Friday, May 9, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏
हल्ली रेडिओ जरी जास्त ऐकला नाही, तरीही काही काही गाणी ही आपल्या मनात रुंजी घालत असतात आणि पुन्हा कधी जर ते गाणं ऐकलं, कि मग दिवसभर तेच गाणं आपला पाठलाग करत करत रहातं.

मित्रहो, “ओठावरलं गाणं” या सदरात आज पाहु या,

कविवर्य वा रा कांत यांनी लिहिलेलं हे गाणं ज्याचे शब्द आहेत –
खळेना घडीभर ही बरसात
दिवस संपला नागीण काळी उतरे सरसर रात

गाण्यातील तिच्या प्रियकरानं निरोप दिला आहे कि मी तुला भेटायला येणार आहे. या निरोपाने तिच्या मनावर अशी काही जादु केली कि आनंदाने नाचायचं फक्त बाकी होतं. पण सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे तिला जो काही आनंद झाला होता, तो सगळा आनंद पावसाच्या पाण्यात वाहून गेला कारण पावसाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत, घराच्या पत्र्यावर जो काही ताल धरलेला आहे तो ऐकून सैरभैर झालेल्या तिच्या मनात नको नको ते विचार येतायत.

दिवसाची सर्व कामं तर बाजुला राहिलीच पण घराभोवती कडकलक्ष्मी प्रमाणे नाचणा-या या पावसामधे माझा प्राणसखा इथपर्यंत कसा काय येणार याचीच तिला जास्त काळजी वाटते आहे. आधीच चारी दिशांतून अंधारून आलं आहे, पावसाचं तर थोडा वेळ सुध्दा उसंत घेण्याचं लक्षण दिसत नाहीये आणि आता पावसासोबत काळ्या नागिणीच्या गतीने रात्र सरसरत येते आहे.

नक्षत्रांसह दिशा लोपल्या
वाटा अंधाराने गिळल्या
असेल कोठे सखा पाऊले वाजती जरी थेंबात

एरवी घराच्या खिडकीतून आकाशातल्या चांदण्या मोजत मी तुझ्या आठवणींवर रात्र जागवत असते पण आज मात्र दाही दिशांना फक्त अंधार, अंधार आणि अंधारच मला दिसतो आहे. दाही दिशांना आकाशात रोज दिसणा-या नक्षत्रं, तारका आणि चांदण्यांनासुध्दा या रात्र नावाच्या अजगरानं गिळलं आहे. असं जरी असलं तरी खिडकीतून गळणा-या पागोळ्यांच्या थेंबांच्या आवाजातही मला माझ्या प्रियकराच्या पावलांचा आवाज ऐकू येतोय आणि खरोखरच तो आला असं वाटून मी कित्येकदा दरवाजापर्यंत जाऊन डोकावून पहाते आहे.

गडगडणे थांबवा घनांनो
कडकडणे आवरा वीजांनो
बायांनो का तुम्हाही न कळे स्त्री ह्रदयाची मात

सखा आला असं वाटून मी दरवाजापर्यंत जाते आणि लगेचच ढगांच्या गडगडाटाच्या आवाजाने मला घाबरायला होतं. गडगडाटाच्या तालावर मग विजांचाही थयथयाट सुरू होतो आणि पावसाच्या कोसळणाऱ्या सरींच्या संगीतात काही क्षण हा खेळ सुरूच रहातो. ढगांचा गडगडाट मी समजू शकते. पुरूषांना विनाकारण आरडाओरडा करायची सवयच असते पण स्त्रीच्या मनाचा होणारा कोंडमारा या विद्युल्लतांना समजू नये ? बायांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, निदान तुम्ही तरी या ढगांना साथ देऊ नका.

असेल आला पैलतटावर
येऊ द्या ग त्याला इथवर
संथ वहा ग सरीते तू ही येतो माझा नाथ

कितीही जोरदार सरी कोसळल्या, कितीही गडगडाट झाला आणि विद्युल्लतांनो, तुम्ही कितीही थयथयाट केला तरी दिलेल्या शब्दाला जागणारा माझा प्राणनाथ पैलतटापर्यंत नक्कीच आला असेल. तेंव्हा आता वरूणदेवते तू तुझ्या जलधारा आवरत्या घे आणि सरीते, किमान तू तरी तुझा प्रवाह संथ ठेव जेणेकरून माझा प्राणसखा सुखरूप घरापर्यंत येईल.

बाळ बर्वे यांनी संगीतबध्द केलेलं आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं

हे गाणं जेंव्हा तुम्ही ऐकाल तेंव्हा तुम्हाला या रसग्रहणाची नक्की आठवण होईल. धन्यवाद. 🙏

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. काही गाणी अशी आहेत की ती ऐकून जरी बराच कालावधी लोटला असला तरी त्याची आठवण होताच ते नकळत ओठावर येते. असंच हे अतिशय हृदयस्पर्शी गीत. श्री. विकास भावे यांनी केलेल्या यथायोग्य रसग्रहणातून गाण्यात वर्णन केलेले सर्व भाव पुनर्जीवित झाले ! खूप सुंदर शब्दांकन !! 👌👌👍👍💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास