महाराष्ट्रात दरवर्षी शिवजयंती जोषात साजरी होत असतेच. पण यंदा ती दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया या देशातही ४ मार्च रोजी छान साजरी झाली.
या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन जग भरातील मराठी माणसे, तिथे शिवजयंती साजरी करू लागतील, अशी अपेक्षा आहे.
आपल्या पोर्टल च्या लेखिका, एकपात्री कलाकार या सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. तेथील शिवजयंती उत्सवाचा त्यांनी आपल्या पोर्टल साठी लिहिलेला हा विशेष वृत्तान्त.
इतक्या थाटात शिवजयंती साजरी केल्या बद्दल आणि मराठी चा डंका तिथे वाजवल्या बद्दल सिडनी वासी मराठी बंधु भगिनींचे मन:पूर्वक अभिनंदन
– संपादक
सिडनी येथील लिवर पूल मधील विटलाम सेंटरमध्ये मी प्रवेश केला आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हा शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम आपण पाहणार आहोत !
लिवरपूल मधील विटलाम सेंटर मध्ये मराठी लोकांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. स्टॉल्स उभारले जात होते. लघु उद्योजकांनाही पर्वणीच होती. कार्यकर्ते पांढऱ्या शुभ्र पोशाखात, फेटे बांधून प्रत्येक कामाची दखल घेत होते. स्टेज डेकोरेशन होत होते. नृत्याची पथके सजून धजून येत होती.
दुपारी १२ वाजता ‘शिवगर्जना’ हे प्रसिद्ध ढोल पथक आले आणि तालमीची तयारी करू लागले. रंगीत रंगीत जरीच्या साड्या, दागिने, नथ घातलेल्या अशा मराठी स्त्रिया लगबग करीत मिरवणुकीत सामील होण्यासाठी येत होत्या.
विटलाम सेंटरचे प्रांगण उत्साही स्त्री पुरुषांनी गजबजून गेले. स्त्रियांच्या नाजूक कमरांवर ढोल चढविले गेले आणि शिवगर्जनांचे ढोल पथक गर्जना करीत दुमदुमू लागले. कोणी झेंडे हातावर नाचवत होते, त्यांना स्त्रियांनी लेझीम ने साथ दिली. छनन छनन लेझीम घुमवत स्त्रियांनी गोल केला होता. इतरांनी आपले कॅमेरे सरसावले.
ढोल पथकाचा कार्यक्रम रंगात आलेला असताना प्रमुख पाहुणे लेखक, कलाकार प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे येऊन सहभागी झाल्या.
त्यांनीही ताल धरला आणि कार्यक्रमाला अधिकच रंग चढला. प्रवीण तरडे आता फेसबुक वर लाईव्ह होऊन सांगत होते”. ‘सह्याद्री सिडनी’ ने आयोजित केलेला हा सिडनी मधील शिवजयंती उत्सव भारताबाहेरील सर्वात मोठा शिवजयंती उत्सव असेल. दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी अनेक महिने तयारी सुरू आहे.”
माननीय प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी मिरवणुकीत सामील झाल्या शिवाजी आणि जिजाऊ ची वेशभूषा केलेले कलाकार ही सामील झाले. पालखीत शिवाजीची मूर्ती ठेवण्यात आली. आणि ढोल ताशा सह मिरवणूक सभागृहाच्या दारात आली.
शिवगर्जनेच्या आवाजाने सभागृह भरून गेले. या सर्व प्रकारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व त्या सभागृहात जाणवू लागले होते. एका बाजूला शिवाजी महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन लावले होते.
कार्यक्रमाला सुरुवात झाली ती मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने, आणि त्या नंतर सादर झालेल्या भारताच्या राष्ट्रगीताने. ऑस्ट्रेलियाचे ही राष्ट्रगीत चिमखड्यांनी सादर केले ते ऐकून आश्चर्याला परावर राहिला नाही. टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी दाद दिली.
एकूण सतराशे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. एव्हाना फेसबुक वरून जगात ही बातमी पसरलीच होती. भारतातून अनेक मोठ्या लोकांचे संदेश या शिवजयंती उत्सवासाठी येऊ लागले.
एका मागोमाग एक सादर झालेल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे सांगता येईल की शिवाजी महाराजांचा तो काळ आठवणीत ठेवून अनेक कार्यक्रमांचे आयोजन पोशाखासहित केले होते. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन देणारे अनेक कार्यक्रम सादर झाले. सुंदर संगीत आणि उत्तम नृत्ये यामुळे कार्यक्रमा अधिकच रंगत आली होती.
मध्यंतरात लोक बाहेर जाऊन चहा पिऊन आले. बाहेर स्टॉल्स लावायला परवानगी दिली होती. बाकी दागिन्यांचे कलेक्शन, पुस्तकांचे कलेक्शन तर मराठी खाद्यपदार्थ यांचेही स्टॉल्स होते.
कार्यक्रम दुपारी दोन ते रात्री आठ साडेआठ पर्यंत सुरूच होता. चार-पाच वर्षाच्या मुलांपासून ते पन्नास वर्षाच्या माणसांपर्यंत अनेक प्रकारचे कलाकार कार्यक्रमात होते.
स्त्रियांचा जोगवा लोकांना इतका आवडला की त्यांना परत परत करावा लागला.
भरत नाट्यम चे शिक्षण घेतलेल्या मुलींनी अप्रतिम नृत्य केले. सर्व कार्यक्रमांना परंपरेचे आणि इतिहासाचे मोल होते.
यावेळी केलेल्या भाषणात स्नेहल तरडे म्हणाल्या, “एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही आणि ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज मी आहे, तो आहे आणि हा आहे. म्हणजेच मराठी माणसाचे अस्तित्व आहे. अशा त्या आपल्या शिवछत्रपतींना मानाचा मुजरा”.
माननीय प्रवीण तरडे यांनी शिवजयंती उत्सवाच्या आयोजनाबद्दल ‘सह्याद्री सिडनी ‘च्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
श्री प्रवीण तरडे व सौ स्नेहल तरडे यांच्याहस्ते सर्व स्पॉन्सर्स चा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतातून सिडनीमध्ये आलेली अभिनेत्री, लेखिका म्हणून माझाही सौ स्नेहल तरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व मराठी माणसांचे एकत्र जेवण सेंटरच्या प्रांगणातच आयोजित केले होते. अन्नपूर्णा टीमने पहाटेपासून मेहनत करून अतिशय सुग्रास असे जेवण सर्वांसाठी बनवले होते. सर्व मराठी माणसे एकमेकांशी गप्पा मारत पदार्थांचा आस्वाद घेत होती.
माझ्या दृष्टीने या उत्सवाची फलश्रुती म्हणजे,
ऑस्ट्रेलियातील मराठी माणूस एकत्र आला. शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना कळला. अनेक कलाकारांना संगीतकारांना, नाट्य कलावंतांना, नृत्य प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना व्यासपीठ मिळाले. स्त्रियांनाही त्यांचे कलागुण दाखवता आले आणि मराठीचा अभिमान जागृत झाला, ही होय.
– लेखन : मेघना साने. ह. मु.ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
संपूर्ण लेख वाचताना सर्व दृष्यं डोळ्यासमोर उभी राहिली….. मेघनाताई अप्रतिम लेख 👌👌
स्नेहाताई अभिमानाने उर अगदी भरून आला ,तूम्ही वर्णनही खूप उत्कृष्ठ केले ,फोटोतील कलाकरांच्या ,सर्वांच्या चेहऱ्यावरील आंनदच खूप काही सांगून जातोय .जय शिवाजी -जय जिजाऊ.जय महाराष्ट्र -भारत माता की जय . ॲास्ट्रेलियातील मराठी माणसांचा खूप खूप अभिमान वाटला .🙏🙏
शिवजयंती आस्टेलिया वाह वाह क्या बात न्यूज चॅनलची टीम साठी अभिनंदन मनापासून