Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं ( ९२ )

ओठावरलं गाणं ( ९२ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. लग्नानंतर मुलीची सासरी पाठवणी करताना एक आई आपल्या लाडक्या मुलीला निरोप देताना तिला आवश्यक असा सल्लाही देते जो कविवर्य पी सावळाराम यांनी “जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा” या आशा भोसले यांच्या आवाजातील गाण्यातून आपल्यापर्यंत पोचवला आहे. हे गाणं त्या काळात जेवढं आवडतं असे तेवढंच आणखी एक गाणं रेडिओवर लागत असे ज्या गाण्याचं स्थान रसिकांच्या ह्रदयात आजही कायम आहे. असं हे सुंदर गाणं लिहिलं आहे ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

नकोस नयनी भरु आसवे देऊ नको हुंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके

आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि आईचे उपदेशपर शब्द मनात साठवून सासरच्या घरात प्रवेश केला तरीही माहेरचे मायेचे धागे पाश सोडायला तयार नाहीत. माहेरच्या माणसांच्या आठवणींनी या नववधूचे डोळे पुन्हा भरून येतायत, गळ्यात दाटून आलेले हुंदके तिच्याही नकळत बाहेर पडतायत. आपल्या सुनेची ही अवस्था पाहून तिची सासू आईच्या मायेने तिला जवळ घेऊन सांगते आहे कि अग वेडे, मला ठाऊक आहे तुला या क्षणी तुझ्या आईवडीलांची आणि माहेरच्या माणसांची तीव्र आठवण येते आहे. पण आता रडू नकोस बाळा. कारण तू आता आपल्या घरची सून असलीस आणि मी जरी तुझी सासू असले तरी गृहलक्ष्मी या नात्याने आज तू आमच्या घरात प्रवेश करते आहेस. तेंव्हा आता डोळे पूस बरं. कारण गृहलक्ष्मीचा मान मिळाला असला तरी गृहलक्ष्मीच्या जबाबदाऱ्या ही आता हळूहळू तुलाच पार पाडायच्या आहेत…. पण ती नंतरची गोष्ट ! सूनबाई, तुझ्या आईच्या जागी आज मी उभी आहे आणि तू या घराची लक्ष्मी आहेस …. बस्स… एवढंच आज तू लक्षात ठेव.‌

तुझ्या पाऊली येईल आता
आनंदाची असेल सरीता
घरकुल आमुचे प्रसन्नतेने होईल ग बोलके

लग्न म्हणजे दोन घरांना आणि दोन मनांना जोडणारा दुवा आहे…. आयुष्याच्या वळणावर आलेला हा छोटासा साकव आहे जो नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करत जातो. माहेरच्या अंगणातून सासरच्या माणसांमध्ये आज जरी तू नवखी असलीस तरी तुझ्या लक्ष्मीच्या पावलांनी तू अदृश्य रुपातील आनंद घेऊन आली आहेस. तुझ्या सुस्वभावी वागणुकीने तू सासरच्या माणसांची मनं जिंकल्यावर तुझ्याही नकळत आनंदसरिता तुझ्या रूपाने या घरात खेळायला लागेल याचा मला विश्वास आहे. या आनंदसरितेचा घरातील सर्व माणसांना निश्चितच फायदा होईल आणि आपलं घरकुल सतत हसतंखेळतं राहील. तुझी दुसरी आई या नात्याने तुझ्या नवऱ्याकडून आणि घरातल्या इतर सदस्यांकडून तुझा योग्य तो सन्मान राखला जाईल असा विश्वास मी तुला देते.

इथे अंगणी किती नाचतील
तुझ्या स्मितासम सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातून येतील या सदनी माणिके

तुझ्या मोहक हास्याने आणि गोड बोलण्याने तुझ्या माहेरी जशा तू मैत्रिणी जोडल्या असशील तशाच नवीन मैत्रिणी इथेही तुला मिळतील याची मला खात्री आहे. आईने तुला “जबाबदारीने वाग”, “मोठ्याने हसू नकोस”, “मोठ्या माणसांशी विनम्रपणे वाग” असा सल्लाही दिला असेल. तुझ्या नवीन जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून, आपल्या मनमोकळ्या स्वभावाने आणि वात्सल्य पूर्ण वागण्याने तू सासरच्या मंडळींना तर जिंकून घेशीलच पण तुझ्या वयाच्या मैत्रिणी देखील जोडत जाशील याची मला खात्री आहे. तुझ्या सहवासात येणाऱ्या नवीन मैत्रिणींनी पुन्हा एकदा चैतन्य आणि आनंद यांनी हे घरकूल भरून जाईल.

नको बावरू मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणांची गंगा आता पाहू दे कौतुके

माहेरच्या घरावर तर तुझा हक्क आहेच पण सुनेच्या नात्याने जरी तू सासरच्या घरात पाऊल ठेवलं असलंस तरीही या घराचा सर्व अधिकार आणि जबाबदारी तुझ्यावर सोपवून आज मी निश्चिंत होते आहे. तू तुझी जबाबदारी निश्चितच निभावून नेशील याची मला खात्री आहे, म्हणूनच मी माझा हा निर्णय तुला सांगते आहे‌. या घराला तुझ्या अंगीभूत गुणांचीही तेवढीच जाणीव आहे. तुझ्या गुणांची इथे कदर केली जाईल. जेंव्हा तुझ्या गुणांचं चीज होण्याची संधी येईल तेंव्हा तेंव्हा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिन हा शब्द मी तुला सासू म्हणून नाही तर आई या नात्याने देते.

जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक म्हण आहे. संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेलं आणि शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गाणं जुनं असलं तरी माणिक वर्मा यांच्या आवाजात ऐकताना आजच्या काळाशी ते सुसंगत असल्याचं जाणवतं.

विकास भावे

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments