नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत ! दिवाळीच्या चार दिवसांमधला आनंदाचा दिवस म्हणजे आजचा भाऊबीजेचा सण जो आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. लहानपणी आपल्याला या भाऊबीजेच्या दिवसाची खूप गंमत वाटत असे. मोठेपणी मात्र बहिण भावाच्या प्रेमाचा हाच धागा आणखीनच घट्ट विणला जातो, ज्यामधून हे नातं अधिकाधिक दृढ होत जातं. भाऊबीजेच्या निमित्ताने आज आपण पहाणार आहोत कृष्ण गंगाधर दिक्षित उर्फ कवी संजीव यांनी “भाऊबीज” चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत –
“सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे I वेड्या बहिणीची वेडी ही माया”
दिवाळी म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणी असते. फटाके, फराळ आणि ज्या दिवसाची लहान मोठे सारेच उत्सुकतेने वाट पहात असतात तो भाऊबीजेचा दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस. अशा या भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळायला मिळणार म्हणून आपल्याला झालेला आनंद हि बहिण नाचून आणि गाण्यातून व्यक्त करते आहे.
माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्र सूर्याची |
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहू दे छाया रे ||
माहेरची ओढ, माहेरची माया, माहेरची माणसं, या सगळ्या गोष्टींचं मोल स्त्रीच्या दृष्टीने अनमोल असतं आणि म्हणूनच कवीनं पृथ्वीमोल हा योग्य शब्द योजला आहे. पृथ्वीवरच्या कोणत्याही गोष्टीचं जसं मोल होऊ शकत नाही तद्वतच माहेरची माया आहे आणि याला साक्ष चंद्र आणि सूर्य यांची आहे. अशा या घरात हा भाऊराया मला भेटला म्हणजे जणू काही कृष्ण आणि द्रौपदी या बहिण भावाचीच भेट झाली आणि कृष्णानं जसं द्रौपदीला बंधूप्रेम दिलं तसंच प्रेम मलाही तुझ्याकडून आयुष्यभर मिळत राहू दे असंच हि बहीण म्हणत आहे.
चांदीचे ताट नि चंदनाचा पाट
सुगंध गंध दरवळे रांगोळीचा थाट ।
भात केशराचा घास अमृताचा
जेवू घालीते भाऊराया ||
दुसऱ्या कडव्यात भाऊबीजेच्यानिमित्ताने जेवणाचा खास मेनू म्हणून आईने केलेला केशरी भाताचा सुगंध घरात दरवळतो आहे. चंदनाच्या पाटावर ऐटीत बसलेल्या भावाच्या समोर हा केशरी भात चांदीच्या ताटातून आलाय आणि बहिणही आईने बनवलेल्या या केशरी भाताचा अमृतरुपी घास मोठया प्रेमाने आणि आनंदाने लाडक्या भावाला भरवते आहे. चांदीचं ताट, चंदनाच्या पाट … त्या काळी हे दृष्य बहुधा घराघरातून दिसत असावं वसंतकुमार मोहिते यांचं संगीत आणि आशाताईंच्या आवाजातून आणि गाण्याच्या अचूक शब्दरचनेतून हे चित्र आपल्या डोळ्यासमोर अचूकपणे उभं रहातं.
नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी |
नक्षत्रांचा सर येई भूमीवर पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला ||
रात्रीच्या वेळेस निळ्या आकाशात पसरलेल्या चांदण्यांना कवि संजीव यांनी दिव्यांची उपमा दिली आहे आणि या चांदण्यांच्या प्रकाशात पृथ्वी जणू काही दिवाळी निमित्त चंद्राला ओवाळते आहे आणि ओवाळून झाल्यानंतर चंद्राने भेट म्हणून पृथ्वीला नक्षत्रांचा हार भेट दिला असून तो स्विकारण्यासाठी पृथ्वीनेही आपला पदर पसरला आहे अशी एक विलक्षण सुंदर कविकल्पना कवि संजीव यांनी या शब्दातून साकारली आहे. अतिशय गोड असं हे गाणं दिवाळी आणि भाऊबीजेचा दिवस आपल्या डोळ्यासमोर उभं करण्यात नक्कीच यशस्वी झालं आहे. या गाण्यामध्ये शब्द, संगीत आणि आवाज या तिन्हीची रसायन अतिशय उत्तम जमलं आहे असंच म्हणावं लागेल.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
धन्यवाद विवेकजी 🙏
भावेश्वर तुम्ही निवडलेले गाणं तर सुंदर आहे पण तुम्ही लिहिलेलं रसग्रहण ही खूप सुंदर आहे
धन्यवाद विराग 🙏
त्यावेळेस गीतकार त्यावेळची गाणी खरंच अप्रतिम होती… म्हणून आजही आपल्यासारखे कवी त्यावर लिहिते होतात…
भावे सर तुम्ही खरंच छान लिहिता…
……….
या सगळ्यां गण्यान मुळे सण उत्सव बालपणी आमच्या मनावर अधिक अधोरेखित झाले होते.
……
आज या गाण्याचाही खूप छान संदर्भ आणि वर्णन तुम्ही केलेला आहे…..
धन्यवाद पंकज 🙏
कवि संजीव यांचं हे गाणं बहिण, भावाच्या नात्यांचं सुंदर वर्णन करणारे आहे व आजच्या भाऊबीजेच्या दिवसाला साजेस आहे. या गाण्याची आपली निवड व आपण केलेले रसग्रहण आवडले.
गाणं तर सुंदर आहेच पण तुम्ही केलेलं रसग्रहणही खूप सुंदर आहे.👌👍
धन्यवाद अजितजी 🙏