नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन: पूर्वक स्वागत ! ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांच्या प्रमाणेच रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांमधून आपलं मनोरंजन करत आवाजातील श्रेष्ठत्व सिद्ध करणारं आणखी एक नाव म्हणजे अपर्णा मयेकर ! आज आपण पहाणार आहोत गुरूनाथ शेणई यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –
लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही
मी लाज लाजूनी लालच झाले बाई
इतके दिवस तिच्यावर मूकपणे प्रेम करणाऱ्या युवकाने आज त्याच्या मनातली गोष्ट तिच्यासमोर उघड केली आहे. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमभावना कळत होत्या, पण त्याबद्दल बोलायला आजवर तिचं मन कधीच धजलं नाही. आजही दोघे एकमेकांना भेटले. बराच वेळ तो गप्प गप्प होता आणि ती एका कळीभोवती भिरभिरणाऱ्या भ्रमराकडे टक लावून पहात असतानाच ती संधी साधून तिला आपल्या मिठीत घेऊन त्याने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं आणि त्याक्षणी कळीभोवती घिरट्या घालणारा भ्रमरही कळीला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असंच काहीसं सांगत असावा असं तिला वाटलं आणि तीच स्वतःशीच लाजली.
जे सांगू नये ते सांगितले पदराने
मी अमृत घेता तुझ्यातले अधराने
गात्रात अनामिक स्वर झंकारत राही
पहिल्या वेळेस साडी नेसून झाल्यावर जेंव्हा मी खांद्यावर पदर घेऊन पीन अप केलं तेंव्हाच त्या पदराने हळूहळू कळीचं फुलात रूपांतर होत असल्याची जाणीव पहिल्यांदा करून दिली.
कुणाशी तरी गप्पा माराव्यात, आपल्या मनातलं ओळखणारं माणूस नेहमी आपल्या जवळ असावं असं काहीतरी मनात येत असे. त्यानंतर आपण एकमेकांना भेटत राहिलो. तुझा विचार मनात आला कि मला उगीचच लाजल्यासारखं होत असे. “तू साडीत खूप सुंदर दिसतेस” असं एकदा कधीतरी तू म्हणालास आणि मग मी ही जसजशी साडी नेसू लागले तसतसा खांद्यावरचा पदर स्त्री नं कसं असायला हवं, कसं दिसायला हवं, कसं वागायला हवं याचे धडे रोजच देत गेला. तू मला मिठीत घेऊन काहीतरी माझ्या कानात सांगतो आहेस असं स्वप्न मला अलीकडे रोज पडत असे. आज तू मला तुझ्या मिठीत घेतल्यावर अचानक ते स्वप्न सत्यात साकारलं आणि तुझ्या प्रेमाला प्रतिसाद देत मी ही तुझ्या ओठांवर ओठ टेकवले. तुझ्या ओठातलं अमृत प्राशन केल्यानंतर, तुझ्या प्रेमाची सतार माझ्या मनाच्या प्रितीच्या तारा छेडते आहे ज्यामधून “I Love You” हे तुझेच शब्द मला ऐकू येत आहेत.
तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी
मी तुझाच आहे तू माझी फुलराणी
वाटते तुझ्यावीण अर्थ जीवना नाही
तू मला जवळ घेऊन तुझ्या आश्वासक शब्दात भावी जीवनाची स्वप्नं माझ्या डोळ्यासमोर रंगवलीस. “राणी, मी केवळ आणि केवळ तुझाच आहे. माझ्या खांद्यावर ज्या विश्वासाने तू मान ठेवली आहेस त्या खांद्याचा भक्कम आधार कायम तुझ्या पाठीशी राहिल.” या तुझ्या आश्वासक बोलण्याने माझं मन जपणारा, आपल्या आयुष्याची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आज मला तुझ्या रूपाने मिळाला आणि तुझी संगत लाभली तरच या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल याची माझ्या मनाला खात्री पटली.
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यातील तरूणीच्या मनातील आनंदी भावना अपर्णा मयेकर यांनी आपल्या आवाजातून व्यवस्थितपणे पोचवल्या आहेत.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा छानच…खरंच
धन्यवाद मॅडम 🙏
सूंदर रसग्रहण.
धन्यवाद विराग 🙏