नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणजेच मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या आगे मागे आपल्याला बाजारात वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे पतंग दिसायला लागतात. आकाशात झेपावणारे हे पतंग खूप सुंदर दिसतात. लहानपणी पतंग उडविण्याचा आनंद आपण सगळ्यांनीच घेतला आहे, त्यामध्ये असणारा थरार आपण सर्वांनी अनुभवला आहे. मित्रांनो या पतंग उडवण्यावर देखील एक गाणं आहे बरं का. काय म्हणता, आठवत नाही? सांगतो…. शब्दप्रभू गजानन दिगंबर अर्थात कविश्रेष्ठ ग दि माडगूळकर यांनी लिहिलेलं हे गाणं आहे ज्याचे शब्द आहेत –
चढाओढीनं चढवीत होते | बाई मी पतंग उडवीत होते
या गाण्यात एक तरूणी पतंग उडवते आहे आणि ती आपल्याला सांगते आहे कि आभाळात झेपावणारे पतंग पाहून मलाही हा खेळ खेळण्याची हुक्की आली. माझ्या मित्र मैत्रिणींसोबत मी पतंग आणून त्याला कणी बांधली…. लहानपणी पतंग उडवण्याची सवय असल्यामुळे इतक्या वर्षांनी हा खेळ खेळताना देखील मला मजा वाटत होती. माझ्या पतंगाप्रमाणेच आता आणखी दोन पतंग माझ्या पतंगासोबत आभाळात दिसू लागले. त्यांच्याशी स्पर्धा करायची म्हणजे चढाओढ आली त्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी हवी. मी चढाओढीने या स्पर्धेत उतरले, वाऱ्यानेही माझ्या जिद्दीला पाठींबा दिला आणि पाहता पाहता माझा पतंग आभाळात आणखी उंचावरून बदवायला मी सुरूवात केली.
होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा बारा
एकमेकांना अडवित होते
वाऱ्यालाही बहुतेक आमचा खेळ आवडला असावा. कारण वाऱ्याची आम्हाला इतकी सुंदर साथ मिळत होती कि थोड्याच वेळात आणखी काही पतंग आभाळात अवतरले. पहाता पहाता दहा बारा पतंग आभाळात झेपावत एकमेकांशी अटीतटीची स्पर्धा करू लागले. तुम्ही पतंग उडवण्यात जेवढे निष्णात असाल तेवढी या खेळातली गंमत अधिकाधिक अनुभवता येते. आता एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या चढाओढीत काही पतंगाचा मांजा तुटला आणि हवेवर लपक झपक करत वारा नेईल तसे त्या दिशेने ते जमिनीवर उतरू लागले. एकीकडे मी ही सर्व गंमत पहात होते पण त्याचबरोबर माझा पतंग जास्तीत जास्त उंचावरून उडवण्याचा प्रयत्न करतानाच त्याच्या आसपास दुसरा कुणी प्रतिस्पर्धी येणार नाही याचीही काळजी घेत होते.
काटाकाटीस आला रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
आता माझा पतंग आभाळात अगदी उंचावरून वाऱ्यावर लहरत होता. तो तसाच लहरत रहावा म्हणून मी मधेच थोडासा ढील देत होते आणि पुन्हा मांजा माझ्याकडे खेचून घेत होते त्यामुळे तो आभाळात झेपावत, लहरत असताना पहायला खूपच मजा येत होती. आभाळात उंचावर लहरणारा पतंग पाहून माझ्या मैत्रिणीला आणि मला खूप आनंद होत होता. इतर पतंगांची काटाकुटी पहाताना एखादा पतंग मध्येच काटला जात असे आणि तो घेण्यासाठी काठ्या घेऊन धावणारी लहान लहान मुलं पहाताना आम्हाला गंमत वाटत होती. उंचावरून उडणाऱ्या माझ्या पतंगावर मी भलतीच खूश होते. कारण अजूनही माझा पतंग जेवढ्या उंचीवर होता तिथपर्यंत कोणाचाच पतंग आला नव्हता. त्यामुळे बाकीच्या पतंगांमध्ये लागलेली चुरस त्या त्या मालकाच्या दैवाप्रमाणे त्या पतंगांची हारजीत घडवत होते, जे पहाताना खूप करमणूक होत होती.
माझ्या दोऱ्याने तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
मी अशी पतंगाची लढाई पाहण्यात दंग असतानाच माझ्या मैत्रिणीने आणखी एक पतंग माझ्या पतंगाशी स्पर्धा करायला येत असल्याचं सांगत मला सावध केलं. मी सावधपणे प्रतिस्पर्ध्याच्या पतंगापेक्षा माझा पतंग जरासा वरती घेवून अशी काही खेळी केली कि त्याच्या पतंगाचा पत्ता कट झाला. हे त्याला कळेतोपर्यंत लपक झपक करत पतंग जमिनीकडे झेपावत होता. गंमत म्हणजे खाली येणाऱ्या पतंगासोबत त्याला बांधलेला मांजाचा गुंता होत तो अधिकच गुंतत चालला होता. या वाढलेल्या गुंत्यामुळे कापलेला पतंग आणखीनच वेडेवाकडे गोते खात होता. एक लढाई जिंकून मी मग माझा पतंग विजयी मुद्रेने आभाळात उडवायला सुरुवात केली.
संगीतकार सुधीर फडके यांनी लाखात अशी देखणी या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांच्या खेळकर आवाजात ऐकताना पतंगांचं हे दृश्य नकळतपणे आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान.