नमस्कार, मंडळी .🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. एकेकाळी मनोरंजनाचं एकमेव साधन म्हणून ऐकला जाणारा रेडिओ आता जरी फारसं कुणी ऐकत नसलं तरी अजूनही काही घरातून सकाळी सहा वाजता एफ एम रेनबो मुंबई या केंद्रावरून लागणारी मराठी गाणी आवर्जून ऐकली जातात. त्यामुळे अजूनही ग दि माडगूळकर, रवींद्र भट, रमेश अणावकर, गुरूनाथ शेणई, वसंत बापट, मंगेश पाडगावकर अशा काही नावांबरोबर आणखी एक नाव असं आहे जे कोणीही रसिक श्रोता विसरू शकत नाही…… ते म्हणजे ठाणे शहराचं भूषण कविवर्य पी सावळाराम !
पी सावळाराम म्हंटलं कि “गंगा यमुना डोळ्यात उभ्या का” हे गाणं हमखास आठवतं. आज मात्र आपण पहाणार आहोत कवीश्रेठ पी सावळाराम यांनी लिहिलेलं “बाळा होऊ कशी उतराई” हे गाणं ज्याचे शब्द आहेत –
“बाळा होऊ कशी उतराई | तुझ्यामुळे मी झाले आई”
“जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा” असा आपल्या आईचा भावपूर्ण निरोप घेऊन सासरी निघालेली स्त्री आपल्या संसारात रमते आणि यथावकाश आई देखील होते. प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या मनाशी जपलेलं एकमेव स्वप्न म्हणजे आई होणं. म्हणूनच एक आई त्या लहान मुलाला हातात घेऊन त्याला सांगते आहे कि मी जरी तुला जन्म दिला असला तरी ह्या मातृत्व पदावर विराजमान होण्याचं महद् भाग्य मला केवळ तुझ्यामुळे मिळालं आहे. “तुझी आई” म्हणून आता जन्मभर हे भाग्य मला लाभणार आहे, खरंच तुझी कशी उतराई होऊ मी तेच मला कळत नाहीये.
तुझ्या मुखाचे चुंबन घेता हृदयी भरते अमृत सरीता
नवसंजीवन तुला पाजिता संगम होता उगमा ठायी
गाई झुरूझुरू तुज अंगाई
नऊ महिने तुला पोटात वाढवलं मात्र “मी आई होणार” ही भावना एवढी प्रबळ होती कि मला कधीच तुझा भार झाला नाही. उलट तू या दुनियेत येण्याची वेळा जशी भरत आली तशी एक अनामिक हुरहूर आणि उत्कंठा मनात रेंगाळत राहिली. नर्सने जेंव्हा तुला माझ्या हातात दिलं ना तेंव्हा जगातली सर्व सुखं माझ्यासमोर हात जोडून उभी राहिल्याचा भास मला झाला. तुझ्या जावळावरून हात फिरवताना मनात आनंदाच्या उर्मी उठत रहातात. तुझ्या मुखाचं चुंबन घेतल्यावर ह्रदयातली वात्सल्य गंगा दुथडी भरून वाहू लागते. त्या वात्सल्य गंगेचं नवसंजीवन जेंव्हा तुझ्या इवल्याशा ओठातून तुझ्या मुखात जातं तेंव्हा समाधान आणि तृप्तीचं तेज माझ्या चेहऱ्यावर विलसत असतं. माझ्याही नकळत त्यावेळेस तुला झोप लागावी म्हणून अंगाई गीत माझ्या ओठांवर येतं. माझा छकुला माझ्या मांडीवर शांतपणे झोपी जातो आणि मी त्याला डोळे भरून पहात रहाते.
माय भुकेला तो जगजेठी तुझ्या स्वरूपी येऊन पोटी
मंत्र आई जपता ओठी महान मंगल देवाहून मी
मातृदैवत तुझेच होई
माझ्या सोनुल्या “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. बाळा, हा देवबाप्पा सुध्दा “आई”अशी साद घालण्यासाठी आसुसलेला आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खरंतर तोच तुझ्या रूपाने माझ्या पोटी जन्माला आला आहे. तुझ्या रूपाने माझ्या पोटी आलेला तो परमेश्वर जेंव्हा मला “आ sई” अशी लाडीक हाक मारेल तेंव्हा त्याची इच्छा तर पूर्ण होईलच पण माझ्याप्रमाणेच प्रत्येक आईला त्याने त्याच्यापेक्षा उच्च स्थानावर जागा दिलेली असते आणि म्हणूनच मोठा झाल्यावर तुला तुझे शिक्षक “मातृदेवताभ्यो नम:” अशी शिकवण देतील.
ज्येष्ठ संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं लता मंगेशकर यांच्या गोड आवाजात ऐकताना आपलेही पाय गाणं संपेपर्यंत जमिनीला खिळून रहातात आणि गाणं संपल्यावर देखील कविवर्य पी सावळाराम यांचे शब्द हृदयात घर करून रहातात.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खरंच ऊत्तम रसग्रहण.
धन्यवाद विराग 🙏
बहुतेक सर्व गाण्यांच्या एक किंवा दोन ओळी माहित असतात. पण विकास काकांमुळे प्रत्येक गाण छान समजून येतं. शेवटच्या ओळी कधी लक्षातही आल्या नाहीत. त्याचा अर्थ नीट समजला. उत्तम. परिपूर्ण.
धन्यवाद वीणा 🙏