Tuesday, September 16, 2025
Homeकलाओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏
ओठावरलं गाणं ” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत ! दिवाळीच्या चार दिवसांमधला आनंदाचा दिवस म्हणजे भाऊबीज जो आपण सर्वांनी चार दिवसांपूर्वी साजरा केला. लहानपणी आपल्याला या भाऊबीजेच्या दिवसाची खूप गंमत वाटत असे. मोठेपणी मात्र बहिण भावाच्या प्रेमाचा हाच धागा आणखी घट्ट विणला जातो ज्यामधून हे नातं आणखी दृढ होत जातं. आज आपण पहाणार आहोत कृष्ण गंगाधर दिक्षित उर्फ कवी संजीव यांनी “भाऊबीज” चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत –

“सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे I वेड्या बहिणीची वेडी ही माया

गाण्याच्या ओळींवरून समजतं कि दिवस दिवाळीचे आहेत आणि दिवाळी म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणी असते. फटाके, फराळ आणि ज्या दिवसाची लहान मोठे सारेच उत्सुकतेने वाट पहात असतात तो भाऊबीजेचा दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस. अशा या भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळायला मिळणार म्हणून आपल्याला झालेला आनंद हि बहिण नाचून आणि गाण्यातून व्यक्त करते आहे.

माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्र सूर्याची |
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहू दे छाया रे |

माहेरची ओढ, माहेरची माया, माहेरची माणसं, या सगळ्या गोष्टींचं मोल स्त्रीच्या दृष्टीने अनमोल असतं आणि म्हणूनच कवीनं पृथ्वीमोल हा योग्य शब्द योजला आहे. पृथ्वीवरच्या कोणत्याही गोष्टीचं जसं मोल होऊ शकत नाही तद्वतच माहेरची माया आहे आणि याला साक्ष चंद्र आणि सूर्य यांची आहे. अशा या घरात ‌हा भाऊराया मला भेटला म्हणजे जणू काही कृष्ण आणि द्रौपदी या बहिण भावाचीच भेट झाली आणि कृष्णानं जसं द्रौपदीला बंधूप्रेम दिलं तसंच प्रेम मलाही तुझ्याकडून आयुष्यभर मिळत राहू दे असंच हि बहीण म्हणत आहे.

चांदीचे ताट नि चंदनाचा पाट
सुगंध गंध दरवळे रांगोळीचा थाट ।
भात केशराचा घास अमृताचा
जेवू घालीते भाऊराया ||

दुसऱ्या कडव्यात भाऊबीजेच्यानिमित्ताने जेवणाचा खास मेनू म्हणून आईने केलेला केशरी भाताचा सुगंध घरात दरवळतो आहे. चंदनाच्या पाटावर ऐटीत बसलेल्या भावाच्या समोर हा केशरी भात चांदीच्या ताटातून आलाय आणि बहिणही आईने बनवलेल्या या केशरी भाताचा अमृतरुपी घास मोठया प्रेमाने आणि आनंदाने लाडक्या भावाला भरवते आहे. चांदीचं ताट, चंदनाच्या पाट … त्या काळी हे दृष्य बहुधा घराघरातून दिसत असावं‌ वसंतकुमार मोहिते यांचं संगीत आणि आशाताईंच्या आवाजातून आणि गाण्याच्या अचूक शब्दरचनेतून हे चित्र आपल्या डोळ्यासमोर अचूकपणे उभं रहातं.

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांचा सर येई भूमीवर पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला पाठीशी राहू दे छाया रे ||

रात्रीच्या वेळेस निळ्या आकाशात पसरलेल्या चांदण्यांना कवि संजीव यांनी दिव्यांची उपमा दिली आहे आणि या चांदण्यांच्या प्रकाशात पृथ्वी जणू काही दिवाळी निमित्त चंद्राला ओवाळते आहे आणि ओवाळून झाल्यानंतर चंद्राने भेट म्हणून पृथ्वीला नक्षत्रांचा हार भेट दिला असून तो स्विकारण्यासाठी पृथ्वीनेही आपला पदर पसरला आहे अशी एक विलक्षण सुंदर कविकल्पना कवि संजीव यांनी या शब्दातून साकारली आहे.

कवी संजीव

अतिशय गोड असं हे गाणं दिवाळी आणि भाऊबीजेचा दिवस आपल्या डोळ्यासमोर उभं करण्यात नक्कीच यशस्वी झालं आहे. या गाण्यामध्ये शब्द, संगीत आणि आवाज या तिन्हीचं रसायन अतिशय उत्तम जमलं आहे असंच म्हणावं लागेल.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. त्याकाळात हे गाणं फार प्रसिद्ध होतं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योति इतके सुंदर शब्द ओठांवर घोळत असायचे. मायेने ओथंबलेले हे सूर अजूनही हृदयाला स्पर्श करून जातात. अशा आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद…

  2. दिवाळीच्या भाऊबीजेच्या निमित्ताने आपण कधी संजीव यांचं हे गाजलेल गाणं रसग्रहणासाठी निवडल्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. नेहमीप्रमाणे उत्तम रसग्रहण झाले आहे. ही अशी जूनी गाणी आता रेडिओवर सुद्धा ऐकायला मिळत नाहीत. आपण रसग्रहणासाठी निवड करून आम्हाला अशा गाण्यांची आठवण करून देत आहात त्याबद्दल धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments