Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं : १००

ओठावरलं गाणं : १००

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. दोन वर्षांपूर्वी ९ जून २०२१ पासून सुरू झालेल्या या सदरानं आज पहाता पहाता शंभर गाण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. मी एवढं लिहू शकेन की नाही याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण जसजसा प्रत्येक गाण्याच्या रसग्रहणानंतर तुम्हा रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद/प्रतिक्रिया मिळू लागल्या तसतसा माझा उत्साह वाढत गेला.

मराठी-हिंदी दोन्हीही गाणी मी कॉलेज जीवनापासून ऐकत आलो आहे. त्यामुळे तशी गाणी पाठ होतीच पण रसग्रहण करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा त्या गाण्यावर विचार केला जात असे. ज्येष्ठ लेखक आणि कविवर्य अशोक बागवे यांचं मार्गदर्शनही मला या प्रवासात वेळोवेळी मिळत गेलं. माझ्या लेखनाबद्दल काहीही माहिती नसताना देखील न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ सर यांनी ही संधी देऊन मला लिहितं केलं याबद्दल मी आभारप्रदर्शन वगैरे गुळगुळीत शब्द न वापरता देवेंद्र भुजबळ सर, निर्मात्या सौ अलका भुजबळ मॅडम, ज्येष्ठ कवी, लेखक प्रा अश़ोक बागवे सर आणि तुम्हा रसिक श्रोत्यांच्या ऋणात राहू इच्छितो. तसेच माझे वडील कविवर्य म पां भावे यांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच. व्हॉटस् अप आणि कमेंट बॉक्समध्ये मिळणारा तुमचा प्रतिसाद आणि व्हॉटस् अप वर वैयक्तिक पातळीवर मिळणाऱ्या तुमच्या प्रतिक्रियांमुळे गाण्याचं रसग्रहण लिहिण्याचा माझा उत्साह वाढत गेला आणि आज आपण १०० व्या गाण्यापर्यंत येऊन पोचलो आहोत.

रसिक श्रोतेहो,
आजचं १०० वं गाणं हे या सदराचं शेवटचं गाणं आहे. सदराची सुरूवात मी ठाणे शहराचं भूषण असलेले जनकवी पी सावळाराम यांच्या “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का” या गाण्यापासून केली होती. त्यानंतर माझ्या कुवतीनुसार मंगेश पाडगावकर, वसंत बापट, प्रवीण दवणे, अशोक बागवे, शांता शेळके, वंदना विटणकर, मधुकर जोशी अशा अनेक जुन्या नव्या कवींच्या गाण्यांचं रसग्रहण मी केलं.

रसिक श्रोतेहो, आजचं १००वं गाणं आहे ठाणेभूषण कविवर्य म पां भावे यांचं, जे गायलं आहे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी. तर आशा भोसले यांच्या आवाजातील जादूने ज्या गाण्यानं मराठी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं असं अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं आणि रसिक श्रोत्यांच्या ओठावर खेळणारं हे गाणं म्हणजे –

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

या गाण्यामुळे म पां भावे हे नाव महाराष्ट्रात घराघरात पोचलं. भावे एकदा कामावरून घरी येत असताना त्यांच्या पुढे चालत असलेल्या दोन मुलींचा संवाद त्यांच्या कानावर पडला. थोडक्यात सांगायचं तर एक मुलगी दुसरीला सांगत होती कि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तनामनाने प्रयत्न करत असतो. पण आपल्या प्रयत्नांना यश मिळून एकदा का ते स्वप्न पूर्ण झालं कि मग स्वप्न पूर्ण करण्याची सगळी गंमतच निघून जाते. हा संवाद ऐकून म पां भाव्यांना “गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा” ही दुसरी ओळ अगोदर सुचली ती त्यांनी बसच्या तिकिटाच्या मागच्या बाजूला लिहून ठेवली आणि नंतर यथावकाश हे गाणं लिहून पूर्ण केलं.

