एकेकाळी रेडिओ आणि रेडिओवर लागणारी मराठी गाणी म्हणजे मराठी माणसाचं मनोरंजनाचं हक्काचं साधन होतं. अवीट गोडीची मराठी-हिंदी गाणी आपला जीव रमवत असत. कामामुळे थकलेल्या जीवाला या गाण्यांमुळे पुन्हा चैतन्य प्राप्त होत असे, हुरूप येत असे. आपल्या ह्रदयात जागा केलेल्या अशाच काही मराठी गाण्यांबद्दल 🎶🎵📻”ओठावरचं गाणं” 📻🎶🎵 या सदरातून कवी श्री विकास भावे आपल्याशी संवाद साधणार आहे.
तर रसिकहो, आजचं गाणं आहे कविवर्य पी. सावळाराम यांचं. गाण्याचे शब्द आहेत “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का”….

जनकवी पी सावळाराम यांनी “अपुरे माझे स्वप्न राहिले”, “असावे घर ते अपुले छान”, “कोकिळ कुहुकुहू बोले”, “जिथे सागरा धरणी मिळते”, ” धागा धागा अखंड विणू या” अशी असंख्य गाणी दिली. यापैकी बहुतेक गाण्यांना संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीत दिलं असून लता आणि आशा या जोडगोळीने ती रसिकांच्या हृदयात अजरामर केली आहेत. आज मी “गंगा यमुना डोळ्यात उभ्या का” या पी सावळाराम यांच्या लोकप्रिय गीताचं रसग्रहण करणार आहे.
“गंगा जमुना डोळ्यात उभ्या का
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा”
पी सावळाराम यांना हे गाणं कसं सुचलं ते सर्वांनाच माहिती आहे. गीताच्या मुखड्यातील अर्थाकडे जाताना मला असं सांगावसं वाटतं की आई-वडील जे करतील ते आपल्या भल्यासाठीच असणार याची मनाशी शंभर टक्के खात्री बाळगण्याचा तो काळ होता. माहेरची माणसं, नातेवाईक, मैत्रीणी या सा-या गोतावळ्याला सोडून जायचं म्हणून अर्थातच लग्न झालेल्या त्या नव्या नवरीचे डोळे भरून येतात. म्हणूनच तिला मिठीत घेऊन तिची आई तिला सांगते की “मुली, माहेरचे पाश सोडून जाणं तुझ्या जीवावर आलंय ते मला समजतं आहे ग, पण लग्न झालेल्या मुलीला सासरी जावं लागतं ही जनरीत आहे बाळ. आम्ही जे काही करू ते निश्चितच तुझ्या भल्याचंच असेल. या अश्रूंना बांध घालून हसतमुखाने तू सासरी जा आणि सासरच्या घरी नवी नाती जोड.”
“कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवीत घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे”
अगं, तू मला मिठी मारलीस ना बाळ, क्षणभर लहानपणची परकर पोलक्यातली तू मला आठवलीस आणि माझेही डोळे भरून आले. “कढ मायेचे तुला सांगती जा” पण बाळ, आता तू मोठी झाली आहेस. माहेरच्या प्रेमाची, मायेची ही शिदोरी तुझ्या बरोबर घेऊन सासरी जा.
“दारात उभी राहिली खिल्लारी जोडी
बघ दीर धाकले खोळंबून गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी”
कितीही हवेहवेसे वाटले तरी मुलीच्या जातीला लग्न झाल्यावर माहेरचे पाश सोडावेच लागतात. लग्न झाल्यावर स्वतः पेक्षाही सासरच्या माणसांचा आधी विचार करायचा असतो. तुला सासरी नेण्यासाठी गाडी तयार आहे आणि तुझा धाकटा दीर तू कधी येतेस याची वाट बघत तुझ्यासाठी खोळंबला आहे. “रूप दर्पणी मला ठेवूनी जा” तेंव्हा बाळे, आता डोळे पूस, खांद्यावरचा पदर व्यवस्थित घेत साडी ठीकठाक कर आणि तुझं हे सुंदर रूप माझ्या डोळ्यांच्या आरशात माझ्यासाठी ठेवून जा.
“मोठ्यांची तू सून पाटलीण मानाची
हसले तुझे ग हिरवे बिलवर लगीन चुडे
बघु नकोस मागे मागे लाडके ग छकुले
नकोस विसरू परी आईला”
तू जरी माझी लाडकी छकुली असलीस ना तरी लग्न झाल्यावर आता तू पाटील घराण्याची मानाची मोठी सून झाली आहेस. तुझ्या अंगावरचा साज, हा हिरवा चुडा तुला जास्तच शोभून दिसतोय. तेंव्हा मोठ्या सूनेची जबाबदारी ओळखून तू या नवीन संसारात रममाण हो. पण माझ्या छकुले माहेराला आणि तुझ्या लाडक्या आईला विसरू नकोस.
सासरी जायला निघालेल्या मुलीच्या आईची ही मनोवस्था जनकवी पी सावळाराम यांनी अचूकपणे गीतातून उलगडली आहे. संगीतकार वसंत प्रभू यांचा संगीत साज घेऊन लता मंगेशकर यांनीही तेव्हढ्याच ताकदीने ती आर्तता आपल्यापर्यंत पोचवली आहे.

– रस ग्रहण : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
विकासजी..
ओठावरचं गाणं हे सदर सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹
कविवर्य पी.सावळाराम यांचे…
गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?
हे काव्य..
प्रत्येक मराठी मनाच्या काळजावर कोरलेले गाणे आहे.
आपण गाण्याचे सुंदर रसग्रहण केलेले आहे.
मला भावले.
आपल्याला खूप खूप शुभेच्छा 👌👌👍🌹
कवी श्री विकास भावे यांनी कविवर्य पी. सावळाराम यांच्या गाण्याचे सुंदर रसाध्या आणि सोप्या भाषेत सग्रहण केले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन व आभार 🙏
विकासजी..ओठावरचं गाणं हे सदर सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹
कविवर्य पी.सावळाराम यांचे…
गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?
हे काव्य..
प्रत्येक मराठी मनाच्या काळजावर कोरलेले गाणे आहे.
आपण गाण्याचे सुंदर रसग्रहण केलेले आहे.
मला भावले.
आपल्याला खूप खूप शुभेच्छा 👌👌👍🌹
खूप छान👌😊
खूप सुंदर माहिती आणि गाण्याची आठवण..
खूपच सुंदर विवेचन..
धन्यवाद सर🙏
खूप छान रसग्रहण केले आहे. गाणं अतिशय भावपूर्ण आहे.हे गाणं ऐकून पाळण्यात असलेल्या मुलीला काही वर्षांत अशीच पाठवणी करायची आहे हृया कल्पनेने तरूण आई गहिवरून यायची.इतक्या प्रभावी गाण्याचे रसग्रहण तितक्याच ताकदीने केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा
विकास फारच सुंदर. जुन्या अजरामर गाण्यांना या सदरामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. देवेंद्र भुजबळ यांचेही हे सदर चालू केल्या बद्दल मी अभिनंदन करतो.
धन्यवाद
गाण्याचे वर्णन समर्पक शब्दांत केले आहे