नमस्कार 🙏
रेडिओ, एकेकाळी मला वेड लावणारं सशक्त माध्यम ! जवळ जवळ दिवसभर काही ना काही कार्यक्रमांमधून रोजच मराठी, हिंदी गाणी माझ्या कानावर पडत असत.
आज पाहू या त्या गाण्यांपैकी मला आवडणारं कविराज शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –
रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जीवाच्या तू जरा ऐकून जा
आपल्या प्रियकराची वाट पाहून तिचे डोळे थकले आहेत. येणार येणार म्हणून सकाळपासून तनानं आणि मनानंही दिवसभर त्याच्या वाटेकडे डोळे ताणून ताणून त्याची वाट पहाताना आता शरीराला आणि मनावरही एक प्रकारची मरगळ आली आहे. तू सकाळी आला असतास तर मी प्रसन्न चेहऱ्याने तुझं स्वागत केलं असतं. आता तू आलास तर तुझी वाट पाहून थकलेला माझा चेहरा तरी पाहून जा. कदाचित तुला पाहिल्यानंतर पुन्हा माझा चेहेरा प्रसन्न होईल, कुणी सांगावं, पण तू यावंस असं मात्र मला मनापासून वाटतं.
निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातूनी
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानातूनी
जागती नेत्रातली ही पाखरे पाहून जा
दिवसभर तुझी वाट पाहून हा जीव जरी थकला असला आणि आता मध्यरात्र होत आली तरीही तू अजून आला नाहीस, पण सकाळी आनंदी आणि प्रसन्न असणाऱ्या माझ्या चेहेऱ्यावर चे भाव बदलल्याचं आकाशातल्या चंद्राच्या देखील लक्षात आलंय आणि त्यामुळे तो ही आता जरा निस्तेज दिसतोय. पानांनीही माझ्या भावना लक्षात घेतल्या, त्यामुळे माझ्याप्रमाणेच ती देखील आता निस्तेज दिसतायत. मी तुला हे सारं सांगण्यापेक्षा तू जर येऊन तुझी वाट पहाणाऱ्या माझ्या डोळ्यातल्या प्रीतपाखरांकडे पाहिलंस तर मला काय म्हणायचंय ते तुझ्या लक्षात येईल.
पाखरे पाहून जा जी वाढली पंखाविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतीकेचा अर्थ तू ऐकून जा
माझं तुला कळकळीचं सांगणं आहे कि या पौर्णिमेच्या चांदराती तू खरोखरच येऊन जा म्हणजे तुझ्या सहवासाच्या पंखांशिवाय, तुझा सहवास मिळेल या आशेवर ही प्रेमाची पाखरं कशी वाढली ते तुला समजेल. त्यांच्या गळ्यात तुझ्या प्रितीचं प्रेमगीत आहे. हे प्रेमगीत आता त्यांच्या सुरात ऐकताना जुनं झालं असलं तरी तुझ्यावरच्या प्रेमाचा सच्चा अर्थ सांगणारं हे प्रेमगीत आहे ते ऐकण्यासाठी तरी तू यावंस असं मला वाटतं.
अर्थ तू ऐकून जा फुलवील जो वैराणही
रंग तो पाहून जा जो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाखरांचा स्पर्श तू घेऊन जा
तू जर या प्रेमगीताचा अर्थ ऐकलास ना तर कदाचित तुझ्या ह्रदयाला पाझर फुटेल आणि खऱ्या प्रेमाची खात्री पटवून तुझ्या ह्रदयातही या प्रितीचे झरे वहायला लागतील. अंध माणसांनाही आनंद देणा-या प्रेमाच्या लाल रंग तुझ्याही मनाला उच्च प्रतीचा आनंद देऊन जाईल. तू एकदा तरी येऊन मला तुझ्या मिठीत घे, माझे हात तुझ्या हातात घे कारण स्पर्शाची भाषा ही न बोलता देखील बरंच काही सांगून जाते, शिकवून जाते. मी पुन्हा पुन्हा तुला सांगते कि हे सगळं अनुभवायचं असेल तर अनुभवाची ही शिदोरी इथे येऊन तुला अनुभवावीच लागेल.
कडवं जिथे संपतं त्याच शब्दांपासून पुढचं कडवं सुरू होतं हे ह्या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. संगीतकार दशरथ पुजारी यांनी अगोदर संगीत देऊन नंतर चालीबरहुकूम त्या मधे शब्द बसवणं हे कवीचं वैशिष्ट्य आहे आणि हे कठीण काम शांताराम नांदगावकर यांनी अगदी लिलया केलंय हे स्वतः संगीतकार दशरथ पुजारी यांनी आपल्या “अजून त्या झुडपांच्या मागे” या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे. सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना आपलं देहभान हरपून जातं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ओठावरलं गाणं सदर झालंय
सर्व रसिकांच्या आवडीचं
मनापासून अभिनंदन करतो मी
कविवर्य विकास भावे सरांचं
चित्रकाव्य असो वा गाण्याचा अर्थ
यातून साधतो हा अवलिया चक्क परमार्थ
माय मराठीची सेवा आणि रसिक रंजन
यात होऊन जातो हा ध्येयवेडा अगदी गर्क
या अष्टपैलू कोहिनूर हि-याचे
कसे मानू कळे ना मज आभार
प्रेमपूर्वक अर्पण करतो माननीय विकासजींना
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हार
खूप खूप धन्यवाद राजेंद्र सर 🙏
अतिशय सुंदर.