नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन: पूर्वक स्वागत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी “अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी”, “,असा बेभान हा वारा”, “उठ रे राघवा, उघड लोचन आता”, “जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा” अशी आपले कान, मन तृप्त करणारी असंख्य गाणी आपल्याला रेडिओच्या माध्यमातून दिली आहेत. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या असंख्य गाण्यांमधून एक गाणं आज आपण पाहू या ज्याचे शब्द आहेत –
जेंव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली
आपल्या प्रेयसीला भेटायला उत्सुक असलेला हा तरूण कधीपासून तिला भेटायचा प्रयत्न करत होता. बरं, तिलाही त्याला भेटायचं होतं. पण या प्रेमी युगुलांना असं वाटत असतं कि आजुबाजुच्या कोणी किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणीही त्यांची भेट पाहू नये. म्हणूनच कोणाच्या लक्षात येणार नाही, कोणाचं सहसा आपल्याकडे लक्ष जाणार नाही असं एखादे ठिकाण ते या भेटीसाठी ठरवतात. अशा चोरून भेटण्यामध्ये देखील एक थ्रिल असतं तेही त्यांना अनुभवायचं असतं. अशा प्रकारे “चोरी चोरी, छुपे छुपे” हे प्रेमी युगुल एकमेकांना भेटल्यामुळे हा युवक मनातून अतिशय खूष झाला आहे. आपल्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट किंवा घटना जर घडली तर ती आपल्याला लगेचच कोणाला तरी सांगावीशी वाटते. हा प्रेमी युवक देखील याला अपवाद नाही. प्रेयसीची भेट ही त्याच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटना सांगताना आपला आनंद त्याला लपवता येत नाहीये. त्यामुळे त्या प्रसंगाचं वर्णन करताना तो सांगतो आहे कि आम्ही दोघांनीही एकमेकांना चोरून भेटायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलोही आणि आमच्या या भेटीमुळे बागेतल्या झाडावरच्या कळ्यांना हसू फुटलं आणि त्यांच्या हास्याची फुलं फुलताना इतर झाडावरील फुलांना बहर येऊन आम्हा दोघांवरही सुगंधी फुलांची बरसात झाली.
दुरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन् पालखी निघाली
आमची भेट कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून आम्ही भल्या पहाटे भेटायचं ठरवलं. मला तिला भेटायची जास्त उत्सुकता होती म्हणून मी थोडासा आधीच तळ्याच्या काठावर जाऊन तिची वाट पहात बसलो. आजुबाजुला पहात असताना माझ्या लक्षात आलं ते म्हणजे रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड तर मला बसल्या जागेवरून दिसत होता पण एका ओळीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समान अंतरावरून प्रकाश देणारे ते दिवे पाहून मला असं वाटलं कि माझ्या प्रेयसीच्या स्वागताला कोणी तरी मणिहार घेऊन उभं आहे. आकाशात पडलेलं टिपूर चांदणं तर जसंच्या तसं नदीच्या संथ प्रवाहात जसंच्या तसं प्रतिबिंबित झालं होतं. अजूनही माझी प्रियतमा आली नव्हती पण ती येत असल्याची जणू काही चाहूल लागल्याप्रमाणे काही काजव्यांची पालखी तिचं स्वागत करण्यासाठी तिच्या वाटेकडे जात असलेली मला दिसली.
केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली
पाण्यामध्ये दिसणारं आकाशातील चांदणं पहात नदीच्या काठावर मी आतुरतेने तिची वाट पहात होतो. अचानक पहाटेच्या अंधारातून जुईच्या फुलांचा सुवास दरवळत माझ्यापर्यंत येऊन पोचला. माझी प्रेयसी मला भेटायला येत असल्याची पोचपावती मला मिळाली. तो सुगंध माझ्यासभोवती दरवळला आणि मला दिसलं कि तिनेच केसांत माळलेल्या जुईच्या फुलांचा सुवास पहाटेच्या अंधारालाही व्यापून राहिला होता. तीदेखील भेटीच्या ओढीने धावत पळत इथपर्यंत आली होती. तिच्या धपापणाऱ्या श्वासालाही एक लय होती, आवेग होता. तिने मला मारलेल्या मिठीमध्ये मात्र समर्पण भावना होती जी तिने शब्दातून व्यक्त न करता कृतीतून सिद्ध केली होती.
नव्हतेच शब्द तेंव्हा मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली
कधी कधी शब्दांमधून अर्थ सांगिल्याशिवाय समोरच्या माणसाला आपलं मन कळत नाही, आपलं बोलणं समजत नाही. इथे मात्र तसा काही प्रकार नव्हता. तिने न बोलता केलेल्या कृतीला नक्कीच काहीतरी अर्थ होता आणि तो माझ्यापर्यंत तिने न बोलता केलेल्या कृतीतून, तिच्या मौनातून माझ्या हृदयापर्यंत व्यवस्थितपणे पोचला होता. तिच्या स्पर्शातून चंद्राची शीतलता अनुभवायला मिळत होती त्याचबरोबर उत्सुकता, आवेग, स्नेह, ओढ, समर्पण भावना असे अनेक स्पर्श तारे माझ्या नजरेला दिसत होते. तिने मारलेल्या मिठीत स्पर्शफुलांचा वर्षाव तर अनुभवायला मिळत होताच पण त्याचबरोबर सकाळी सकाळी बागेतल्या झाडांवरची फुलंही आमच्या मीलनाला त्यांच्या पाकळ्यांमधून हलकेच स्मित करून प्रतिसाद देत होती. आमच्या मिलनाचा हा क्षण असाच गोठून रहावा, हा क्षण पुढे सरकूच नये असंच आम्हाला दोघांनाही वाटत होतं.
संगीतकार यशवंत देव यांचं मनाला मुग्ध करणारं संगीत आणि ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या मुलायम आवाजात हे गाणं ऐकत असताना ते हळूहळू आपल्या ह्रदयात झिरपत जातं आणि मग कितीतरी वेळा ते पुन्हा पुन्हा आपल्या मनात वाजत रहातं.
– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नेहमीप्रमाणेच गाण्याची निवड व त्यावर आपण लिहिलेले रसग्रहण सुंदर झाले आहे.
अतिशय सुरेख रसग्रहण
धन्यवाद विराग 🙏
गाणं तर अप्रतिम आहेच पण त्याचं रसग्रहणही खूप सुंदर केलंय विकासजी👍👍👍
धन्यवाद अजितजी 🙏
अतिशय सुरेख ,भावे सर छानच
धन्यवाद पद्माकरजी 🙏
सुरेख
धन्यवाद नीना मॅडम 🙏
अतिशय सुरेख रसग्रहण.
धन्यवाद नीना मॅडम 🙏
फारच छान गाणे आणि आस्वाद पण.
धन्यवाद गौरव 🙏