नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत 🙏 लेखिका, कवयित्री शांता शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. मला सांगायला आनंद होतो कि रसग्रहणासाठी निवडलेलं आजचं २५ वं गाणं आहे सिद्धहस्त कवयित्री शांता शेळके यांचं ज्याचे शब्द आहेत –
“अजब सोहळा अजब सोहळा
माती भिडली आभाळाला“
आता आपल्या देशात बहुतेक ठिकाणी डांबरी सडक झाली आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे नक्की काय असतं आणि शांताबाई शेळके यांनी “अजब सोहळा” असं का म्हंटलं आहे याचा अंदाज आजच्या पिढीला येणार नाही. पण पूर्वीच्या काळी कच्च्या रस्त्याने चालताना ज्यांचे पाय लाल मातीने माखले आहेत अशा लोकांना या गाण्याचा अर्थ नक्कीच समजून येईल. कधीकधी जोराचा किंवा सोसाट्याचा वारा सुटला कि पायाखालच्या या मातीचा आणि त्या सोबतच्या कच-याचा असा काही भोवरा तयार व्हायचा कि चालणं थांबवून एका जागी उभं रहाण्याखेरीज गत्यंतर नसे. “अजब सोहळा”, “अजब सोहळा” या द्विरूक्तीमळे “माती भिडली आभाळाला” ही ओळ अर्थवाही झाली आहे.
मुकी माय बाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा
“मुकी बिचारी कुणीही हाका” अशी एक म्हण आहे जी मुक्या जनावरांना उद्देशून बरेच वेळा वापरली जाते. हे जरी खरं असलं तरी आपल्या पायाखाली सातत्यानं आईप्रमाणे सावली धरणा-या मातीमध्ये आणि मुक्या जनावरांमध्ये तसं पाहिलं तर काहीही फरक नाही. जनावराला राग आला तर ते शिंग तरी उगारतं पण आपल्या पायाखालची ही माती मुकी तर आहेच पण राग, लोभ, मोह, मत्सर या षड् रीपूंपैकी कोणाचाही परीणाम तिच्यावर होत नाही. अत्याचार सहन करणा-या या मातीचे उपकार स्मरायचे सोडून आम्ही मात्र तिला रोज पायदळी तुडवत असतो आणि हा कृतघ्नपणा माणसाच्या लक्षातही येत नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
किती काळ साहील
किती मूक राहील
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा
माणसानं जरी या मातीकडे दुर्लक्ष केलं तरी प्रत्येक अपराधाची अप्रत्यक्षपणे कुठे ना कुठे नोंद घेतली जात असते. रोज रोज होणा-या अत्याचारांचा कडेलोट झाला कि मग या मातीचा ही संताप होत असावा. प्रत्येक गोष्टीच्या सहनशीलतेला काहीतरी मर्यादा असते आणि या मर्यादेचं उल्लंघन झालं कि मग “किती दिवस गप्प बसायचं ? अजून किती काळ हे अत्याचार सहन करायचे ?” असे विचार मनात येऊन मनात घोंघावणारं हे वादळ वा-याचा हिंदोळा करून संतापाच्या रूपाने व्यक्त करणा-या मातीचं हे रूप माणसाला स्तिमित करतं.
कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे आता बघ उघडून डोळा
रोज आपल्या पायांनी या मातीच्या शरीरावर ओरखडे उठत असले, तिच्यावर कधीकधी नकळत तर कधी मुद्दामहून अत्याचा झाले तरीही काही भाविक, काही देवमाणसं या मातीला देवस्वरूप मानून तिच्या चरणांवर मस्तक ठेवतात आणि तिला देवाची चरणधूळ मानून आपल्या कपाळावर स्थान देऊन ती अभिमानाने मिरवतात. वर्षानुवर्षे मातीवर केलेल्या अत्याचारांकडे आता तरी डोळे झाक करू नकोस, पवित्रतेचा टिळा म्हणून तिला योग्य तो मान दे हेच या कडव्याच्या शेवटच्या ओळीतून शांताबाईंना सुचवायचं आहे.
स्त्री वर होणा-या अत्याचारांची परिसीमा झाली कि ती देखील रणचंडीकेचं रूप धारण करते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवते हा या गाण्याचा गर्भितार्थ आहे असं माझं मत आहे.
“गारंबीचा बापू” या चित्रपटासाठी संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रवींद्र साठे यांनी आपल्या धीरगंभीर आवाजात आपल्यापर्यंत सहजपणे पोचवलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खरंच खूप छान पद्धतीने लेखकाने रसग्रहण
केले आहे. माती व जनावरे यांच्या व्यथा मनाला खूप
भावल्या.
धन्यवाद माधुरी मॅडम🙏
माझे अत्यंत आवडते गाणे…हे गाणे लागले की माझे आजोळ आठवते…खूप छान परीक्षण
धन्यवाद रामदासजी 🙏
धन्यवाद रामदासजी🙏
धन्यवाद विराग🙏
अतिशय सुंदर आणि नेमके लिहिले आहे
धन्यवाद सुजाता मॅडम🙏
सूंदर रसग्रहण
धन्यवाद विराग🙏
Bhave sir..
Khup aprateem rasa grahan..khup
Avadla…pudhchya ganyachi vat baghat ahot..
Dhanyavaad sir🍁🍁
धन्यवाद मॅडम 🙏