Friday, December 26, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं (७७)

ओठावरलं गाणं (७७)

नमस्कार मंडळी. 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं भरभरून स्वागत.

रेडिओवर लागणाऱ्या असंख्य सुंदर गाण्यांपैकी कवितेच्या प्रांतात थोडा काळ का होईना पण आपल्या गाण्यांमधून ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर राहिलं अशा कवींपैकी एक कवी म्हणजे अशोकजी परांजपे यांचं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –

नाम आहे आदि अंती नाम सर्व काळ
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

लहानपणी रामरक्षा, शुभंकरोती यामधून आपण परमेश्वराची आळवणी करतो, प्रार्थना करतो. थोडंसं मोठं झाल्यावर गणपती अथर्वशीर्ष, गणपती उत्सव, नवरात्र यासारख्या उत्सवांमधून नकळतपणे आपण देवाच्या नावाचा गजर करीत असतो आणि म्हातारपणी हेच नामस्मरण करताना हातात जपमाळ येते आणि ती ओढता ओढता आपण परमेश्वराची प्रार्थना करत असतो, आराधना करत असतो. थोडक्यात काय तर शुभंकरोती ते जपमाळ, अशा आयुष्याच्या निरनिराळ्या वळणांवर ही जीवन नौका नाम स्मरणाच्या शुद्ध पाण्यावर तरंगत असते. फक्त काही वेळेसच आपल्याला नामाची महती जाणवते आणि नामाशिवाय तरणोपाय नाही याचीही खात्री पटते.

नामे तरीले पतित, तरिले पाषाण
नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण
नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार

सामान्य माणसाच्या आयुष्यात नामाचं महत्त्व फार मोठं आहे. “आधी केले मग सांगितले” या उक्तीला अनुसरून तुकाराम महाराज, नामदेव, चोखामेळा, मीराबाई, जनाबाई, कबीर या सर्व संतांनी आपापल्या वर्तनातून नामजपाचं महत्व विशद केलं आणि परमेश्वराने देखील त्यांना वेळोवेळी मदत करून “मला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर माझं नामस्मरण करा, मी तुमच्या हाकेला नक्की प्रतिसाद देईन” असाच संदेश दिला आहे.

संसारात राहूनही सामान्य माणूस जसा परमेश्वराशी संधान बांधू शकतो, तद्वतच दुराचारी, पापी माणसाला उपरती झाली तर पापमुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण ! वानरसेनेने प्रभू श्रीरामांचं नाव लिहून सागराच्या पाण्यात टाकलेला प्रत्येक दगड पाण्यावर तरंगू लागला आणि नामाचा महिमा असा कि भावभक्तीने घेतलेल्या रामनामाच्या सामर्थ्याने तयार झालेल्या सागरी सेतुमुळे प्रभू श्रीरामचंद्रांचा मार्ग सुकर झाला.

जंगलातील निर्जन वाटेवर लोकांना अडवून, त्यांच्याकडची चीजवस्तू लुटून गुजराण करणाऱ्या वाल्या कोळ्याला उपरती झाली आणि नामस्मरणाने वाल्याचं रूपांतर वाल्मिकी ऋषींमध्ये झालं ज्यांनी पुढील काळात रामायण लिहिलं. त्यांना हे ऋषीपद लाभलं ते केवळ नामस्मरणामुळे ! नामाची महती अशी आहे की नकळतपणे आपल्या संचितात असलेली पापं तर नष्ट होतातच पण व्यवहारी जगात वावरताना आपल्या अंगी विनाकारण आलेला बडेजाव देखील नामस्मरणाने नष्ट होऊन जातो आणि आपल्या नकळत शुद्ध मनाने आपले व्यवहार होऊ लागतात.

नाममय झाला चोखा ब्रह्मी लिन झाला
अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला
तेथे उभे पंढरीचे घेऊनी आकार

संत चोखामेळा हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. विठ्ठलाचं नामस्मरण करताना त्यांचं देहभान हरपून जात असे. असं नामस्मरण करताना संचितातील पुण्यसंचयामुळे ते स्वतःच ब्रह्मस्वरूप झाले. याउलट भागवत पुराणात सांगितलेल्या एका कथेत अजामेळ नावाचा एक माणूस होता ज्याने आयुष्यात कधी सत्कर्म केलं नाही पण पापाच्या राशी मात्र भरपूर प्रमाणात निर्माण करून ठेवल्या. त्याने आपल्या मुलाचे नाव नारायण असे ठेवले होते. आपल्या अंत्य समयी आपल्या मुलाचं नाव त्याच्या ओठावर इतक्या आर्ततेने घेतलं गेलं की नकळतच त्याच्याकडून हरिनामाचा जप झाला आणि भगवंताच्या सहज नामस्मरणाने तो पापमुक्त झाला. विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून गेल्यामुळे ब्रह्मस्वरूप झालेल्या संत चोखामेळा यांच्या देहातही पांडुरंग दिसू लागला. जणू काही विठ्ठलाची मूर्तीच उभी आहे असाही भास होऊ लागला.

नाम जपो वाचा नित्य, श्वासातही नाम
नाममय होवो देवा माझे नित्यकर्म
नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार

“नाम घेता तुझे गोविंद”, एकतत्व नाम, दृढ धरी मन”, विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी” या सारख्या गाण्यांमधूनही संतांनी सांगितलेलं नामजपाचं महत्व अधोरेखित केलं आहे. भगवंता, तुझ्या विविध रूपातून साकारलं जाणारं तुझं नाम माझ्या जीव्हेवर सातत्याने येत राहू दे. इतकंच नव्हे तर श्वासोच्छ्वासातुनही तुझंच नामस्मरण सहजपणे होत राहू दे. नित्य कर्म करत असताना देखील तुझंच नाव ओठावर खेळत राहीलं तर “मन रामरंगी रंगले” ही भावावस्था प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. नामामधून परमेश्वराची भक्ती होत रहावी आणि याच नामाच्या गजरातून त्याचं प्रेमही मिळत राहिलं तर हा भवसागर तरून जाण्यासाठी मदतच होत राहील.

संगीत दिग्दर्शक कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकताना नामजपाचं महत्व मनाला पटत जातं.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”