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा

आपल्या आयुष्यात बरेच वेळा असंच घडतं नाही का?आपण सुखाची छान छान स्वप्नं पहायला लागलो कि मनातल्या असंख्य शंकाकुशंकांच्या वादळात ती स्वप्नं विरून जातात पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून ती आपल्याला खुणावत असतात. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच कधी दु:खाच्या झळांनी उबग येते तर कधी सौख्याच्या चांदण्यात ही अपुरी राहिलेली स्वप्नं खुणावत रहातातच पण दु:खाच्या झळांनी जेंव्हा जीव उबतो तेंव्हा देखील अनेक स्वप्नांपैकी एखादं तरी स्वप्न पूर्ण करायचं ही जिद्द पुन्हा एकदा मनाला उभारी देते, जीवनात चैतन्य निर्माण करते.

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी प्रिती फुलोनी यावी
काट्याविना न हाती केंव्हा गुलाब यावा

तरीही कधीकधी मनावर नैराश्याचे इतके काळे काळे ढग दाटून येतात कि त्याखाली आशेचा सूर्य पूर्णपणे बुडून जातो पण ब-याच विरह कालावधी नंतर प्रियकराची भेट व्हावी आणि मन उचंबळून यावं, तशाच मनातल्या आशा पुन्हा पल्लवित होतात, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली स्वप्नं पूर्णत्वाच्या दिशेने पुन्हा झेप घेतात. असं करताना अडचणींचे, नैराश्याचे काटे जरी रक्तबंबाळ करून गेले तरी त्याशिवाय स्वप्नपूर्तीच्या गुलाबाचं मोल किती अनमोल आहे हे कळत नाही.

सिध्दीस कार्य जाता येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा

एखादी इच्छा किंवा स्वप्न पूर्ण झाल्यावर आपला जीव सुखावतो मात्र कालांतराने त्या सुखाचंही मनाला, जीवाला जडत्व येतं. जीवाला जडत्व आलं कि शरीरातल्या चेतनेलाही जडत्व येत जातं अशा वेळेस माणसाच्या राहिलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्म-मरण-पुनर्जन्म या चक्रात पुन्हा हा जीव गुरफटत जातो….. राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी !!!

गाण्याच्या सुरुवातीला वाजणारा अनिल मोहिले यांचा व्हायोलिनचा सूर, त्यानंतर आशा भोसले यांचा सुरेल स्वर आणि गाणं संपताना आशाताईंनी “केंव्हा” या शब्दावर घेतलेली फिरत ऐकल्यानंतर ह्या गाण्यानं आपल्या ह्रदयात लगेच स्थान मिळवलं.

आता ‘रेडिओ विश्वास’ वर सुरू होणारा “ओठावरलं गाणं” हा कार्यक्रम आपण, दर बुधवारी दुपारी दीड वाजता आणि गुरूवारी रात्री आठ वाजता पुन्हा ऐकू शकता. ज्यामध्ये आपल्या आवडत्या गाण्याचं रसग्रहण माझ्या आवाजात ऐकताना तुम्ही पुन:प्रत्ययाचा आनंद घेऊ शकणार आहात.

विकास भावे

— लेखन : विकास भावे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

20 COMMENTS

  1. विकास खूप छान रसग्रहण आणि अभिनंदन शंभर रसग्रहण पूर्ण केल्याबद्दल

  2. खूपच सुंदर वाचून खूप छान वाटलं तुम्ही असंच लिहीत राहावं ही विनंती

  3. मुळात सुंदर गाण्यांच्या रसग्रहणाचे सुगंधी आणि मनमोहक रसग्रहण.

  4. गाण्यांच्या रसग्रहणाचं यशस्वी शतक पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
    हे इतकं सुंदर आहे की, इथे केवळ गाण्यांचे सौंदर्य दिसत नाही तर त्याच्या सुगंधाची मोहिनी जाणवते.

  5. आणि गाण्यांच्या रसग्रहणाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन मित्रा🌹👍🏼👏👏🤝🤝

  6. आपले रसग्रहण वाचून आज खऱ्या अर्थाने गाण्याचा आर्थ उमजला.खूप सुंदर लिहिले आहे आपण

  7. फारच सुरेख रसग्रहण. अखेर शंभर गाण्यांचे रसग्रहण पूर्ण झाले. अभिनंदन विकास.

  8. फारच सुरेख रसग्रहण. अखेर शंभर गाण्यांचे रसग्रहण पूर्ण झाले. अभिनंदन विकास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments