नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कॉम्प्युटर आल्यापासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून पत्र हा प्रकार नाहीसा झाला आहे. प्रिय, आदरणीय, तीर्थरूप असे मायने असलेली पत्रं पूर्वी लिहिली जायची. तर पत्राच्या शेवटी मो. न. ल. आ. म्हणजे आता व्हॉटस् अप वर जसं Ty वगैरे लिहितात ना तसाच हा शॉर्टफॉर्म आहे “मोठ्यास नमस्कार, लहानास आशिर्वाद” या वाक्याचा. आता मात्र पत्र हा शब्द “पत्र तुझे ते येता अवचित”, यांसारख्या जुन्या गाण्यांमधून ऐकायला मिळतो. आज आपण पहाणार आहोत कवी रमेश अणावकर यांनी लिहिलेलं एक पत्रगीत ज्याचे शब्द आहेत –
मज सांग सखी तू सांग मला
पत्रात लिहू मी काय तुला
पत्राच्या सुरूवातीला आपण जो मायना लिहितो तो काय लिहावा असा प्रश्न या तरूणाला पडला आहे. त्यामुळे तो आपल्या प्रियेलाच विचारतोय की पत्र लिहून तुला पाठवायचा माझा मानस आहे पण मी जर “प्रिय किंवा डार्लींग” असं काहीतरी लिहिलं आणि ते पत्र जर तुझ्या हातात न पडता तुझ्या आईबाबांच्या हातात पडलं तर आपली कंबख्तीच भरली म्हणायची. असा काहीतरी मायना आता तूच मला सूचव जो फक्त तुला समजेल आणि त्रयस्थ इसमाला त्याचा अर्थबोध होणार नाही. तुला पत्र लिहून पाठवायची माझी खूप इच्छा आहे पण का कुणास ठाऊक ते परक्या माणसाच्या हातात पडलं तर ….या विचाराने मला उगाचच भीती वाटते आहे.
चंद्रमुखी तू चांद म्हणू तर
प्रिये म्हणू का तुज घटकाभर
रूप तुझ गिरवित निरंतर शब्द सुचेना काही मला
सखे, पौर्णिमेच्या चंद्रासारखा तुझा गोल चेहेरा पाहून मी त्या चेहेऱ्यावर लट्टू होतो आणि मला कळत नाही तुला पौर्णिमेच्या चंद्राची उपमा द्यावी कि तुझ्याकडे पहात “चांद माझा हा हासरा” हे गाणं म्हणावं? मग मनात विचार येतो की उगीच अशा कवितेतल्या उपमा देण्यापेक्षा मी तुला फक्त “प्रिये” अशी सुटसुटीत हाक मारू का? पत्राचा मायना याच शब्दाने लिहावा असा विचार करता करता ठरवून मी हेतुझ्या देखणं रुप मी गिरवत रहातो आणि मग या एका शब्दावर पत्राची गाडी तुझ्या रूपाच्या सिग्नलला अडकून रहाते.
किंचित हसऱ्या तव नजरेवर
लाज बावरी रूप मनोहर
नजरानजरी मी ही क्षणभर अर्थ मनीचा जाणियला
तू समोर असतेस तेंव्हा अनिमिष नेत्रांनी मी तुझ्याकडे पहात असतो. तू ही मधेच हळूच चोरून माझ्याकडे बघून हसतेस. मी तुझ्याकडेच पहातो आहे हे लक्षात आल्यावर लज्जनं तुझे गाल आरक्त होतात आणि डोळे खाली झुकतात. तुझ्या चेहऱ्यावर पसरलेल्या लज्जेमुळे आणि आरक्त झालेल्या गालांमुळे आधीचा सुंदर असलेला चंद्रमुखी चेहरा अधिकच मोहक दिसतो. नजरानजरीच्या या खेळातून तुझ्या मनातला अर्थ मला बरोब्बर उमगला आणि म्हणूनच माझ्या मनातल्या तुझ्याबद्दलच्या भावना मला पत्रातून व्यक्त करायच्या आहेत.
लिहिता लिहिता शब्द थांबती
लिहू नये तर कसली प्रिती
नाव सारखे ओठावरती वेड लाविते जिवाला
मी अगदी ठरवून तुला पत्र लिहायला बसतो पण तुझा सुंदर चेहेरा डोळ्यापुढे उभा राहिला कि माझ्या मनातले शब्द कागदावर उतरतच नाहीत, ते मनातच थांबून रहातात. माझ्या मनात असलेल्या तुझ्याबद्दलच्या प्रीतभावना मी जर पत्र लिहून व्यक्त नाहीत तर मी ही तुझ्यावर प्रेम करतो हे तुला कसं समजणार? काही ना काही कारणाने तुझं नाव सारखं माझ्या ओठावर येत रहातं कारण तुझ्या नावाचं माझ्या मनाला वेड लागलं आहे. मात्र हे सारं तुला पत्र लिहून कळवायचं आहे पण कुठल्या शब्दात ते व्यक्त करू आणि मायना काय लिहावा या संभ्रमात मी अडकलो आहे.
संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरूण दाते यांनी आपल्या मुलायम आवाजातून आपल्यापर्यंत पोचवलं आहे, जे ऐकल्यानंतर आपणही स्वतःशी तेच गाणं दिवसभर गुणगुणत रहातो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खुप सुंदर, पत्र हा प्रकार नाहीसा झाला पण त्या आठवणी अजुनी हृदयात आहेत. 🌹
🌹धन्यवाद सर 🌹
धन्यवाद सर 🙏
सर नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम तुम्ही लिखाण केलेला आहे हे आणि अतिशय सुंदर अस आम्हाला वाचायला मिळालं… सर तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद पंकज 🙏
पत्र या विषयावर रमेश अणावकर यांनी लिहिलेले हे सुरेख गाणं. या गाण्याला अनिल मोहिले यांनी उत्कृष्ट संगीत दिले आहे. अरुण दाते यांनी ते मुलायम आवाजात गाऊन अजरामर केले आहे. नवीन पिढीला पत्र म्हणजे काय हे समजावून सांगावे लागेल. नेहमीप्रमाणे आपण केलेले रसग्रहण उत्तम झाले आहे.
धन्यवाद विवेकजी 🙏