नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं”
या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
एखाद्या व्यक्तीबद्दल श्रध्दा असावी, पण अंधश्रद्धा असू नये असं म्हणतात. माणूस मात्र बरेच वेळा अंधश्रध्देलाच श्रध्दा आणि भक्तीभाव समजतो. या अंधश्रध्देचा बुरखा फाटल्यावर मात्र देवावरही श्रध्दा ठेवायला तो तयार नसतो. ज्या गोष्टी मनुष्य निर्मित नसल्या तरीही त्या विनासायास होत रहातात अशा अद्वितीय शक्तीवरील विश्वास म्हणजे श्रध्दा. मग त्या शक्तीला कोणी परमेश्वर म्हणतो किंवा कुणी आणखी काही नाव देतो.
आज पाहू या अदृश्य शक्तीविषयी – परमेश्वराप्रती श्रध्दा भाव व्यक्त करणारं कविवर्य पी सावळाराम यांचं गाणं ज्याचे शब्द आहेत –
तूच कर्ता आणि करविता | शरण तुला भगवंता ||
मी शरण तुला भगवंता |||
या जगातली प्रत्येक गोष्ट – अगदी आमचा श्वासोच्छवास सुध्दा – तुझ्या कृपाशीर्वादाने चालतो यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश! या चराचरातून असलेलं तुझं अस्तित्व आम्ही कितीही नाकारलं तरी शोधक नजरेने जर वेध घेतला तर चराचरातलं तुझं अस्तित्व निरनिराळ्या रूपातून जाणवत रहातं. विविधतेमधून दर्शन देणा-या तुझ्या अस्तित्वाला मी अनन्य भावाने शरण आलो आहे.
तुझिया श्वासे पान हलते, हर्षे तुझिया फूल फुलते
तेज झळाळत गगनही फुलते रविचंद्राचा तू निर्माता
आमच्या सभोवताली भिरभिरणारा वारा म्हणजे तुझा श्वासोच्छवास आहे, ज्यामुळे झाडाची पानं हलतात, डोलतात, आमचं मनही प्रसन्न होतं. सकाळी झाडांवर फुललेली फुलं पाहून आमचंही मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं. तुझ्या आनंदातून होणारी ही निर्मिती आमच्याही प्रसन्नतेचं कारण ठरते पण आम्ही मात्र हीच फुलं तोडून तुझ्या चरणांवर अर्पण करतो आणि तुझा आनंद तुलाच परत करतो. किरणांच्या रथावर स्वार होऊन सकाळी आकाशात उगवणारा सूर्य आकाश आपल्या तेजाने व्यापून टाकतो तर रात्री उगवणारा चंद्र कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याचं चांदणं आमच्यावर उधळत रहातो. या नित्याच्या परीपाठामधे आजपर्यंत एकदाही खंड पडला नाही ही तुझीच तर किमया आहे.
सुखदुःखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी
तुझ्या कृपेच्या पंखाखाली जीवदान ते मरणा मिळता
आयुष्यात येणाऱ्या दु:खांना आणि संकटांना सामोरं
जाताना धैर्याचा मेरूमणी बनून तूच तर आमच्या पाठीशी उभा रहातोस. संकट प्रसंगी तर हमखास तुझी आठवण होतेच होते. दु:खाच्या किंवा संकटप्रसंगी यशस्वीपणे तोंड देऊन त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर येणारी सुखाची सावली हे तुझ्याच कृपाशीर्वादाचं फळ आहे. कधी कधी जीवावर बेतणा-या प्रसंगातूनही आमची सहजपणे सुटक होते आणि आम्हाला जीवदान मिळतं ही फक्त तुझ्या कृपेची किमया आहे. म्हणून तुला पुन्हा एकदा भक्तीभावाने शतशः प्रणाम !
देऊळ पूर्ती तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती
तूच असता माझी पूर्ती मागायाचे काय
तुझं वर्णन कसं करायचं तेच मला समजत नाही. चराचराचा तूच निर्माता आहेस त्यामुळे देवळाचा घुमट असो कि वास्तू असो, तुझी मूर्ती असो कि पूजेचं तबक असो, सर्व ठिकाणी तुझं अस्तित्व आहे. इतकंच काय माझी भक्ती देखील तूच आहेस आणि सगुण रूपात तू जेंव्हा दर्शन देशील तेंव्हा माझी पूर्तीही तूच असशील! तुझं दर्शन झालं म्हणजे तू प्राप्त झाल्यासारखाच तर आहेस …..मग आणखीन काय मागायचं तुझ्याकडे ? तुझ्या कृपाशीर्वादाची सावली समस्त मानव जातीच्या पाठीशी राहू दे..सुख आणि दु:ख दोन्हीही समानतेने भोगण्याची दृष्टी आम्हाला दे एवढंच फार तर म्हणेन.
संगीतकार वसंत प्रभू यांचं संगीत असलेलं हे गाणं लता मंगेशकर यांनी एवढ्या आर्ततेनं म्हटलं आहे कि त्या अद्वितीय शक्तीपुढे आपोआपच हात जोडले जातात.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
छान रसग्रहण
धन्यवाद 🙏
आकाशवाणीने बासनात गुंडाळून ठेवलेली गाणी आपण रसग्रहणासाठी घेऊन आपण आम्हाला जुन्या गाण्यांची आठवण आपल्या या रसग्रहणातून करून देत आहात. पी.सावळाराम, वसंत प्रभू व लता मंगेशकर या त्रयीने अनेक गाणी अजरामर केली त्यातील हे एक गाणं. रसग्रहण नेहमीप्रमाणे उत्तम.
धन्यवाद विवेकजी🙏
🙏
Good
छान आहे
धन्यवाद 🙏