Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यऐसा गा मी ब्रह्म

ऐसा गा मी ब्रह्म

मुंबईतील चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर १५ ऑक्टोबर १९२६ रोजी रस्त्याच्या कडेला नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्याच्या भोवती बघ्यांची खुप गर्दी जमली होती. काही कुत्री गर्दी कमी होण्याची व बाळाचा ताबा घेण्याची वाट पहात होती.

नुकतीच गिरणी कामगारांची शिफ्ट बदलल्या मुळे कामावर जाणाऱ्यांची व येणाऱ्यांची गर्दी वाढत होती. थंडीमुळे व भूक लागल्या मुळे बाळाचे रडणे थांबत नव्हते. तितक्यात गंगाराम सुर्वे हा गिरणी कामगार गर्दीतून वाट काढत बाळापर्यन्त पोहोचला. त्यांना पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाची दया आली. त्याने त्याला उचलले आणि छाती जवळ घेताच बाळ रडायचे थांबले.

गंगाराम सुर्वे त्याला घरी घेउन आले. त्यांची पत्नी काशीबाई हया सुध्दा गिरणी कामगार होत्या. गंगाराम सुर्वे यांनी ते बाळ काशीबाई यांच्या ताब्यात दिले व सर्व हकिगत सांगितली. त्यांना बाळाची दया आली. त्यांना दहा वर्षाची मुलगी होती. त्यांची परिस्थिती बेताचीच होती तरीसुद्धा दोघांनीही बाळाला सांभाळायचे ठरवले. त्यांनी बाळाचे नांव नारायण असे ठेवले. हे बाळ म्हणजेच ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे होत.

बालपण
आई वडिलांनी नारायणला माहीम येथील मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळेत दखल केले. नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता पास झाले. त्याच वर्षी गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी मुंबई सोडून कोकणात गावी जायचे ठरवले. जातांना त्यांनी नारायणच्या हातावर दहा रुपये ठेवले व आता तु काय करायचे ते ठरव, असे संगितले.

दहा वर्षाच्या नारायणाला शाळा सोडणे भाग पडले. त्यांनी कोणाकडे घरगडी, तर कोणाची मुले संभाळायचं काम करण्यास सुरवात केली. हॉटेलमधे भांडी घासण्याची कामे करण्यास सुरवात केली त्यामुळे खाण्याची सोय झाली. दुकाने बंद झाली की त्यांच्या पायरीवर झोपण्यास सुरवात केली.

संसार
नारायण सुर्वे ज्या परिसरात रहात होते त्याच परिसरात आई, वडील नसल्यामुळे मामाकडे राहणाऱ्या कृष्णा साळुंके या युवतीवर त्यांचे मन जडले. १९४८ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यावेळेस त्यांना रहाण्यासाठी जागा सुध्दा नव्हती. मित्रांच्या मदतीने त्यांनी खार जवळ एका झोपडीत संसार थाटला. त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत शिपायाची नोकरी मिळाली. त्यांच्या संसार वेलीवर चार फुले उमलली. रवींद्र व श्रीरंग ही दोन मुले, कल्पना आणि कविता या दोन मुली झाल्या. १९६१ मध्ये ते शिपायाचे शिक्षक झाले.

कवी नारायण सुर्वे
नारायण सुर्वे यांना कविता लेखनाचा छंद लागला. १९५८ मध्ये त्यांची पहिली कविता “नवयुग” मासिकात प्रकाशित झाली. १९६२ साली “ऐसा गा मी ब्रम्ह” हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीरनामा, पुन्हा एकदा कविता, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रकाशित झाले. उर्दू साहित्यिक कृष्णचंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे यांनी केलेला अनुवाद १९६६ साली “तीन गुंड आणि सात कथा” या नावाने प्रसिध्द झाला. ‘दादर पुलाकडील मुले’ ही त्यांची अनुवादित कादंबरी १९७५ साली प्रकाशित झाली.

सुर्वे यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद “ऑन द पेव्हमेंटस ऑफ लाईफ” या नावाने १९७३ साली प्रकाशित झाला. त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. १९६४ साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना जाहीर कवी संमेलनात कविता वाचनाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना प्रत्येक संमेलनात कविता वाचनाची संधी मिळू लागली. अनेक साहित्य संस्था तर्फे त्यांना खास निमंत्रित कवी, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येऊ लागले. त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होऊ लागले, त्यांच्या मुलाखती घेण्यात येऊ लागल्या.

त्यांनी अनेक कविता लिहिल्या परंतु ‘मास्तर तुमचं च नांव लिहा ‘ , असं पत्रात लिवा, मर्ढेकर, सर कर एकेक गड, मनीऑर्डर, मुंबईची लावणी, गिरणीची लावणी इत्यादी कविता अतिशय लोकप्रिय झाल्या. प्रत्येक कवी संमेलनात रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना यांपैकी काही कविता म्हणाव्या लागत. रेडिओ, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होऊ लागले . त्यांची लोकप्रियता वाढू लागली .

मान सन्मान
१९९५ साली परभणी येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली . १९९८ साली नारायण सुर्वे यांना केंद्र सरकार तर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते “पद्मश्री” पुरस्कार प्रदान करण्यात आला . त्यांना अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले . त्यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे १९९२ पासून कामगार साहित्य संमेलन सुरू झाले .

शेवट
२००५ च्या सुमारास त्यांनी अंधेरी येथील घर विकून रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे राहण्यास सुरवात केली. १६ ऑगस्ट २०१० रोजी अल्पशा आजाराने त्यांचे ठाणे येथील रुग्णालयात निधन झाले .

नारायण सुर्वे आपल्यात नसले तरी साहित्य रूपाने अजरामर झाले . मराठी साहित्य क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला . ते कोणत्या स्त्रीच्या पोटी जन्मले हे माहीत नसल्याने त्यांची जात, धर्म, मातृभाषा कोणती होती हे शेवटपर्यंत माहिती झाले नाही . गंगाराम सुर्वे आणि काशीबाई सुर्वे यांनी त्यांचे पालन पोषण केले त्यामुळेच मराठी भाषेत एक नवा प्रवाह निर्माण करणारे कवी नारायण सुर्वे उदयास आले .

सर्व साहित्य रसिकांतर्फे नारायण सुर्वे आणि त्यांचे पालन करणारे गंगाराम सुर्वे, काशीबाई सुर्वे यांना सादर प्रणाम .

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सर्वांना सुपरिचित, सुप्रसिद्ध कवी पद्मश्री नारायण सुर्वे
    यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या जीवन प्रवासाचा अल्प परीचय, या लेखातून होतो.संघर्ष मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.याचा प्रत्येय येतो. लेखक व संपादक यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments