून अधुनिकतेचा स्विकार अध्यक्ष, कार्यकारी मंडळी करतात हे खरंच कौतुकास्पद आहे.
या वाचनालयाच्या स्थापनेसाठी मराठीचे सुप्रसिध्द टीकाकार बाळकृष्ण वसंत भिडे, श्री . बा . जोशी, कवीवर्य दत्तात्रय दामोदर पेंडसे अशा साहित्यप्रेमी मान्यवरांचा पुढाकार असेलचे कळले. सन १८८२ पासुन सुरू झालेल्या या वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नामदार बी. जी. खेर यांच्या हस्ते झाला. महर्षी कर्वे, सरोजिनी नायडू, रँगलर परांजपे अशा थोर साहित्यिक मंडळीनी वाचनालयाला भेट दिली आहे, मराठी साहित्य विश्वातील विश्वास पाटील, मधू मंगेश कर्णिक, गिरीजा कीर (त्या वाचनालयाच्या सभासद ही होत्या) अशा मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १९६३ साली या वाचनालयाला भेट दिली आहे , असा आनंदमय सोहळा क्वचितच अनुभवण्यास मिळत असेल तो मुरूडच्या वाचक प्रेमींना लाभला, या वाचनालयाला लाभला! मा डॉ . बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे शिल्पकार यांच्या पदस्पर्शाने हे वाचनालय पावन झाले आहे. हे ही एक भाग्यच आहे.
या वाचनालयाला शासनाचा “अ” दर्जा प्राप्त झाला असुन शासनाकडुन दिला जाणारा वाचनालयाच्या शिरपेचात दिमाखदार डौलणारा तुरा म्हणजे उत्कृष्ठ ग्रंथालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सन २००० मधे मिळाला आहे. बोहरी समाजाचे मा. दाऊद बोहरी यांनी १९१४ साली सिल्व्हर जुबिली गिफ्ट म्हणून एक मोठा आकर्षक, देखणा आरसा भेट दिला आहे अन तो अजूनही एकशे नऊ वर्षांनी सुध्दा चांगल्या अवस्थेत आहे. सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचे ऑईल पेंट केलेले सरस्वतीचे मूळ चित्र वाचनालयात जतन करून ठेवले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जपत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोप पावत असलेली संस्कृती, कलागुणांना त्या त्या कार्यक्रमांचे संयोजन करून त्या पुन्हां उजागर करणेचे काम प्रयत्नपुर्वक सुरू असते यात लेझीम, भजने, बाल्याचे नाच, तलवारबाजी, दांडपट्टा इत्यादी प्रकार असतात. गुढी पाडव्याला प्रतिवर्षी वाचनालय ते मुख्य बाजारपेठ व परत वाचनालय अशी वाजत गाजत ग्रंथ दिंडी काढली जाते, नवरात्रीच्या कालावधी मधे शारदोत्सव साजरा करणेची परंपरा या वाचनाल्याची आहे. यामधे माहिला भजन, कथाकथन, चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन, सामान्य ज्ञान बुध्यांक स्पर्धा (विवाहीत जोडप्यांसाठी), बुद्धीबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा, एक पात्री अभिनय स्पर्धा असे नानाविविध उपक्रम सुरू असतात.
विद्यमान अध्यक्ष मा. उदय सबनिस यांच्या पुढाकाराने दिवाळी पहाट संगीत मैफल हा कार्यक्रम सुरू केला आहे. वाचनालयाच्या सभागृहामधे मुरूडकर संगीत प्रेमी उत्साहाने उपस्थित असतात . मार्गदर्शन शिबीरे, आरोग्य शिबीरे असे समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. वाचन संस्कृती जपणे बरोबरच अशी इतर विविधोपयोगी कार्यक्रम वाचनालयाच्या माध्यमातून केले जातात अन मुरूडकर आनंदाने सहभागी होतात ही अभिमानास्पद बाब आहे असं मला वाटतं.
सध्याचे जग हे मोबाइल अन इंटरनेटचे, किंवा टी व्ही वरच्या उत्पादनांच्या गिरिणीतून मालीकांचे पीठ पाडणारे असले तरी वाचनांतून मिळणारा जो अत्युच्च आनंद असतो तसा मिळत नाही उलट बऱ्याच वेळा रटाळ कंटाळवाणे कार्यक्रम वाटणीस येत असतात. आपल्याला खास आवडणाऱ्या लेखकांची खास शैलीतली निवडक पुस्तकं वाचण्याचा निर्भेळ आनंद मनाला वेगळच सुख देऊन जातो. अत्यंत आवडीचं पुस्तक आपल्या संग्रही असलं तर ते पुन्हा पुन्हा केंव्हाही वाचता येतं, अशी अनेक पुस्तके मी माझ्या घराच्या इवल्याशा वाचनालयात ठेवली आहेत अन अनेक लेखकांची पुस्तके कविता संग्रह, प्रवासवर्णनं, कथा, कादंबऱ्या मनांत कोरून ठेवल्या आहेत. गप्पा मारताना त्या अनुषंगिक दाखले देता आले तर स्वतःला आनंद होतो व समोरचा समाधानी. वेगवेगळ्या लेखकांशी मैत्री असली की रोज नवीन विषयावर चर्चा करायला मिळते. पुण्याचे जेष्ठ साहित्यकार श्री. सूर्यकांत वैद्य यांचे जवळ गप्पा मारतांना वेगळीच सुखावह अनुभुती मिळते. आम्हां दोघांच्या वयाच्या अंतराचा विचार सुद्धा कधीच अडचणीचा ठरत नाही. उलट निखळ, नितळ आनंददायक गप्पा होतात. हे वाचनामुळेच घडते, आपलं वाचन दांडग असेल तर आपणही छान कविता, लेख लिहू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून जागते रहो सारखं वाचते रहो असं आनंदाने सांगेन. त्यांच्या त्यांच्या समर्थ लेखणीतून अजरामर झालेले कवी , लेखक अनेक आहेत. साने गुरुजींचे साहीत्य कितीही जुने असले तरी आज ही पुन्हा पुन्हा वाचावे असे प्रेरणादायी आहेच, तेव्हा वाचनाची आवड जरूर असायला हवी.
मुरूडच्या वाचनालयामधे विविध प्रकरची ग्रंथसंपदा उपलब्ध असून ३०००० पेक्षा जास्त पुस्तके, ग्रंथ, कविता संग्रह, कादंबऱ्या, संदर्भ ग्रंथ, इत्यादी अमुल्य साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहे. महिला विभाग, बाल विभाग, वाचन कक्ष, कार्यालय, संदर्भ सेवा दालन असे अनेक विभाग या वाचनालयात आहेत. अध्यक्षांच्या दिमाखदार केबीन प्रमाणे ग्रंथपालाचीही स्वतंत्र केबीन सुबक आटोपशीर आहे . वाचनालयाला दरवर्षी रु. तीन लाख चौऱ्यांशी हजार सरकारी अनुदान मिळते, त्या व्यतीरिक्त वाचनालयाच्याच आवारात भाडे तत्वावर ए टी एम, बैंक, छोटे व्यावसायिक यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे वर्षाला सुमारे चार लाखाचे जादा उत्पन्न मिळते. जागेचा किती व्यवहार्य उपयोग केला आहे ना या वाचनालयाने ? अन ही संकल्पना मा. उदय भास्कर सबनिस यांची आहे हे त्यांच्या जवळ बोलताना कळले. केवळ अनुदान व सभासद वर्गणी यावर वाचनालयाचा उत्कर्ष करणे शक्यच नव्हते. अशी कल्पक माणसं संस्थेला लाभली तर संस्थेचा उत्कर्ष होणारच यात शंका नाहीच !
वाचनालयावर लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी मूरूडला गेलो होतो, दुसरे दिवशी सकाळी जंजिरा संस्थानचे त्या काळचे मुजूमदार असलेल्या आवजी हरी चित्रे यांच्या वाड्याची त्या काळात असणारी जागा मुरूडचे श्री रविंद्र पोतनीस यांच्या मदतीने मी शोधली, त्या जागेवर नतमस्तक झालो, तिथल्या मातीची एक चिमटी उचलून भाळी लावली डोळ्यातुन आसवे ओघळली. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याचे चिटणीस “बाळाजी आवजी चिटणीस” हे मजूमदार आवजी हरी चित्रे यांचे सुपुत्र होत. भारावलेल्या मनाने तिथे उपस्थित काही मंडळीना मुजूमदारांवर कपटाने ओढवलेला मृत्युचा प्रसंग, त्यांच्या कुटुंबाची झालेली विटंबना, अन बाळाजी आवजी स्वराज्याचे चिटणीस कसे झाले याची कथा सांगणेचे भाग्य आवजी हरी चित्रे यांच्या पावित्र स्थानावर मला लाभले. मी धन्य झालो कृतकृत्य झालो. लेखक कै. शांताराम कर्णीक यांनी लिहीलेले “वज्रनिष्ठा” हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे, वाचकांनी आवर्जुन वाचावे असेच !
वाचनालयाच्या उर्जितावस्थेसाठी अनेक योजना मनांत असलेचे विद्यमान अध्यक्ष उदय सबनीस यांनी सांगितले. वाचनालयाच्या आवारात नारळाच्या झाडांखाली छोटे उद्यान तयार करून रसिक वाचक प्रेमींना निसर्ग सुख अनुभवत निवांत वाचन करता यावं याची योजना ग्रंथपाल संजय भायदे यांच्या मनी आहे. उदय सबनीस व संजय भायदे यांना वाचनालयाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा दिल्या, शुभं भवतु ।
जंजिरे संस्थानच्या त्या काळातल्या अनेक इतिहास खुणा अजुनही जतन केल्या आहेत मात्र माझ्या या भेटीमधे मला त्या खुणावत असुन सुध्दा पहाण्याचा योग आला नाही ही खंत मनांत ठेऊन मी मुरूड वाचनालयाचा अन नव्याने ओळख झालेल्या पोतनीस, सबनीस, नागले, चिटणीस या मित्रांचा निरोप घेतला. असो पुन्हां केव्हा तरी !
— लेखन : सुनिल चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800