Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्य'ओठावरलं गाणं' ( ५५ )

‘ओठावरलं गाणं’ ( ५५ )

नमस्कार. 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. घरात जर लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर ते घर नेहेमीच उत्साहाने भरलेलं असतं. लहान मुलं त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने त्यांना पडणारे असंख्य प्रश्न आपल्याला घरातील वडील माणसांना विचारून भंडावून सोडत असतात . शेवटी त्यांचे बाबा त्यांना ओरडले की मग अव्याहतपणे बडबड करणारी हीच मुलं एकदम “हुप्प” होतात आणि मग एक शब्दही बोलत नाही. पण त्यांच्या गप्प बसण्याने देखील घरदार अस्वस्थ होतं. आज आपण पहाणार आहोत अशाच एका रूसलेल्या मुलीचं गाणं जे लिहिलं आहे कविवर्य मधुकर जोशी यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

नको ताई रूसू कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालात खुदकन हसू

बाबा ओरडले म्हणून बाबांवर रागावून कोपऱ्यात जाऊन फूरंगटून बसलेल्या या छोट्या मुलीचा राग काढण्याचं मोठ्ठं काम बिचाऱ्या आईवर येऊन पडलंय. ती देखील ही जबाबदारी अंगावर घेऊन त्या मुलीला समजावून सांगते आहे की अग वेडे, तू आता छोट्याशा बाळाची ताई झालीस ना, मग असं रागवायचं नाही काही. ताई झालीस म्हणजे तू आता मोठी झालीस की नाही आणि बाबा तर आपलेच आहेत की नाही, मग आपल्या माणसांवर कोणी रागावतं का कधी? ताईसाहेब, आता कोपरा सोडून खुदकन गालावर हसू फुलू द्या आणि धावत जाऊन बाबांना एक गोड गोड पापा द्या.

इवल्याश्या नाकावर मोठा मोठा राग
देऊ काय तुला हवे ते ग माग
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू

एवढा मी मस्का लावते आहे तरीही या नकट्या नाकावर चढून बसलेला राग काही अजून उतरत नाहीये, उलट गाल जास्तच फुगलेले दिसतायत. मग आता मला सांग तुला काय हवं बरं? आपण असं करू तुला दोन पर्याय आहेत हां. बाहुला बाहुली चं लग्न लावतात तसं तुझं लग्न लावून तुला आपण नवरा आणू या का? की तुला गलेलठ्ठ सासू हवी जिला बघितलं की तुझ्या नाकावरचा राग पळून जाईल? हसली….आमची बाहुली हसली…. अरे, अजूनही गाल फुगलेलेच आहेत.

बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू
लग्नात बुंदीचे लाडू आपण वळू
नवीन कपड्यात छान छान दिसू

मग आता काय करायचं बुवा? हां, आपण तुझ्या बाहुला बाहुलीचं लग्न लावून देऊ या‌. तू बाहुलीला नवीन कपडे घाल आणि मी तुझ्या बाहुल्याला सजवते. मी तुला छोटे छोटे बुंदीचे लाडू करून देते. मग आपण दोघीही नवे कपडे घालून छान पैकी तयार होऊ या. बाबा आणि आजोबा अंतरपाट धरतील …. आता गेला का ताईचा राग?

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
केशरी भात केला आहे मोठा थाट
ओठात आले बाई लडिवाळ हसू

हे बघ ताई, पंगतीत वाढायला पक्वान्न म्हणून केशरी भात केला आहे आणि तू वरमाय म्हणून तुला आणि नवऱ्या मुलाला जेवणासाठी खास चांदीचं ताट, ताटासमोर रांगोळी काढली आहे. आज तुम्ही साध्या पाटावर नाही बसायचं तर खास तुमच्यासाठी चंदनाच्या पाटाची सोय केली आहे. अरे, राग पळाला वाटतं…. आमची ताई गोड गोड हसली की.

संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं कुंदा बोकील यांच्या आवाजात ऐकताना आपलं बालपण पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतं.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. गाणं छान निवडलं आहे . लहान मुलांचा रुसवा दूर करणं मोठं कठीण काम असतं . इथेही छोटीला वेगवेगळी आमिषं दाखवली जातात . तेव्हा कुठे बाईसाहेब राजी होतात .
    गाण्याची चाल , शब्द, आवाज … सगळं कसं छान जमून आलंय .
    आपणही आशय बालसुलभ शब्दात व्यक्त केला आहे . अभिनंदन .

  2. विकास,
    छान आहे विश्लेषण/सादरीकरण गाण्याचे.

  3. खूप सुंदर रसग्रहण केलं शे अगदी बालपणीचा काळ सुखाचा का म्हणतात ते अगदी खरं आहे अप्रतिम

  4. 🌹कवितेच खूप छान विश्लेषण केले आहे. अगदी सोप्या भाषेत. खूप छान सदार 🌹
    धन्यवाद श्री. विकास भावे साहेब.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments