नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत ! शांता शेळके यांची अगणित गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. त्यापैकी एक आजचं गाणं, ज्याचे शब्द आहेत …
“एकटेच येणे येथे एकटेच जाणे
एकट्याच जीवाचे हे एकटेच गाणे”
वरवर पहाता असं वाटतं कि जीवनाला कंटाळलेला कोणातरी दु:खी जीव असं सांंगतो आहे की या जीवनाचं काही खरं नाही. सिद्धहस्त कवयित्री शांता शेळके यांनी मात्र आयुष्याचा खरा अर्थ सांगणारं तत्वज्ञान या दोन ओळीतून सांगितलं आहे.
कितीही मित्र जोडले, कितीही माया जमवली तरी एक वेळ अशी येते कि स्वतः च स्वतःच्या यशाचा मार्ग शोधावा लागतो आणि जगाकडून झालेले अपमानही एकट्याला सोसावे लागतात. आपलं जीवन गाणं हे सुखाचं करायचं कि दु:खाचं हे एकट्यानेच ठरवावं लागतं.
कितीक पंथ येतीजाती मार्ग तोच आहे
जुने नवे कसले पाणी? ओघ तोच आहे
धाडीले जयाने येथे तोच सर्व जाणे
आपल्या सभोवताली असंख्य जीव आहेत आणि तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येतेच येते कि “कुणी कुणाचे नाही येथे” अशी भावना मनामधे निर्माण होते पण हे जीवनच असं आहे जे कधी ना कधी एकटेपणाची जाणीव तीव्रपणे करून देतो. एकटेपणाची ही बोच कधी एखाद्या लहान मुलाला सुध्दा जाणवते, कधी जगाच्या दृष्टीने आपले व्यवहार जरी सुरळीत सुरू असले तरी मधूनच एकटेपणा डोकं वर काढतो आणि उदास वाटतं….बरं या एकटेपणाला वयाचं बंधन अजिबात नाही बरं का. सदैव गतीमान असणा-या आपल्या जीवनात एकांत फार कमी वेळा आपल्या वाट्याला येतो पण एकटेपणा मात्र न बोलावता आपली साथ करत असतो. हे असं का ? याचं उत्तर मात्र ज्या परमेश्वराने आपल्याला या जगात धाडलं तोच देऊ शकेल.
एकट्याच मार्गी नाही संगतीस कोणी
आपुलीच आपण न्यावी शिरावरी गोणी
भार वाहताना खोटी आसवे वहाणे
या एकटेपणानं एकदा मनाचा ताबा घेतला कि “माझं म्हणावं असं कुणीच नाही” ही जाणीव वारंवार त्रास देत रहाते. जीवाला जीव देणारे मित्रही अशा वेळेस इतके विचित्र वागतात कि मदतीची अपेक्षा करूनही सगळे लांबून आपली मजा बघत असतात. कुणीही मदतीला धावून येत नाही. शेवटी आपल्या सुखदुःखांचे आपणच साक्षीदार असा विचार करून आपण चालायला सुरुवात केल्यावर मात्र आपल्याला पडणारे कष्ट पाहून त्यांना खूपच वाईट वाटतंय, दु:ख होतंय असा आविर्भाव यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. त्यामुळे कधीकधी एकट्याने जीवन जगण्याचा विचार आणखी पक्का होत जातो तर कधीकधी मात्र एकटेपणाचा हा भार मनाला सोसत नाही आणि मन आणखीनच उदास होत जातं.
कुठून कुठे आला रस्ता आणि कुठे जाई ?
कुठे जावयाचे आहे तेही कळत नाही
पावलास एकच ठावे पुढे पुढे जाणे
आपल्या माणसांकडून ही अशी फसगत झाल्यामुळे मन अगदी गोंधळून जातं, काय करावं ते कळत नाही. जीवनाच्या या रस्त्यावर आपण बरोबर चालतो आहोत का, हा रस्ता नक्की यशाकडे जाणारा आहे का, की आपण मार्ग चुकलो तर नाही ? अशा अनेक शंकाकुशंका मनात फेर धरू लागतात. पण आपण एकटे असलो कि अशा वेळेस मनामध्ये धैर्याचा उगम होत जातो आणि मला एकट्यालाच जर हा जीवनमार्ग चालायचा आहे तर मी मागे का वळायचं ? हा विचार जसजसा पक्का होत जातो तसतसा मनाचा गोंधळ कमी होत जातो आणि आपण एकटे जरी तरी मागे न फिरता पुढे जाण्याचा निर्णय घेतला जातो जो यशाच्या मार्गावर घेऊन जातो.
शांता शेळके यांच्या या गीताला स्वरसाज चढवला आहे संगीतकार यशवंत देव यांनी आणि आपल्या संथ पण दमदार आवाजात कैलासनाथ जयस्वाल यांनी हे गाणं गायलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
विकासजी.. शांताबाई शेळके यांनी जीवनाबद्दल खूप छान काव्य लिहिले आहे.
आपण त्याचे रसग्रहणही सुंदर केले आहे.
या निमित्ताने चांगले काव्य वाचायला मिळते.
👍👌🙏🌹
शान्ता शेळके यांच्या आपण रसग्रहण केलेल्या गाण्याचा खरंतर विसरच पडला होता. आपल्या रसग्रहणाने गाणे आठवणीत आले.रसग्रहण फारच भावले.
अतिशय सुंदर कविता.. आणि खूप कुशलतेने पैलु उलगडलेत.. कविता अजूनच समजत जाते वाचताना..
जीवनाचा मार्ग जसाही आहे एकदा स्वीकारला की त्याचा त्रास होत नाही..अतिशय छान पद्धतीने सांगितले.. खूप आवडले रसग्रहण..
खूप छान रसग्रहण
धन्यवाद विराग 🙏
खूप छान उलगडून सांगीतलं. हळवी कविता आहे
धन्यवाद सुजाता मॅडम 🙏
शांता शेळके यांनी या गाण्यांमध्ये ”एकला चलो रे” ही भावना व्यक्त केली आहे. एका. चांगल्या गाण्याचे आपण केलेले रसग्रहण सुध्दा चांगले झाले आहे. पुन्हा एकदा विस्मृतीत गेलेले चांगले गाणे ओठावर गुणगुणण्याचा योग आला. छान.
धन्यवाद विवेक🙏
एकटेच येथे येणे एकटेच जाणे या शांता शेळकेंच्या काव्य पंक्तीतून जीवनातल्या अनुभवांचे पदर उलगडून दाखवले आहेत.
शेवटी आपणचं आपले असतो. कधी कधी एकांत सुद्धा छान वाटतो.
फक्त तो आपण स्विकारला पाहिजे.
मग त्याचा त्रास होत नाही. छान रसग्रहण.
धन्यवाद अंजुषा मॅडम 🙏
छान
धन्यवाद गौरव 🙏