नमस्कार 🙏
“ओठावरचं गाणं” या सदरात तुम्हा रसिकांचं स्वागत !
कॉंप्युटरच्या जमान्यात आता नसली तरी मनात मात्र रेडिओवर लागणारी गाणी रूंजी घालत असतात.
तर मित्रांनो, आजचं गाणं आहे “आराम हराम आहे” या चित्रपटातलं. आता चित्रपटाचं नाव सांगितल्यावर लगेच तुम्ही गाणं ओळखलंच असणार .... बरोब्बर 👍
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
चित्रपटातील प्रसंगानुरूप हे गाणं लिहिलं असलं तरी आपल्या रोजच्या जीवनात देखील ते लागू आहे. यशाकडे झेप घ्यायची असेल तर घर या संकल्पनेचा पाश थोडा दूर करून बाहेरच्या दुनियेत परिश्रम करण्याची तयारी हवी, त्यासाठी आपल्याला घरापासून लांब जायला लागलं तरीदेखील मनाची तयारी हवी.
तुज भवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा
आपल्या आजुबाजूला दिसणारी वैभवाची विविध रूपं प्रत्येक माणसाच्या मनाला भुरळ घालतात हे खरं असलं तरी बहुतेक जणांनी कष्ट करूनच हे वैभव मिळवलेलं असतं हे खरं असलं तरी एकदा का या सुखासीन आयुष्याची सवय लागली कि मग सुखाला चटावलेलं हे शरीर कष्ट करायला नकार देतं अर्थातच आपल्या प्रगतीसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे आणि हे वेळीच ओळखून या वैभवशाली आयुष्याचा एका ठराविक मर्यादेपर्यंत उपभोग घ्यावा मात्र उपभोग तेवढंच आयुष्याचं ध्येय आहे असं समजू नये.
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा उंबरा
ज्या चार भिंतींना तू घर समजतोस ते घर म्हणजे तुझ्या प्रगतीच्या, यशाच्या आड येणारा तुरूंग आहे. इथे मिळणारं सुख हे आत्ता जरी तुला खरं सुख भासलं तरी प्रत्यक्षात मात्र ते विषाप्रमाणे आहे जे हळूहळू तुझ्या शरीरावर आणि मनावर भिनतंय. या घराचा उंबरठा हे ही एक मोहाचं बंधन आहे जे तुला त्यागायला हवंय. कारण खरी प्रगती ही घराबाहेर पडुन केलेल्या कष्टांमधूनच होत असते.
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने
जा ओलांडून या सरीता सागरा
तुला देवानं जे हात दिले आहेत ना, त्या हातांचं सामर्थ्य अनुभवायचं असेल तर तुला बाहेरचं जग बघायला हवं, कष्ट, परिश्रम करायला हवे. तू बाहेरच्या जगात उघड्या डोळ्यांनी पहाशील तेंव्हाच तुझ्या लक्षात येईल की आपल्या बाहूंच्या सामर्थ्यावर मिळणारं सुख हेच आत्मिक समाधान देतं. द-या, डोंगर, हिरवी रानं, नद्या, समुद्र, सागर किनारा हे उल्लंघून साता समुद्रापार जेंव्हा स्वकर्तृत्वाने तुझ्या यशाचा झेंडा रोवशील तेंव्हा सुख आणि समाधान या शब्दांचा अनुभव तुला घेता येईल.
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परी ना वळते
ह्रदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
“कठोर परिश्रमास पर्याय नाही”, “कष्टाची मीठ भाकरी जरी असली तरी तिची चव न्यारी असते” हे सगळं माहीत असूनदेखील तू तिकडे कानाडोळा करतोस पण मनात मात्र आपण असं वागतोय हे बरोबर नाही ही व्यथा मनामधे कुठेतरी बोचत असते आणि मधेच कावराबावरा होतो. तेंव्हा आता तुझ्या अंतर्मनाची हाक ऐक कष्ट करून, मोलमजुरी करून मिळालेल्या भाकरीतच खरं सुख असतं याचा एकदा अनुभव घे.
जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गाणं गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकताना आपलं मन नकळतपणे बाबुजींच्या गोड आवाजात भिजत रहातं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
गाण्याचे बोलच इतके प्रभावी आहे आणि त्यात तुम्ही सोप्या शब्दांत सहज पुढे मांडलेला भाव,फार छान.
धन्यवाद आशा 🙏
किती सुंदर गाणं. लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भावे सरांचं रसग्रहण उत्तम
धन्यवाद सुजाता मॅडम 🙏
धन्यवाद क्षितिज सर 🙏
एकाशी झेप घेणारे सुंदर रसग्रहण …..
या तंत्रयुगात माणूस सुखासिन झाला आहे. सर्व भौतिक सुविधा असूनही समाधान नाही. त्याने हा घराचा पिंजरा काही क्षणासाठी तरी सोडून कष्ट केले तर वेगळीच दुनिया दिसेल.
कष्ट सगळेच करतात पण सुगलोलुप वृत्ती सोडून समाधान शोधता आलं पाहिजे. सोन्याच्या प्रति-यापेक्षा पक्ष्याला हिरवे रान जास्त आनंद देते.
धन्यवाद अंजुषा मॅडम 🙏