नमस्कार, मंडळी.
आजच्या गुरू पौर्णिमेच्या दिवशी एक छान योगायोग जुळून आला आहे. गेले वर्षभर विविध गीतांचे रसग्रहण करीत असलेले श्री विकास मधुसूदन भावे यांनी निवडलेले आजचे गीत हे प्रख्यात कवी, गीतकार आणि त्यांचे वडील म पां भावे यांनी लिहिलेले आहे.
या निमित्ताने पूज्य म पां भावे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
नमस्कार 🙏
‘ओठावरलं गाणं’ या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत. गाणं कुठलंही असो, ते जर ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आवाजात असेल तर रेडिओवरून ऐकू येणाऱ्या स्वरलहरी आपल्या कानामधून ह्रदयापर्यंतचा प्रवास जलद गतीने करून ताबडतोब आपल्या मनाचा कब्जा घेतात.
आज पाहू या माणिक वर्मा यांनी गायलेलं कविवर्य म पां भावे यांनी लिहिलेलं एक विरह गीत ज्याचे शब्द आहेत –
पाहतेच वाट तुझी जागवून रात रात
दाटतात आसवेच या उदास लोचनात
प्राणप्रिय सख्या, तू आज येशील, उद्या येशील या आशेवर मी तुझी रात्र रात्र जागून वाट पहात राहिले. अलीकडे मात्र माझा धीर सुटत चालला आहे आणि आता तुझ्या आठवणींवरच बहुधा मला आयुष्य काढावं लागेल,या विचाराने अश्रुंमधून मनाला आलेली उदासी मग डोळ्यांमधे तरळत रहाते. ते पाहून मैत्रिणी माझ्या जवळ बसून माझं सांत्वन करतात तर नातेवाईक समोर आले की कुत्सित नजरेने पाहून हसतात.
दाट दाट किर्र तिमिर वाढवितो खिन्नताच
शेजेवर एकटीस स्मृती हळव्या टोचताच
मन वेडे होई दंग भलभलत्या कल्पनात
मी शेजेवर एकटीच जागी असते आणि बाहेरचा गडद काळोख कुणीही न सांगता माझी सोबत करत असतो. झोप तर डोळ्यांवर येतच नाही मग कधी आपल्या बागेतल्या भेटी, कधी दोघांनी मिळून केलेला नौकाविहार तर कधी एकमेकांच्या मिठीत राहून रंगवलेल्या भावी संसाराची स्वप्नं अशा अनेक आठवणी चलतचित्रासारख्या मी आठवत रहाते. कितीही हव्याहव्याशा वाटल्या तरी एकीकडे या आठवणी माझ्या मनाला टोचत रहातात. मग बाहेरचा किर्र दाट काळोख जरी मला साथ करत असला तरी तोही माझ्या मनाची उदासीनता वाढवत रहातो. मनाची गाळण उडते आणि मग आठवणींच्या मागे धावायचं सोडून वेडं मन भलत्या सलत्या कल्पना करत रहातं.
शब्द मला देऊनिया का विलंब लावलास
कमलिनी ही आतुर रे भ्रमराला भेटण्यास
विरहाचे दंश सख्या अंग अंग पोळतात
“मी आठ दिवसांत येऊन तुला भेटतो कि नाही बघ” असं सांगून तू निघून गेलास खरा, पण एरवी दिलेला शब्द पाळण्यासाठी धावाधाव करणारा तू यावेळेसच नेमका कसा विसरलास ? तुला माझी विरहावस्था समजत नाही का? एरवी कमलिनी भोवती भृंग फेऱ्या मारून तिची मनधरणी करत असतो, तिच्याशी मीलनाची इच्छा प्रकट करतो पण इथे मात्र रोज रात्री होणाऱ्या विरह दंशामुळे जखमी होणारी ही कमलीनी भृंगाच्या मीलनासाठी आतुर झाली आहे आणि आतूरतेने तुझी वाट पहाते आहे.
दु:ख असे दाहक जे एकटीने भोगतसे
लागलेच मजला जे विरहाने आज पिसे
नच रंगे सुराविण प्रणयाचे गोड गीत
विरहाच्या दंशामुळे होणाऱ्या यातना कोणालाही सांगता येत नाहीत, किंबहुना कोणाच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेनेच ते दु:ख आपलं आपल्यालाच भोगावं लागतं, सोसावं लागतं. त्यामुळे घरातही कोणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत मी विरहाचं दु:ख सोसते आहे, विरह यातना भोगते आहे. आता मात्र रोज रात्री जागं राहून तुझी वाट पहाणं आणि विरहाच्या आगीत स्वतःला होरपळून घेणं यामुळे मला वेड लागेल की काय अशी शंका मनाला भेडसावते आहे. प्रणय गीत हे फक्त शब्दांतून सांगता येत नाही त्या गीताला सुरांचीही सुरेल साथ लागते तरच जीवन संगीत मनासारखं वाजतं ही गोष्ट जेंव्हा तुझ्या लक्षात येईल तेंव्हाच तू मला भेटायला धावत येशील. तोपर्यंत हे विरहाचे दंश सोसत रहाणं हेच माझ्या प्राक्तनात लिहिलं आहे.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या आवाजात ऐकताना गाण्यातले भाव आपल्यापर्यंत निश्चितच पोचतात.
– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप सुंदर शब्दात कवितेचं मर्म आपण सांगितलं आहे. विरहाची जाणीव प्रकर्षाने जाणवते, प्रेमाची व्याख्या आपोआप सापडते 🌹
🌹धन्यवाद श्री. विकास भावे सर 🌹
धन्यवाद सर 🙏