नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” असं कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एका कवितेत म्हंटलं आहे त्याची प्रचिती आपल्याला प्रेमात पडल्यावर येतेच येते. दोन प्रेमी जीव आकाशातील चंद्राच्या साक्षीने एकमेकांना मंगेश पाडगावकर यांच्याच शब्दांत सांगत आहेत –
“हात तुझा हातातून धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज वाटतो नवा“
जगरहाटी नित्य नियमाप्रमाणे सुरू आहे. पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हे दिवस रात्रीचं सृष्टीचक्र २४ तासांच्या आऱ्यांवर जरी सुरू असलं, त्यामध्ये काही नाविन्य नसलं तरी आपल्या बाबतीत मात्र हे चक्र, ही वेळा अशीच थांबून रहावी असंच दोघांनाही मनापासून वाटतं आहे. कारण प्रेमाच्या या जाळ्यात दोघेही असे काही अडकलो आहेत कि एकमेकांच्या हातांचा उबदार स्पर्श दोघांनाही सुखावतो आहे. आपल्या दोघांची मनं पिसाप्रमाणे हलकी होऊन हवेत तरंगताहेत. आजूबाजूच्या हवेतही आपल्या मनातली धुंदी मिसळल्यामुळे बागेतली हवाही आपल्याप्रमाणेच धुंद झाली आहे. एकमेकांच्या सहवासात आणि आश्वासक मिठीत एकमेकांवरील विश्वासाची खात्री पटल्यामुळे रोजच आपली प्रणय क्रीडा आकाशातून पहाणारा चंद्र देखील आज आपल्याला नवीन वाटतो आहे. प्रेम आणि विश्वास या दोन शब्दांमधून आपल्या प्रेमाचा ताजमहाल उभा राहिला आहे ज्यामुळे आपल्याला हे सारं जग प्रेम या अडीच अक्षरी मंत्राने भारल्यासारखं वाटतं आहे.
रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परी नवीन विश्व आज सारे
हि किमया स्पर्शाची भारिते जीवा
आकाशात दिसणारे तारे, चंद्र आणि चांदण्या हे सर्व काही तसं पाहिलं तर सृष्टी नियमाप्रमाणे फिरणारं रोजचंच सृष्टी चक्र आहे. फक्त आज एकमेकांना आपल्या प्रेमाचा साक्षात्कार झाल्यामुळे रोजचंच असलेलं हे जग आज आपल्या नजरेला नवीनतेचा साक्षात्कार देतं आहे. एकमेकांच्या मिठीतून मिळणाऱ्या आश्वासक स्पर्शाची भाषा आपणा दोघांनाही समजल्यामुळे ही सर्व किमया घडते आहे कारण तुझ्या स्पर्शातून मिळणाऱ्या प्रेमाने, आपल्या माणसाविषयी जाणवणाऱ्या विश्वासाने केलेल्या या किमयेने मला जीवनाविषयी नवी दृष्टी दिली आहे आणि म्हणूनच जगरहाटी प्रमाणे सर्व काही रोजचं असलं तरी मला मात्र आज त्यामध्ये नवा तजेला दिसून येतो आहे.
या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया
मोहरले ह्रदय तसे मोहरली काया
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा
आपण आपल्या नेहमीच्या जागेवर एकमेकांच्या मिठीत विसावलो आहोत. तुझ्या स्पर्शाने माझ्या सर्वांगावर एक मोहक शिरशिरी उठते आहे जी मला सांगते आहे तुझ्या भक्कम बाहुंची मिठी अशीच कायम रहावी. कारण इतके दिवस आपल्या प्रितीविषयी वाटणारी हुरहूर आता संपून तुझ्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्पर्शाने माझ्या मनातील प्रेमभावना आता व्यक्त होऊ पहातायत आणि त्यामुळे आनंदाने माझं सर्वांग मोहरून आलंय. आकाशातील चांदण्यांची साथसंगत आणि आपल्या प्रितीचं संगीत ऐकवणारा वारा कानाशी गूजगोष्टी करतोय, हे सर्व काही आज मला हवंहवंसं वाटतं आहे.
जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा
प्रियतमे, हा क्षण आपल्या आयुष्यात यावा असं प्रत्येकाला मनातून वाटत असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण येतोच असं नाही. प्रेमाची भावना, प्रेमाची भाषा आणि प्रेमाची महती फार थोड्या लोकांना कळून येते. कित्येकांना आपल्या आयुष्यात ते कधीच मिळत नाही. प्रेम समजायला आणि समजून घ्यायला कधी कधी सात जन्म घेऊनही हे प्रेम समजून येत नाही. हा प्रेमाचा मार्ग एकदा का तुम्हाला सापडला कि मग तोच मार्ग तुम्हाला तुमच्या स्वप्नांची वाट दाखवतो आणि याच प्रेमाच्या साक्षीने सौख्याचं चांदणं तुमच्या आयुष्यात बरसात करतं आणि आपल्या स्वप्नांना आपल्या प्रियतमतेची साथ मिळाली कि आनंदाच्या जाईची फुलं निरंतर साथ देत राहतात.
क्षणभर मिटले डोळे सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे
आज फुले प्राणातून केशरी दिवा
आज माझ्या प्रेमाचा तू स्वीकार केलास आणि तुझी साथ मला मिळाली हे समजल्यानंतर सुखाच्या शोधात असणाऱ्या माझ्या आयुष्यात अचानकपणे सुखाचा, आनंदाचा हा क्षण अशा रीतीने अवतरला आहे कि माझाच माझ्यावर विश्वास बसत नाहीये म्हणून मी आनंदाने डोळे मिटून घेतले. तेंव्हा मला दिसलं नदीच्या पात्रात दिसणारा पूर्ण चंद्र हर्षाचं रूप धारण करून माझ्या नसानसातून वाहतो आहे. केशरी रंगाने आकाशात केशरी रंगाची उधळण झाल्यावर पूर्व दिशा जशी झळाळून उठते तशीच ही प्राणज्योत आज झळाळून उठली आहे. याला कारण आहे तुझी माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पुढील आयुष्यात मला मिळणारी तुझी साथ, तुझा सहवास आणि तुझं प्रेम!
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचं संगीत लाभलेलं हे द्वंद्वगीत ऐकताना अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या तरल आणि मुलायम आवाजाची जादू बराच काळ मनावर रेंगाळत राहाते.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
फारच सुंदर.
खूपच छान