Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत ! कालच कोजागिरी पौर्णिमा झाली. आपल्यावरील निर्बंध आता थोडेसे सैल झाल्यामुळे काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचं निमित्त साधून गाण्याचे कार्यक्रम सादर झाले असतील. काही जणांनी घरातल्या घरात मसाला दुधाचा आस्वाद घेत आकाशात पसरलेलं चंद्राचं चांदणं आणि पूर्ण चंद्र पाहिला असेल.

या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आज पहाणार आहोत कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं एक प्रेमगीत ज्याचे शब्द आहेत –
“चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोग-याच्या पाकळयांची मखमाली बरसात आहे”

आकाशात पसरलेल्या चांदण्यांचा अंगरखा घालून आलेल्या पूर्ण चंद्राचं विलोभनीय दर्शन होणं ही भाग्याची गोष्ट तर खरीच पण त्याचबरोबर इतके दिवस विरहात जागवलेल्या रात्रींची अस्वस्थता आज पूर्णपणे नाहीशी झाली आहे. कारण आजच्या शुभदिनी मला माझ्या आवडत्या माणसाची – माझ्या प्रियकराचीही साथ मिळते आहे. मनात फुललेल्या सौख्य मोग-याच्या पाकळ्यांची आनंद बरसात या वेळी आम्हा दोघांवरही होते आहे. चांदण्या रात्रीच्या आमच्या चोरट्या भेटींना चांदणं साक्षीला असायचं. आज मात्र कोजागिरी पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र आम्हाला शुभाशिर्वाद द्यायला आला आहे.

मंद वाहे धुंद वारा
दूर सागरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव नौका जात आहे

एकमेकांच्या बाहुपाशात एकमेकांना घट्ट बिलगून जरी आम्ही बसलो असलो तरी आमच्या भोवताली मधेच घुटमळणारी ही वा-याची मंद झुळूक मनाला आणखीनच धुंद करते आहे. “जिवलगा कधी रे येशील तू” असं मनाशी गुणगुणत तुझी वाट बघण्याचा माझा नित्याचा परिपाठ दूरच्या सागरी किना-यालाही ठाउक आहे. इतके दिवस तुझी वाट पहात असताना मी त्याच्यापाशी माझं दुःख सांगायचे ‌‌.. अमृतानुभवाच्या सागरातून प्रवास करणाऱ्या आपल्या दोघांचं सुख आज मात्र तो लांब उभा राहून पहातोय.

ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे

आपल्या माणसाचा – प्रियकराचा खंबीर आधार जेंव्हा आम्हा स्त्रियांना मिळतो तेंव्हा आम्हाला होणा-या आनंदाची कल्पना पुरूषांना येणार नाही. या सुखाच्या क्षणांप्रमाणेच आयुष्यात येणाऱ्या संकटांशी, क्वचित प्रसंगी निर्माण होणाऱ्या समस्या रूपी वादळाशी अथवा गैरसमजाच्या धुक्याशी सामना करण्याची एक अलौकिक ताकद “केवळ माझं प्रेम माझ्या सोबत आहे” या भावनेतून आम्हा स्त्रियांमध्ये निर्माण होते. माझ्या प्रियकराची साथ हाच जन्म नाही तर जन्मोजन्मी मिळत रहावी हीच प्रार्थना कोजागिरीच्या चांदण्याला आणि या चंद्राला साक्षी ठेवून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मी करते आहे.

“विदुषक” नाटकातलं हे गाणं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलं असून आशालता वाबगावकर यांच्या आवाजात ऐकताना कोजागिरी पौर्णिमेचं मधाळ चांदणं पसरल्याचा भास होतो.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

14 COMMENTS

  1. गाण, कविता, पुस्तक काहीही असले तरी त्याच रसग्रहण वाचाव ते फक्त विकास भावे सरांच्या शब्दात…. सहज, सोप्या भाषेत वाचकाला अर्थ सांगण्याची तुमची शैली एकमेवाद्वितीय …. कधी माहित नसलेली गाणी समजतात तर कधी ऐकीव गाणी अर्थ लेवून परत एकदा समोर येताय आणि मग ती परत परत गुणगुणावीशी वाटतात…👏😍👏

  2. खूप सुंदर . हे गाणं फारसे कोणी ऐकले नसावे.
    पण तुम्ही ह्या माध्यमातून हे गाणं
    आमच्या पर्यंत पोचवले

  3. ना तमा आता तमाची…खूपच छान रसग्रहण.या प्रेमामुळे शारदीय चांदणं अधिकच दुधाळ झाल.मंद आहे …धुंद वारा… सागरी किनारा… अशातच प्रेमीकांना बळ मिळत.
    चांदणं जणू त्यांनाच भैटायला आलं आहे तमा कशाची मग ? छान रसग्रहण.

  4. फारसं ऐकण्यात न आलेल परंतु सुंदर रचना असलेल हे गाणे आपण रसग्रहणासाठी निवडल्याबद्दल अभिनंदन. नेहमीप्रमाणे रसग्रहण छान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments