संध्याकाळची यांची ऑफिसवरून यायची वेळ… जवळजवळ सर्वे कामे आवरून दरवाज्याची बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला. माझ्या हातात पाण्याचा ग्लास होता. आत येता येता यांच्या हातात मोबाईल होता. आणि आल्या आल्या अगदी सोप्यावर बसले फोन मध्ये कसला तरी मेसेज वाचत वाचत त्यांनी बोलायला सुरुवात केली, “काय करावे आजच्या तरुण वर्गाला, “बघ किती चांगला संसार होता. दोघे नवरा बायको चांगल्या नोकरीला, एक दहा वर्षाचा मुलगा आणि एक तीन वर्षाचा, वर्षाची कमाई पण खूप चांगली… तरी देखील ऑनलाईन गेम मध्ये स्वतःच्या संसाराची वाट लावली” म्हणजे झाला का कर्जबाजारी…? असं मी पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत बोलतच होते तेवढ्यातच “अगं नाही,,आत्महत्या करून घेतली…” काय…? माझ्या हातातून एकदम पाण्याचा ग्लास खाली पडला आणि त्या आवाजाने अभ्यास करत असलेली मुले देखील एकदम हॉलमध्ये आली.
“काय झाले पप्पा…?” असे म्हणत मोठ्या मुलाने विचारले. मुलांच्या समोर यांनी परत ती बातमी जशीची तशी वाचून दाखवल्यावर मुलांनी देखील आपल्या आपल्या पद्धतीने बरेच विचार मांडले जसे की,, पप्पा हे इतके वाईट असून देखील आज मोठी मोठी सेलिब्रिटी ऑनलाईन गेम ची इतकी जाहिरात का करतात आणि शेवटी मग सूचना पण देतात की सावधान याची सवय पण लागू शकते”… खरंच खूप वाईट झाले असे आपले विचार मांडत मांडत ते आपल्या अभ्यासाच्या खोलीत निघून गेली… आजच्या बातमीने खरे तर सुरुवातीला अगदी सुन्न झालेले माझे विचार हळूहळू वर्तमानापेक्षा भूतकाळात जाऊ लागली यामागे कारण ही तसेच होते…
माझी जवळची मैत्रीण जया ओळख व्हायला जरी एक दोन वर्ष झाले होते तरीही आमचे दोन्ही कुटुंब इतके एकत्र झाले होते की आम्हाला आम्ही वेगळे आहोत हे कधी वाटतच नसेल कोणतीही गोष्ट असो गाव सोडून बाहेर राहत असल्यामुळे आम्ही दोघी अगदी एकमेकीला शेअर करायचो मग ते घरातील कोणताही आनंदाचा क्षण असो अथवा अडचणीचा तसे तर अडचण कशाचीच नव्हती कारण रमेश हा जयाचा नवरा यांच्यापेक्षा एक-दोन वर्ष ज्युनियर असला तरी एकाच ऑफिसला आणि जवळजवळ दोघांचा पगार देखील एकसारखाच असल्यामुळे शक्यतोवर कसल्याच गोष्टीची कमतरता नव्हती… आणि त्यातून जयाच्या घरी पूर्ण बागायती अशी वीस पंचवीस एकर शेत ज्याची संपूर्ण देखरेख रमेश चा लहान भाऊ आणि अगदी कष्टाने सर्वकाही उभे केलेले आई-वडील पहायचे…
घरी सर्व सुख सोयी उपलब्ध असल्यामुळे रमेश एकही पैसा घरी देत नाही हे जयाला माहित होते त्यामुळे ती देखील रमेशला कधीच पगाराचा हिशोब विचारत नसे तिला हे देखील माहिती होते की भविष्यात मुलांचे शिक्षण आणि स्वतःचे घर घेण्यासाठी रमेश चे वडील शेतीचा आलेला पैसा रमेशच्या अकाउंटला पाठवून ठेवायचे. हे सर्व सांगत असताना जयाच्या चेहऱ्यावर नेहमी एक वेगळाच आनंद असत.. तिचा आनंद पाहिला की मलाही खूप आनंद व्हायचा.. सर्व काही अगदी व्यवस्थित सुरू होते.
एकाच ऑफिसला सोबत असल्यामुळे रमेश आणि यांची दररोज जेवणाची वेळ एकच असल्यामुळे दुपारी दोघे सोबतच जेवत त्यानंतर मध्यंतरी दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातून गावाकडे काही काम या दोन्ही कारणांनी यांनी देखील पंधरा दिवसाची सुट्टी काढली आणि आम्ही गावाकडे जाऊन आलो.. गावाकडून आल्यावर कामाचा व्याप असल्यामुळे जयासी सुरुवातीचे दोन-चार दिवस मला काही जास्त बोलता आले नाही.. त्यानंतर मग मुलांची शाळा सुरू झाली आणि परत यांचा ऑफिस यामध्ये मग परत आमच्या दोघींचे बोलणे सुरू झाले “रमेशने सुट्टी घेतली नाही त्यामुळे आम्हाला दिवाळी येथे साजरी करावी लागली” असे जयाकडून कळाले.. सुट्टीनंतर ऑफिसचा यांचा पहिला दिवस नेहमी घरी आल्यावर दिवसभरच्या गोष्टींवर ती चर्चा सहज व्हायची.. त्यात यांनी आज दुपारी “रमेश माझ्यासोबत न जेवता, पूर्ण वेळ त्याच्या फोन मध्येच व्यस्त होता..” मी त्याला जयाने डबा दिला नाही का बनवून असेही विचारले तर त्याने काही उत्तर दिले नाही, तुझं जया सोबत बोलणं झालं आहे का..? असे यांनी विचारल्यावर, मी हो म्हटले आणि आज तिने डबा ही बनवून दिला असे देखील सांगितले..
मग पुढील एक आठवडा असाच निघून गेला त्यानंतर यांनी कधी ऑफिसचा विषय काढला नाही आणि मीही विचारले नाही पण एक दिवस ऑफिस मधून आल्या आल्या यांनी बोलायला सुरुवात केली की,, “सारखा फोन मध्ये, व्यस्त जेवणाकडे लक्ष नाही, यापर्यंत तर रमेश बद्दल काही वाटले नाही पण अचानक तो आज नोकरी सोडायची गोष्ट करत होता आणि त्यातून मला देखील असल्या छोट्याशा नोकरीसाठी दिवसभर टाइमपास करायचा, बॉसचे ऐकून घ्यायचे, वेळेवर ऑफिसला, या वेळेवर ऑफिस मधून जा, त्यातून पगार इतका कमी,,जीवनात काहीतरी मोठे मिळवायचे असेल तर असली नोकरी सोडावीच लागणार..” असे बोलत बोलत त्याने नोकरी सोडायची म्हणून अर्ज देखील लिहिला” किती मुश्किलीने मी आज त्याच्याकडून अर्ज थांबवून घेतला.
त्यांना मधातच थांबवत मी बोलू लागले काय रमेश नोकरी सोडतोय…? मी अचानक स्तब्ध झाले कारण जयाने तर काहीच बोलले नाही मला की रमेश नोकरी सोडायचा विचार करत आहे म्हणून.. ” अगं मी पण त्याला तेच विचारलं की तू नोकरी सोडत आहे हे, जयाला आणि तुझ्या घरच्यांना माहित आहे का…? तर तो म्हणाला की “मी माझा मालक आहे त्यांना कशाला विचारायचे..? याचा अर्थ ही गोष्ट रमेशने जयाला सांगितलेली नसावी म्हणून मी मनाशी विचार केला की आपण एकदा जयाशी याबद्दल बोलूया… सगळं काही मनमोकळेपणाने बोलणारी जया देखील माझ्यापासून काहीतरी लपवत आहे हे तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले… त्यामुळे मी जास्त खोलवर न जाता कदाचित हा यांच्या दोघांचाही विचार असावा. त्यामुळे आपण मध्ये न पडलेलेच बरे असे विचार करत मी तिथून निघून आले…
यांनी बरेच समजावल्यावर देखील रमेशने नोकरी सोडायचा अर्ज जमा करून दिला आणि दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जायचे बंद,, ऑफिसलाच पूर्वी जसे आमच्याकडे यायचे, बोलायचे ते सुद्धा बंद वॉकिंग करताना टेरेसवर फिरताना अगदी कोणाशी बोलताना सुद्धा रमेश च्या हातात सारखा मोबाईल असायचा आणि घरात असताना संपूर्ण वेळ लॅपटॉप वर त्यांचे बिझनेस सुरू आहे असे जया सांगायची सुरुवातीला एखादे ऑनलाईन बिझनेस रमेश करत असावा आणि त्यातून खूप जास्त कमाई रमेश जी होत असेल त्यामुळे कदाचित त्याने आपली नोकरी सोडली असावी असा आमचा दोघांचाही समज झाला होता. त्यामुळे आम्हीही जास्त प्रश्न करत नव्हतो.
पण एक दिवस अचानक रमेशच्या वडिलांचा फोन यांच्याकडे आला. कारण शहरात सगळ्यात जवळचा मित्र म्हटला तर हेच आहेत. हे रमेशच्या वडिलांना देखील माहिती होते… “किती दिवस झाले रमेश फोन उचलत नाही काय झाले ? सगळं व्यवस्थित आहे ना…! जयादेखील फोनवर बोलत नाही आणि गावाकडे पण आले नाहीत ते किती दिवस झाले…”
आणि हो त्यांच्या नवीन घराबद्दल देखील मागे तो बोलला होता. मी पैसे पण पाठवले आहे.. त्याच्या सांगण्यावरून शेत देखील गहाण ठेवावे लागले. खूप मोठा बंगला घेतला आहे का रमेशने ? फोटो पण पाठवले नाही …त्याच्या आईची तब्येत व्यवस्थित नाही त्यामुळे मला येणे शक्य नाही. पण तुम्ही पाठवाल फोटो मला ?” असे सांगून त्याच्या वडिलांनी फोन ठेवला… हे काहीतरी बोलणार होते पण फोन कट झाल्यामुळे आणि त्यांना स्वतः काहीच माहित नसल्यामुळे ते काही बोलू शकले नाही आणि परत फोन लावण्याची हिंमत पण झाली नाही रविवारचा दिवस असल्यामुळे हे सर्व मी ऐकत होते.
काय..? कधी…? कोठे..? रमेशने बंगला घेतला आणि आपल्याला माहित पण नाही असे कसे शक्य.. माझ्या मनात एकाच वेळी तिन्ही प्रश्न उभे राहिले आणि असेच प्रश्न यांच्या समोर देखील उभे राहिले होते. त्यामुळेच कदाचित ते देखील अगदी स्तब्ध झाले होते. पूर्वीसारखे रमेश आणि जया यांचे बोलणे बंद झाल्यामुळे आता सरळ त्यांच्या घरीही जाता येत नव्हते पण त्यांची मुले मात्र आमच्या मुलांसोबत खेळायला नेहमी घरी येत असल्यामुळे थोडेफार का असेना मुलांकडून काही माहिती मिळवता येते का याचा आम्ही दोघेही प्रयत्न करत होतो… पहिली अगदी आनंदी राहणारी ही मुले देखील आता बावरल्यासारखी झाली होती.. रमेश आणि जया यांची मोठी मुलगी सीमा चौथी मध्ये शिकत होती आणि छोटा मुलगा प्रतीक पहिल्या वर्गाला तो लहान होता पण सीमा मात्र थोडीशी मोठी असल्यामुळे घरातला बदल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता,, लहानपणापासून शाळेतून आले दोघेही बहीण भाऊ नेहमी माझ्याकडे यायचे…
आज रविवार असल्यामुळे सकाळपासूनच दोघे खेळायला आली होती मी सहज सीमाला जवळ घेत विचारले की का ग मम्मी काय करतेय.? नाश्ता झाला का तुझा..? तर तिने नकारार्थी मान हलवली आणि मम्मी अजून झोपलेलीच आहे. मी माझे आणि प्रतीकचे आवरून खेळायला आले असे ती बोलत होती… का गं…! मम्मी ची तब्येत ठीक नाही का…? पप्पा काय करत आहे असे विचारल्यावर सीमा रडवलेल्या चेहऱ्याने बोलू लागली की,, “काकू, काकू रात्री मम्मी आणि पप्पा खूप भांडत होते… पप्पा जोराने मम्मी वर ओरडत होते की, मी माझ्या वडिलांकडून पैसे मागवले आहे,, तू पण तुझ्या वडिलांकडून पैसे घेण्यासाठी फोन कर,, नाहीतर मग तुझे दागिने दे.. असे पप्पा मम्मी वर ओरडत होते” “काकू दागिने काय असते…? पप्पा मम्मीला कशासाठी पैसे मागत असतील..? जाऊ दे मला काही खायला दे ना..!” असं बोलत सगळं विसरण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत मी त्या दोघा बहिण भावांना दूध बिस्किट दिली त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की रात्री देखील यांनी काही खाल्लेले नसावे थोड्या वेळानंतर दोघे बहिण भाऊ दूध बिस्किट खाऊन काकू आम्ही नंतर येतो म्हणून घरी निघून गेले….
माझे मात्र कोणत्याच कामात लक्ष लागेना… कारण एक तर त्यात निरागस मुलांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता आणि त्यातून जया आणि रमेश यांना नेमकं तुमचं काय सुरू आहे हे विचारण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती… असेच विचार गोंधळात सुरू असताना अचानक रमेश च्या घरातून जया आणि मुलांचा ओरडण्याचा आवाज येत होता… सुट्टी असल्यामुळे सगळेजण घरीच होते आणि हे देखील त्यामुळे आम्ही सर्व धावत त्यांच्या घरी गेलो.. तर रमेशने आत मधून बेडरूमची कडी लावून घेतलेली होती… बाहेरून “मी बाबांना फोन करून पैसे मागवते, हवे तर माझे सर्व दागिने घेऊन जा, पण तुम्ही काही करू नका प्लीज दरवाजा उघडा, मुले पण जोरजोराने बाबा दार उघडा ना…! दार उघडा ना! “अशी ओरडत होती.
डोळ्यासमोर आपण एखादा चित्रपटाचा भाग पाहत आहोत की काय असे वाटत असतानाच मी अचानक भानावर आले आणि तोपर्यंत सगळ्या माणसांनी मिळून रमेशच्या खोलीचा दरवाजा तोडला होता आणि रमेश ला ॲम्बुलन्स मध्ये टाकले जात होते.
सगळं इतकं फास्ट झालं होतं की,, काही लक्षात येण्याअगोदरच ॲम्बुलन्स दवाखान्यात पण पोहोचली शेजारच्या आजीकडे जया आणि आमच्या मुलांना सोपवून मी आणि हे आम्ही जयासोबत रमेश ला हॉस्पिटल ला घेऊन पोहोचलो होतो… डॉक्टरांनी रमेश ला ऍडमिट करून घेतले त्यानंतर बराच वेळ कोणीच कोणाशी काही न बोलल्यावर… “बरे झाले तुम्ही लवकर हॉस्पिटलला पोहोचला नाही तर विष संपूर्ण शरीरात पोहोचले असते आणि जीवही गेला असता” हे डॉक्टरचे हे वाक्य ऐकले आणि जया जोरजोऱ्याने रडायला लागली… आणि रडताना तिच्या तोंडातून निघणारे शब्द स्पष्टपणे सांगत होते की, “मला नव्हते माहित ऑनलाइन खेळामुळे आपले आयुष्य असे उध्वस्त होईल” आणि ती जोर जोराने रडत होती.
खूप प्रयत्नानंतर तिला शांत केल्यावर, अचानक आत्महत्येचा प्रयत्न ..? ही बातमी पोलिसापर्यंत पोहोचल्यामुळे पोलीस देखील तेथे झाली होती… रमेश शुद्धीवर यायला अजून वेळ होता त्यामुळे पोलिसांनी जयाची चौकशी करायला सुरुवात केली अशावेळी तिच्यासोबत कोणाचे तरी असणे गरजेचे होते… त्यामुळे मी तिच्यासोबतच होते सुरुवातीला छंद म्हणून आणि पैसे चांगले येत आहे म्हणून खेळायला सुरुवात केलेले ऑनलाईन खेळ आणि त्यानंतर सगळा हारलेला पैसा शेवटी आलेले नैराश्य त्यातून होणारे रोजचे भांडण आणि मग आत्महत्येचा प्रयत्न… अशी जयाची एकूण कहाणी ऐकल्यावर माझी पायाखालची जमीनच सरकली..
चौकशी संपेपर्यंत जया आणि रमेशचे आई वडील देखील दवाखान्यात पोहोचले होते आणि रमेश देखील शुद्धीवर आला होता. त्यांच्यासमोर रमेश चे सत्य उघडले होते. पण म्हणतात ना…! शेवटी आई-वडील ते आई-वडीलच असतात… मोठ्या मनाने रमेश चे वडील बोलत होते की,,”शेवटी गेलेला पैसा परत तर येणार नव्हता. मात्र कष्ट केले तर आयुष्यात पैसा हा कधीही कमावता येईल, मात्र तुझ्या जाण्याने तुझ्या बायको आणि मुलांची काय परिस्थिती झाली असती याच्या विचार केला होता का ..? आणि आमचा तर मुळीच नाही. म्हातारपणी तुमचा आधार नाही दिलास तरी चालेल,, पण निदान असल्या चुका करून तुमच्या जाण्याचे दुःख तरी आमच्या वाट्याला देऊ नका” असे बोलत बोलत रमेश च्या वडिलांचे डोळे पाणावले होते…
ऑनलाइन खेळाच्या जाळ्यामध्ये रमेश पूर्णपणे अडकला होता, त्याच्यावर कर्ज देखील झाला होता. शेवटी जयाचे कुटुंब हे बऱ्यापैकी असल्यामुळे, त्यांनी सगळी कर्ज परतफेड केली. त्यानंतर रमेश यांनी आपल्या आई-वडिलांची व तसेच जयाच्या आई-वडिलांची माफी मागून परत असली चूक नाही करणार… म्हणत आपला गुन्हा कबूल केला. कुटुंबातील एक सदस्य असून देखील आपल्यापासून सगळे काही लपवले त्याबद्दल जया आणि रमेश यांनी, यांची आणि माझी ही माफी मागितल्यावर आमचे कुटुंब पूर्वीसारखेच एक झाले. त्यानंतर ऑफिसमध्ये रमेशच्या नोकरी करिता परत विनंती केल्यावर रमेश आणि जया यांचा संसार पुन्हा एकदा एका नव्या अनुभवाला सोबत घेत नव्याने सुरू झाला होता…
हे सर्व विचार करत करत रात्रीचे कधी एक वाजले लक्षातच नाही आले कारण कालची ऑनलाइन खेळामुळे घडलेली घटना आणि त्यात उध्वस्त झालेले कुटुंब त्यांचे आई-वडील मुले हे डोळ्यासमोरून काही केल्या जात नव्हते….
शेवटी एकच सांगावेसे वाटेल की,, असे कोणतेही खेळ खेळू नका ज्यामुळे तुमच्यावर तुम्हाला तुमचा जीव देण्याची वेळ यावी. कारण तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचा जीव तर जाईलच मात्र तुमच्या नंतर तुमची जवळची अनेक माणसं जिवंत असून देखील मरतील … म्हणूनच शेवटी सांगावेसे वाटते आहे की,,ऑनलाईन खेळाच्या मायाजाळात आज पर्यंत कोणीही श्रीमंत झाले नाहीत. म्हणून ह्या खेळामध्ये ह्या मायाजाळात स्वतःचा जीव, वेळ अडकून कर्जबाजारी होण्याचा निर्णय घेऊ नका ही एकच विनंती…

— लेखन : पूनम सुलाने-सिंगल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ऑनलाईन खेळापासून दूर रहाण्याचा संदेश सुरेख