नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कधी कधी आपल्याला झालेला आनंद हा इतका मोठा असतो की आपलं वय विसरून नाचावंसं वाटतं, गावंसं वाटतं. प्रत्यक्षातील आयुष्यात जरी हे शक्य नसलं तरी एखाद्या चित्रपटात असं एक तरी गाणं हमखास असतंच जे तरूणाईच्या काळात सारखं आपल्या ओठावर येत रहातं, कारण जणू काही आपल्याच मनातल्या भावना त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तारूण्य सुलभ भावना व्यक्त करणारं ज्येष्ठ कवी ग. दि माडगूळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत –
“आज कुणीतरी यावे | ओळखीचे व्हावे”
कधीतरी अशी घडी येते की घरामध्ये फक्त आपण एकटेच असतो आणि बाहेर मस्तपैकी गार वारा सुटलेला असतो, काळ्या काळया मेघांचा आकाशात गोंधळ घालायला सुरुवात होते आणि या सुवर्ण क्षणाचं औचित्य साधून जर माझा प्रियकर मला भेटायला आला तर किती बहार येईल. पण तो जमाना असा होता की प्रियकराचं किंवा पतीचंही नाव स्त्रियांच्या ओठावर पटकन येत नसे. तरीही मनातल्या तारूण्य सुलभ भावना व्यक्त केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. म्हणूनच आपल्या मनातल्या भावना ही तरूणी या शब्दांमधून व्यक्त करते आहे.
जशी अचानक या धरणीवर
गर्जत यावी वळवाची सर
तसे तयाने यावे
टीरींग टीरींग वाजणाऱ्या टेलिफोनचा जमाना जाऊन आता जरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाचं खेळणं आलेलं असलं तरी चाळीस वर्षांपूर्वी बरेच वेळा असं होत असे की काही न कळवता एखादा पाहुणा दारात येऊन उभा राहिला तरीही घरची गृहलक्ष्मी आपुलकीने त्याचं स्वागत करत असे. वळवाचा पाऊस जसा अवचितपणे येऊन धरणीला चिंब भिजवून जातो, तसंच माझ्या प्रियकराने ध्यानीमनी नसताना मला भेटायला यावं. अशा भेटीमुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद व्दिगुणित होत रहातो….कारण दोघांची झालेली ही अवचित भेट पुढे कित्येक दिवस मन:पटलावर कोरलेली रहाते.
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा
हाती हात धरावे
प्रत्येक स्त्रिच्या मनात एक सुप्त इच्छा असते….ती म्हणजे आपल्या पतीनं किंवा प्रियकरानं आपण काही न बोलता देखील आपल्या मनातली इच्छा किंवा विचार ओळखावा. या तरूणीचीही तीच इच्छा आहे की आमचा स्नेह, प्रेम, एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं नातं इतकं रेशमी व्हावं की माझ्या मनातले हेतू आणि भावना मी न सांगताही त्याला समजून याव्यात. अर्थातच नंतर काही न बोलता त्याने फक्त माझे हात हातात घेऊन आपल्याही प्रेमाची कबुली द्यावी. चाळीस वर्षांपूर्वी, आपल्या प्रियकराकडून या तरूणीची एवढीच माफक अपेक्षा असायची.
सोडुनीया घर नाती गोती
निघूनी जावे तया संगती
कुठे ते ही ना ठावे
तू जर माझ्या मनात काय चाललंय ते मी न सांगताही ओळखलंस तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेन. माझ्या मनातलं ओळखणाऱ्या अशा मनकवड्या माणसाबरोबर नात्यांचे सर्व बंध तोडून, तो जिथे मला घेऊन जाईल तिथे, जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची माझी तयारी आहे. मी आत्मविश्वासाने ठामपणे एवढं सांगू शकते कि माझा विश्वास कधीही खोटा ठरणार नाही.
एकमेकांच्या सहवासात हे प्रेमाचं नातं मुरलेल्या लोणच्यासारखं पुढील आयुष्यात बहरत जातं आणि आयुष्य आणखीनच बहारदार होत जातं.
“मुंबईचा जावई” या चित्रपटासाठी लिहिलेल्या गदिमांच्या सहज सुंदर शब्दांना तितक्याच सहजतेने संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून आशा भोसले यांनी गाण्यातील आनंदी मूड अचूक पकडला आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान रसग्रहण.
धन्यवाद विराग 🙏
सुंदर रसग्रहण…
नेहमी प्रमाणे…
निवडक चपखल शब्दात केलेलं रसग्रहण
धन्यवाद राधा मॅडम 🙏
खूप छान रसग्रहण केले आहे. तुझा ह्या मध्ये हातखंडच
आहे. ,,👍👍👌👌
धन्यवाद प्रभा 🙏
धन्यवाद राधा मॅडम 🙏
भावे सर खूप अप्रतिम लिहिलं आहे खूप छान वाटलं रसग्रहण करून…. हे माझं अत्यंत आवडीचं म्हणजे अतिशय लाडकं गाणं आहे
धन्यवाद पंकज 🙏