Saturday, July 5, 2025
Homeकला"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत.

आज २६ जानेवारी ! भारताचा प्रजासत्ताक दिन !! प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पाहू या योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं एक स्फूर्ती गीत ज्याचे शब्द आहेत –

“अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे”

आमचा हा भारत देश अजिंक्य आहे कारण या देशावर प्रेम करणारी जनता देखील अजिंक्य आहे.‌ आम्ही सारे एक आहोत आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणूनच माझ्या बांधवांना आणि भगिनींनाही माझं सांगणं आहे कि आपल्या देशाचा विजयी ध्वज ही आपली शान आहे आणि म्हणूनच एकजुटीचं सामर्थ्य काय असतं ते जगाला दाखवून देण्यासाठी हा विजयी ध्वज जेव्हढा उंच नेता येईल तेव्हढा उंच उंच जाऊ दे.

मातीमधल्या कणाकणातून
स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढती
संघटनेचा मंत्र जपा रे

मातृभूमीच्या मातीचा गुणच असा आहे कि इथल्या कणाकणातून स्वातंत्र्याचं गाणं तुम्हाला ऐकू येईल. पारतंत्र्याच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, गांधी, नेहरू, टिळक, बाबू गेनू …. स्वातंत्र्याचा जयघोष आपल्या मुखातून करायला न घाबरणारी ही माणसं या मातीतच जन्माला आली आहेत. यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि आता प्रगतीच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर आपली संघटना मजबूत होणं महत्त्वाचं आहे. म्हणून तर आपापसातील हेवेदावे, क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विसरून ” एकीचं बळ, देई प्रगतीचं फळ” हाच मंत्र आपण जपायला हवा.

भाग्यवान ते जवान सगळे
हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकिले
मान राखला मातृभूमीचा रे

मायभूमीच्या रक्षणार्थ जेंव्हा युद्ध सुरू झालं तेंव्हा जे जवान हसत हसत शत्रूबरोबर झुंजले, शत्रूला त्यांनी सळो कि पळो करून सोडलं, शत्रूशी झुंज देणाऱ्या त्या जवानांचं कौतुक तर आहेच पण जराही न डगमगता हसत हसत मृत्यूला जिंकणाऱ्या जवानांना भारतीय जनतेचा मनापासून सलाम! आपल्या मरणाला जिंकून त्या जवानांनी मातृभूमीची शान वाढवली आहे, इतकंच नव्हे तर मायभूमीचा मानही राखला आहे.

इतिहासाच्या पानोपानी
बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून
पराक्रमाचे गीत गाऊ या रे

आमचा इतिहास आम्हाला नेहमीच स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आठवण करून देत असतो. इतिहासाची पानं डोळ्यासमोर फडफडतात तेंव्हा वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय यांच्या बलिदानाची आठवण करून देतात. देशरक्षणासाठी, देशाचं रक्षण करणाऱ्या
सैनिकांना जेंव्हा जेंव्हा काही मदत लागेल तेंव्हा तेंव्हा आमची धनदौलत आम्ही तुम्हाला मदत म्हणून पाठवू आणि तुमच्या पराक्रमाची गाथा या देशातील जनता सातत्याने गात राहिल असं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो.

संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर, जयवंत कुलकर्णी व शरद जांभेकर यांनी उत्साहवर्धक आवाजात गायलेलं हे गाणं ऐकताना मन देशप्रेमाने उचंबळून येतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments