Sunday, June 1, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं”
या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत !

शांता शेळके यांनी दिलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. आज पाहू या शांता शेळके यांनी डॉ वसंत अवसरे या टोपणनावाने लिहिलेलं एक चित्रपट गीत ज्याचे शब्द आहेत –

फुले स्वरांची उधळीत भवती गीत होय साकार
आज मी आळविते केदार

तनामनात झिरपत जाणारे गाण्याचे सूर नेहमीच आपल्याला आकर्षित करतात. त्या सुरांना साजेसे शब्द आणि शब्दांभोवती घुटमळणारी सुरांची फुलपाखरं हवेत जेंव्हा भिरभिरतात तेंव्हा पारिजातकाच्या सुगंधी फुलांचा सडा मनांगणावर पसरतो आणि सुरांमधून उमलणारी ही शब्दफुलं केदार रागाच्या कोंदणात इतकी चपखल बसतात कि आनंददेखील पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लागतो.

गोड काहीतरी मना वाटले
अबोध सुंदर भाव दाटले
मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार

सुरांच्या दुनियेत नेहमीच रममाण होणा-या माझ्या मनात आज असं काहीतरी दाटून आलंय जे व्यक्त करण्यासाठी मला शब्द सुचत नव्हते. मात्र अशी काही जादु घडली की मनातल्या तुझ्याविषयी उमलणा-या या अबोल भावनांनीच अशी काही उर्मी दिली, चैतन्य दिलं कि ह्रदयाच्या सतारीची तार छेडली जाताच, ओठांमधून तुझ्यावरच्या प्रितीचं गुपीत तुला सांगून टाकलं.

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार

वीणावादना मधे मी नेहमीच रममाण होते आणि छेडल्या जाणा-या तारांमधून तयार झालेलं कर्णमधुर संगीत ऐकताना माझं देहभान हरपून जातं. आज मात्र ह्रदयमंदिरातल्या तुझ्या मूर्तीशी संवाद साधत असताना नकळतपणे ओठातून निघालेल्या शब्दांमधून ते भाव बोलके झाले आणि स्वरांच्या लहरींवर तरंगत जाणारी ती सुंदर भावसुमने आज तुझ्या अंत:करणापर्यंत पोचली याचा मलाही अपरिमित असा आनंद झाला आहे जो फक्त माझ्या मनाला कळेल, शरीराला उमजेल.

जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरातुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरातुनी आकार

इतके दिवस हवाहवासा वाटणारा तुझा सहवास, आपल्या गाठीभेटी, तुला यायला जरा उशीर झाला कि मनाला भेडसावणारी अनामिक हुरहूर या सगळ्या तुझ्यावरच्या प्रेमाच्याच खुणा होत्या. आज माझ्याही नकळत सुरांचा आधार घेऊन तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाला पंख फुटले. शब्दांनी जरी चुगली करून माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोचवलं असलं तरीही ज्या सुरांच्या साक्षीने शब्द तुझ्यापर्यंत पोचवले ते सूर मात्र अजूनही माझ्या भोवतीच रेंगाळतायत.

वसंत पवार आणि मधुबाला जव्हेरी

डॉ वसंत अवसरे उर्फ शांता शेळके यांनी “अवघाचि संसार” या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीताला वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलं असून मधुबाला जव्हेरी यांनी आपल्या आवाजातून नायिकेच्या मनाची खुषी आपल्यापर्यंत पोचवली आहे.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

12 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम