Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं (६६)

ओठावरलं गाणं (६६)

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत, गणरायाच्या स्वागतापासून ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देईपर्यंत त्याच्या सेवेत आपण सर्व आबालवृद्ध दंग झालो होतो आणि शेवटच्या दिवशी, त्याला निरोप देते वेळी “गणपती बाप्पा मोरया | पुढल्या वर्षी लवकर या” असंही आपण आग्रहाने सांगितलं आहे. मित्रहो, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हेच गाणं आपण आज पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत – “गणपती बाप्पा मोरया | पुढल्या वर्षी लवकर या” शांता शेळके यांनी लहान मुलांच्या नजरेतून गणपती बाप्पा कसे दिसतात त्याचं वर्णन करताना पुढे म्हंटलं आहे ….

इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान
एवढं मोठं डोके कशी पेलते तरी मान
गोरागोरापान रंग मऊनितळ छान अंग
मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया

गणपती बाप्पांचं रूप पाहिल्यावर लहान मुलांना कुतूहल, उत्सुकता आणि औत्सुक्य स्वस्थ बसू देत नाही आणि आईबाबांना जर आपण काही प्रश्न विचारले तर ते आपल्याला नक्कीच ओरडतील याची खात्री असल्यामुळे ही मुलं गणपती बाप्पांनाच विचारतायत कि बाप्पा, तुमचे डोळे इतके बारीक, कान सुपाएवढे मोठे आणि डोकं तर त्याहूनही मोठं आहे. पण मग बाप्पा, एवढं मोठं डोकं तुमच्या मानेला पेलवतं कसं याचंच आम्हाला कोड पडलंय आणि ते काही केल्या सुटत नाहीये. तुमचा रंग मात्र आम्हाला खूपच आवडला हं. तुमचं अंग तर किती मऊ नितळ आहे आणि आमचे बाबा आम्हाला नेहमीच सांगत असतात कि तुमच्या मोठ्या पोटात आमच्याबद्दल भरपूर माया आहे, प्रेम आहे. म्हणून तर आम्ही “पुढल्या वर्षी लवकर या” असं तुम्हाला सांगतो आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यात तुम्ही आम्हाला भेटायला येता.

मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड
सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड
दोनावरी दोन हात एकच कसा तुमचा दात?
अजब वाटे रूप असे बघावया

बाप्पा, तुमच्या पोटात आमच्याबद्दल भरपूर माया आहे हे आम्हाला आता चांगलंच ठाऊक झालंय पण तुमच्या पोटावर वळलेली वक्राकार सोंड आहे ना, त्याच्या मागे लपून बसलेलं, तुम्हाला आवडणारे मोदक खाणारं तुमचं तोंड काही आम्हाला कधी दिसलं नाही. शिवाय बाप्पा तुम्हाला चार हात आणि दात मात्र एकच कसा हो? तुमची आरती झाल्यावर आई आम्हाला सांगते “गणपती बाप्पाला सांग मला चांगली बुध्दी दे….गणितात पास कर.” पण तुमच्या ह्या रूपाकडे पाहिलं की मी काहीतरी अजब गोष्ट पहातोय असंच मला वाटत रहातं.

उंदरावरी बसून कशी डुलत येते स्वारी
गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी
शोभिवंत मखर त्यात, पूजेचाही थाटमाट
आरतीला टाळ झांजा वाजवाया

बाबा तुम्हाला पाटावर बसवून घरी घेऊन येतात तेंव्हा आई तुम्हाला कुंकू वहाते, लामणदिवा घेऊन ओवाळते पण आईने गोष्टीत सांगितल्याप्रमाणे उंदीरमामांच्या पाठीवर बसून डुलत डुलत येणारी तुमची स्वारी माझ्या डोळ्यासमोर येते. बाप्पा, तुम्हाला मोदक आवडतात म्हणून आईने मोदक केले ना, त्यामुळे माझी पण चंगळ झाली. शेवटी आईने डोळे वटारले म्हणून नाहीतर तुमच्या नैवेद्याच्या ताटातले मोदक सुध्दा मीच खाणार होतो. पण काही म्हणा बाप्पा, ताई आणि दादाने मिळून तुमच्यासाठी तयार केलेल्या मखरात तुम्ही दहा दिवस अगदी आरामात बसून होतात. बाबांनी रोज सोवळं नेसून तुमची पूजा केली. बाप्पा, तुमची पूजा झाल्यावर गंध, फूल, कुंकुमतिलक, जास्वंदीची फुलं, केवडा आणि इतर फुलांनी सजलेली तुमची मूर्ती शोभिवंत मखरात आणखीनच शोभून दिसत होती. दहा दिवस मी व माझ्या मित्रांनी झांजा वाजवून, ताईने टाळ वाजवून तर दादाने तबल्याच्या ठेक्यावर सर्व आरत्या अगदी जोषात म्हंटल्या.

पाहुणे तुम्ही येता घरी मौज होई मोठी
खिरापत खाऊ मिळे मिळे आम्हा सुटी
पुन्हा पुन्हा तुम्ही यावे विद्यादान आम्हा द्यावे
मनोभावे वंदु तुम्हा गणराया

गजानना, तुम्ही जेंव्हा “पाहुणे” म्हणून आमच्या घरी येता तेंव्हा आम्हा मुलांना खूप मजा वाटते, गंमत वाटते. कारण तुमची आरती झाल्यावर प्रसाद म्हणून कधी खोबऱ्याची खिरापत, पेढे, आंबा मोदक, सफरचंद, साखरफुटाणे, केळी असा नित्य नवा प्रसाद खायला मिळतो तेंव्हा खूप मजा येते. शिवाय शाळेला सुट्टी त्यामुळे अर्थातच आम्हाला अभ्यासाला देखील सुट्टी! तुम्हाला बुध्दीची देवता म्हणतात ते आम्हाला ठाऊक आहे देवा, त्यामुळे तुम्ही वरचेवर घरी येत जा आणि आम्हाला सद् बुध्दी द्या म्हणजे विद्या ग्रहण करून आम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवू आणि रोज मनोभावे तुम्हाला वंदन करू. अथर्वशीर्ष आणि नारदमुनींनी लिहिलेलं संकटनाशन स्तोत्र रोज तुम्हाला म्हणून दाखवू.

सर्वच गणेश भक्तांना आवडणारं हे गाणं संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं असून लता दीदींच्या गोड आवाजात ते ऐकताना पाय आपोआप ताल धरून नाचू लागतात.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मुलांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं या शांताबाईंच्या गाण्याच्या माध्यमातून आणि रसग्रहणातून मिळतात.

    ओघवती भाषा, गणपतीचे वर्णन, बाललीला असे अनेक कंगोरे या रसग्रहणातून दिसतात.
    छान लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments