नमस्कार, मंडळी 🙏
रेडीओवर प्रेम करणा-या सर्व रसिक श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंत प्रत्येक दिवाळीच्या दिवशी रेडीओवर पूर्वापार आलेल्या पध्दतीनुसार पहाटे किर्तनाचा कार्यक्रम होत असतो. त्यानंतर सहा वाजल्यापासून आपली गाणी सुरू होतात. दिवाळी आल्याचा आनंद आपल्याप्रमाणेच हा रेडीओदेखील साजरा करत असतो.
मित्रहो, दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आज पाहू या.. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं आनंदानं ओथंबलेलं एक दिवाळीचं गाणं ज्याचे शब्द आहेत –
“आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली“
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव ! दिवाळी म्हणजे प्रकाश !! दिवाळी म्हणजे आनंद !!! छोट्या दोस्तांसाठी आणि मोठ्या माणसांसाठीही. आकाशात दिसणा-या, डोळ्यांना सुखावणा-या आणि मनाला लुभावणा-या या इंद्रधनुष्याचे सप्तरंगात न्हाऊन हि दिवाळी जणू सौंदर्यवतीचं रूप धारण करून माझ्या अंगणात येऊन उभी आहे.
मधुसूदन कालेलकर यांनी जरी “अष्टविनायक” या चित्रपटातील नायिकेसाठी हे गाणं लिहिलं असलं तरी या ओळींमधून मात्र आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावना व्यक्त होतात.
मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्मजन्म रे तुझ्या सोबती एकरूप मी व्हावे
प्रीत नयनी दिसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
पहाट जसजशी पुढे सरकेल तसतसा आकाशातल्या चांदण्यांचा प्रकाश हळूहळू मंद होत जाईल. आत्ता मात्र तुझ्या आठवणीने उर धपापतोय, श्वासाची गती वाढल्यासारखी वाटते आहे तरीही चांदण्याचा मंद प्रकाश, धपापणारा श्वास मला हवाहवासा वाटतो आहे याचं कारण एकच …. तुझ्या आठवणीच्या हिंदोळ्यावर रमणारी मी आणि माझ्या ह्रदयावर राज्य करणारा तू !
आपलं जरी नवीन लग्न झालं असलं तरी ओळख मात्र जन्मजन्मांतरीची आहे. माझ्या डोळ्यात तुझ्याविषयीची प्रेमभावना डोकावते आहे, तर गालावरच्या खळीतून आणि लालीतून स्त्रीसुलभ लज्जाही हळूच डोकावून पहाते आहे. नवीन शालू नेसून, दागिने घालून आणि कपाळावर चंद्रकोर रेखून तुला भेटण्यासाठी म्हणून तुझ्या वाटेकडे मी डोळे लावून बसले आहे.
पाऊल पडता घरी मुकुंदा गोकुळ हरखून गेले
उटी लाविता अंगी देवा सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
तुझं पाऊल घरात पडताक्षणी धावत येऊन तुझ्या मिठीत शिरावं असा विचार तेव्हढ्या एका क्षणात कैकदा माझ्या मनात येऊन गेला. मात्र तुला पाहिल्यावर माझ्याप्रमाणेच सासू सासरे, दीर नणंदा आणि बाळगोपाळांच्या चेहे-यावरचा आनंद पाहिला आणि मी स्वतःला सावरलं. आता दिवाळीच्या आंघोळीआधी तुला उटणं लावत असताना हव्याहव्याशा वाटणा-या तुझ्या स्पर्शामुळे माझ्या शरीरावर गोड शिरशिरी उठते आहे तर उटण्याच्या सुगंधाने मन अधिकच धुंद होते आहे. रेडीओवर लागलेल्या भूपाळीच्या सुरातून माझ्या मनातल्या भावनाच जणूकाही व्यक्त होतायत असा भास होतो आहे.
नक्षत्रांचा साज घेऊनी रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
तुझी वाट पहात असताना रात्रीच्या वेळी आकाशात दिसणा-या नक्षत्रांच्या सौंदर्याचा साज चढवून जणुकाही रात्र या धरतीवर उतरली होती आणि तुला पाहिल्यावर तुझी वाट पहात असलेल्या माझ्या डोळ्यांत उजळलेल्या नंदादीपांनी मला सांगीतलं “बघ, तुझे पतीराज घरी आले आहेत …. आता ख-या अर्थाने तुझी दिवाळी सुरू झाली आहे”. राधेच्या आतुरतेने माझ्या श्रीकृष्णाची वाट पहाणारी मी तो आल्यावर नजरेच्या खुणेने “किती उशीर केलास” म्हणून त्याला दटावणार होते, पण आता त्याच्याकडे पहायला देखील माझी नजर टाळाटाळ करते आहे. सगळ्याच मुलींचं असं होतं कि हे फक्त माझ्या बाबतीत होतंय काही कळत नाही पण आता दिवाळी मात्र मस्त जाणार याची मला खात्री आहे.
संगीतकार अनिल-अरूण यांनी गाण्याचा मूड ओळखून दिलेल्या संगीतामध्ये आपला आनंदी आवाज बेमालूमपणे मिसळून अनुराधा पौडवाल यांनी गाण्याची नस अचूक पकडली आहे ज्यामुळे या गाण्याबरोबर आपले पायही ताल धरतात एवढं मात्र नक्की !

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
कवीच्या मनातील भावनांचे शब्दांकन अचूक केले आहे व गण्यची चाल व आवाज यांना पण योग्य शब्दात दाद दिली आहे. फारच छान.
दिवाळीच्या मुहूर्तावर पाठवलेलं हे गाणं ….. नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांची दिवाळी मस्त जाणार …. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा …..
छान आहे गाणे. लिखाण ही चांगले
धन्यवाद गौरव 🙏
अष्टविनायक या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांपैकी हे एक गाणं. दिवाळीच्या निमित्ताने या गाण्याची रसग्रहणासाठी आपण केलेली निवड योग्यच आहे. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले गीत, अनिल अरुण यांचं संगीत व अनुराधा पौडवाल यांचा आवाज तसेच आपण केलेले रसग्रहण सारेच उत्तम झाले आहे. पुन्हा एकदा आपणास व भुजबळ यांना हे सदर चालू केल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद विवेकजी 🙏