नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रेडिओवर लागणाऱ्या विविध भाषांमधल्या बातम्यांप्रमाणेच एकाच भाषेत विविध मूडसची गाणी रेडिओच्या या मनोरंजन माध्यमाने एकेकाळी आपल्याला दिली आहेत. आज पाहू या ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं एक सदाबहार गाणं ज्याचे शब्द आहेत –
शब्द शब्द जुळवूनी वाचिते तुझ्या मना
आवरू किती बरे नीज नाही लोचना
प्रेमाच्या जाळ्यात जी जोडगोळी फसते त्यांना तर सगळंच जग प्रेममय दिसत असतं. तरीही या जगापासून त्यांचं अस्तित्व हे थोडंसं लांबच असतं. कारण यांच्या प्रेमविश्वामध्ये तिसऱ्या माणसाला स्थान नसतं. प्रेमात पडलेली ही युवती तिच्या प्रेमविश्वामध्ये रममाण झाली आहे. आपल्या प्रियकराने लिहिलेल्या पत्रांची पारायणं करून देखील तिच्या मनाचं समाधान होत नाहीये. आपल्याविषयी जर कोणी कधी चांगले उद् गार काढले तर नंतरही अनेक वेळा ते आपल्याला आठवत राहतात तसंच काहीसं या युवतीचं झालं आहे. तुझ्या आठवणीने बेचैन झालेल्या माझ्या अस्वस्थ मनानं निद्रादेवीचं राज्य झुगारून दिलं आहे. त्यामुळे तू वेळोवेळी मला लिहिलेल्या पत्रांमधील शब्दांतून मी तुझं मन वाचण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करते आहे. तुझ्या शब्दाशब्दातून तुझं मन ओळखायचं हा माझ्या मनाचा रोजचाच खेळ आहे.
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी मी न त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी मजसी काय कल्पना
प्रेम हा अडीच अक्षरी शब्द म्हणजे खरोखरच ईश्वरी चमत्कार आहे. ही अद् भूत शक्ती आपल्या मनात कधी रूजते आणि कधी तिचं वटवृक्षात रूपांतर होतं हे आपलं आपल्यालाच कळत नाही. आता आपलीच गोष्ट बघ ना. दोघांचंही एकमेकांवर गाढ प्रेम आहे. आयुष्याची स्वप्नं दोघांनी मिळून पाहिली आहेत. दोघांच्याही मनात अजाणतेपणी ही प्रेमभावना निर्माण झाली हे खरं असलं तरी अगोदर कोणी कुणाला आपल्या मनातली प्रेमभावना मूकपणे पोचवली हे काही आपल्याला सांगता येणार नाही. मी तर या प्रेमाच्या राज्यात आंधळी, खुळी आहे असं समजलास तरीही हरकत नाही…. पण तरीही मला इतकंच समजतं कि मी तुझ्या प्रेमात पडले आहे एवढं निश्चित!
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी
तुजसी देव मानूनी घातली गडे मिठी
नीतीपाठ ओरडे हीच पापवासना
खरंतर प्रेमाच्या या जाळ्यात मी तुझ्यामुळे गुरफटले. “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” ही मंगेश पाडगावकरांची कविता मी हजार वेळा ऐकली होती. पण “तुमचं आणि आमचं देखील सेम असतं” असं जरी पुढे पाडगावकरांनी म्हंटलं असलं तरी प्रेमाची दिव्य दृष्टी तुझ्यावरच्या प्रेमानं मला दिली. आमच्या आयुष्यात आणि मनातही पतीला परमेश्वर मानतो आम्ही स्त्रिया! तुला देखील मी माझ्या मनात परमेश्वराचं स्थान दिलं पण तू भेटताच माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी तुला घटृ घट्ट मिठी मारली. तारूण्यसुलभ भावनेनं तुझ्या हातांची मिठी माझ्या बाहूभोवती पडली आणि दोनच क्षण मी तुझ्या बाहुपाशात बध्द झाले खरी पण माझ्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांनी मला सावध करत सांगितलं “वेडे, लग्नाआधी असं काही करणं हे पाप आहे, वासनेच्या आहारी जाऊ नकोस”. मी क्षणार्धात तुझ्यापासून एका झटक्यात बाजूला झाले. तू देखील आश्चर्याने स्तब्ध होऊन माझ्याकडे बघत राहिलास. मी चूक केलं कि बरोबर ते मला ठाऊक नाही तरीही माझ्या हातून जे काही घडलं त्या मुळेही मला झोप लागत नव्हती आणि म्हणूनच तू पाठवलेल्या पत्रातील शब्दांमधून पुन्हा एकदा तुझ्या मनात खरंच माझ्याविषयी प्रेम आहे का याची मी चाचपणी करते आहे.
संगीतकार दत्ता डावजेकर यांनी “सुखाची सावली” या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे गाणं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकताना गाण्यातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोचतात.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अजरामर गाणी का अजरामर असतात, ते तुमचे सदर वाचून अजून स्पष्ट होते. धन्यवाद.
फारच छान