Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्य'ओठावरलं गाणं' ( ६० )

‘ओठावरलं गाणं’ ( ६० )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत.‌ रेडिओवर ऐकू येणाऱ्या गाण्यांमध्ये कुमार गंधर्वांच्या आवाजात जर एखादं गाणं ऐकू आलं तर आपले पाय जागच्या जागी थबकतात. बरोबर…आज आपण पहाणार आहोत कवी अनिल यांनी लिहिलेलं एक अतिशय लोकप्रिय गाणं ज्याचे शब्द आहेत –

“अजुनी रुसूनी आहे …. खुलता कळी खुलेना

आपली पत्नी किंवा प्रेयसी जर रागावली तर थोडा वेळ आपण दुर्लक्ष करतो. पण खरं तर ती रूसून बसल्यावर आपलं मन बेचैन होतं, ऑफीसमध्ये कामात आपलं लक्ष लागत नाही, मग तिचा रूसवा काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिला गजरा किंवा साडी घेऊन द्यायची ज्यामुळे तिचा राग पळून जाईल आणि तिची कळी खूलेल. पण या वेळेस मात्र ही कुठलीही मात्रा उपयोगी पडत नाही, प्रेयसीचा राग काही केल्या पळून जायला तयार नाही आणि म्हणूनच तो म्हणतोय “अजुनी रूसून आहे…. खुलता कळी खुलेना”!

समजूत मी करावी म्हणुनीच तू रूसावे
मी हास सांगताच रडताही तू हसावे
ते आज का नसावे ? समजावणी पटेना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना

आजच तू एवढी कुठल्या कारणामुळे माझ्यावर रूसली आहेस त्याचा थांग मात्र मला काही केल्या लागत नाहीये. तुझ्या रागावरचा उपायही मला चांगला ठाऊक आहे. कधी कधी मात्र मला वाटत रहातं तुझा लटका रुसवा केवळ मी तुझी समजूत काढावी म्हणून ओढूनताणून आणलेला रूसवा असतो. माझ्यावर रागावून जरी तू रडत असलीस तरीदेखील मी तुला “हास पाहू” असं म्हंटल्यावर रडता रडता देखील तुझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं तेंव्हा तुझा चेहेरा फोटो काढण्याइतका गोड दिसतो, पण आज मात्र तसं का घडत नाहीये ? मी हर तऱ्हेने तुझी समजूत काढून देखील नेहेमीचं हास्य आज तुझ्या चेहऱ्यावर येत नाहीये. तुझा आजचा रूसवा मला तरी थोडा वेगळाच वाटतोय. मी काय समजायचं? कारण कितीही रागावलीस तरी मी समजूत काढल्यानंतर हसणारी आणि बडबड करणारी माझी प्रेयसी आज हसायला आणि बोलायला देखील मागत नाहीये त्यामुळे माझा आणखीनच गोंधळ उडतो आहे.

कि गूढ काही डाव ? वरचाच हा तरंग
घेण्यास खोल ठाव बघण्यास अंतरंग ?
रूसवा असा कसा हा ज्या आपले कळेना

तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे भाव पाहून मला मात्र आता जरा गोंधळल्यासारखं होतंय. कारण खरोखरच तू माझ्यावर रागावली आहेस कि रागावल्याचं नाटक करते आहेस ते मला कळत नाहीये. का तुझ्या मनात माझं खरोखरच तुझ्यावर प्रेम आहे का अशी शंका उत्पन्न झाली आहे? अणि म्हणून तू माझ्यावर रागावून माझ्याशी अबोला धरला आहेस का? तसं असेल तर वेडे, माझ्या अंतरंगात जर डोकावून पाहिलंस तर तिथे तुला तुझीच प्रतिमा दिसेल. हा असा कसा ग तुझा रूसवा की आपल्यामुळे जवळचं माणूस अस्वस्थ होतं आहे एवढंही त्याला कळू नये? मी पुन्हा एकदा मनापासून सांगतो कि माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. एवढं सांगून देखील तुझे गाल फुगलेले आहेत आणि ओठावर अजूनही हसू फुटत नाहीये त्यामुळे तुझा रूसव्याचं गूढ काही मला उलगडत नाहीये.

स्वतः कुमार गंधर्व यांनीच संगीतबद्ध केलेलं हे गाणं त्यांच्या आवाजात ऐकताना त्या गाण्यामध्ये आपण रंगून जातो.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. कवी अनिल यांनी लिहिलेले हे गाणं कुमार गंधर्व यांनी संगीताने व त्यांच्या गायकीने अजरामर केले आहे. या गाण्यांची निवड व आपण केलेले रसग्रहण नेहमीप्रमाणे उत्तम झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी