Monday, July 14, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं ( ७६ )

ओठावरलं गाणं ( ७६ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. लेखिका म्हणून आपल्याला माहित असलेल्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची जन्मशताब्दी नुकतीच आपण साजरी केली. तसं पाहिलं तर रेडिओच्या या माध्यमातून शांताबाई रोजच कुठल्या ना कुठल्यातरी गाण्यातून आपल्याला भेटत असतात. कधी ते गाणं बाबूजींच्या आवाजातून आपल्यापर्यंत येतं तर कधी लताबाईंच्या गोड आवाजात तर कधी जयवंत कुलकर्णी यांच्या आनंदी आवाजातून आपल्यापर्यंत येतं. मित्रहो आज पाहू या शांताबाई शेळके यांचं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –

प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी?
कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी

आपल्या आयुष्यात आलेल्या या राजबिंड्या युवकावर या युवतीचं प्रेम जडलं आहे. दिवसा त्याच्यासोबत काम करताना एक अनामिक आनंद तिला मिळत राहतो पण रात्री उशिरापर्यंत जागी राहूनही ती फक्त त्याचाच विचार करत असते आणि रात्री पडणाऱ्या स्वप्नात मात्र त्याच्या बाहुपाशात असल्याचं स्वप्न तिचा पाठलाग करत रहातं. प्रेमाची ही भावना शब्दातून व्यक्त कशी करावी हे मात्र तिला काही केल्या सुचत नाहीये‌. म्हणून ती आपल्या प्रियकराला विचारते आहे, तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं ठरवलं कि माझ्या छातीत धडधडायला लागतं. माझं तुझ्यावर असलेलं हे अबोल प्रेम मी न सांगताही तुला कधी कळेल का? तुझ्याशी बोलत असताना मनाला खूप प्रसन्न वाटतं. तू बोलू लागलास की तुझी बोलण्याची जादू मनाला भुरळ घालते. तू कामात दंग असतोस तेंव्हाचं तुझं रूप डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. माझ्या मनात उमलत जाणारं तुझ्या प्रितीचं हे कमळ मी न सांगताही तुला कधीतरी दिसावं असं सारखं या वेड्या मनाला वाटत रहातं.

नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते
धडधडते काळीज उरी वीज नसांमधुनी घुसते
ओठांवर जे थरथरते ओळखशील का सांग कधी ?

तुझ्या नजरेला जेंव्हा जेंव्हा माझी नजर मिळते तेंव्हा काही क्षण मी तुझ्याकडे पहात रहाते पण नंतर मात्र स्त्रीसुलभ लज्जेमुळे माझे डोळे आपोआपच खाली वळतात तरीही या डोळ्यासमोर माझ्या मनमोहनाची मूर्ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत असल्याचं मला जाणवत रहातं. माझं ह्रदय उगीचच धडधडायला लागतं आणि तुझ्या नजरेतली प्रेमाची वीज नसानसात भिनल्यामुळे गोड शिरशिरी सर्वांगावर बराच वेळ तरंगत रहाते. खूपदा व्यक्त होता होता ओठांच्या काठावर येऊनही शब्दांतून व्यक्त न होणारं ही अव्यक्त प्रेमाची भावना तुला तरी कधी ओळखता येईल का? तसं झालं तर मग माझ्या इतकं भाग्यवंत कुणीही नसेल.

पैलतीरावर मूर्ती तुझी, वाट बघे मी ऐलतीरी
घुमतो पावा एक इथे, सूर भरे लहरी लहरी
कसे पोचवू गीत तुला, अफाट वाहे मधे नदी

आपण जरी रोज भेटत असलो तरी कधी कधी मला वाटतं या प्रेमनदीच्या काठावर आपण दोघेही उभे असलो तरी मी नदीच्या एका बाजूला उभी राहून तुझ्याकडे पहात असले आणि तू मला दिसत असलास तरी या नदीच्या पैलतीरावर तू उभा आहे‌स. तुझ्या ह्रदयातून निघणारे स्नेहाच्या बासरीचे सूर या शांत वातावरणातून सहजपणे माझ्यापर्यंत येऊन पोचतात. मनाला चिंब करणाऱ्या त्या सुरांमधून माझ्याही हृदयात प्रितीचं संगीत वाजायला लागतं खरं, पण ह्रदयवीणा छेडणारं हे गीत स्त्रीसुलभ लज्जेमुळे मी तुझ्यापर्यंत पोचवू शकत नाही. आता तूच या प्रेमभावना कधी समजून घेशील याची मी वाट पहाते आहे.

ताण सोसवे मुळी न हा, व्याकुळ झाला जीव आता
फुलल्यावाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा ?
साद घातली मी तुजला, देशिल ना पडसाद कधी

तुला माझं प्रेम समजावं म्हणून हा जीव व्याकुळ झाला आहे. तरीही “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे शब्द मात्र ओठांवर येऊन, प्रयत्न करूनही बाहेर यायला तयार नाहीत. मनाच्या या द्विधा मनःस्थिती मुळे निर्माण झालेला ताणही आता जास्त काळ सोसता येत नाहीये. आपली ही प्रेमाची कहाणी वाऱ्यावर उडून तर जाणार नाही ना अशी शंका हल्ली माझ्या मनात येत रहाते.
म्हणूनच सगळं धैर्य एकवटून आज मी तुला जी साद घातली आहे त्या माझ्या हाकेला तू प्रतिसाद देशील ना? तरच आपली ही प्रेमकथा फुलत राहील.

संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोड गाणं गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनीही समरसून गायलं आहे त्यामुळे हे गोड गाणं नंतरही मनाच्या एका कोपऱ्यात पार्श्वसंगीतासारखं वाजत रहातं.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. पद्मजा फेणाणी या गायिकेने गायलेल हे शांता शेळके यांच गाणं आजही प्रसिद्ध आहे. रसग्रहणासाठी आपण करीत असलेल्या गाण्यांची निवड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. नेहमीप्रमाणे आपले रसग्रहणही उत्तम झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments