Sunday, July 6, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार मित्रांनो 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत! आज पाहू या पुरूषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं आणि आपल्याला आवडणारं तेजाची महती सांगणारं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –

“तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज भास्कर हे गगनराज

एकही दिवस रजा न घेता अविरतपणे सकाळी आपले तेजस्वी किरण घेऊन येणाऱ्या या रविराजाला शतशः प्रणाम! सूर्य नमस्कारांच्या बारा नावाप्रमाणेच मित्र, भानू, भास्कर अशा काही नावांनीही सूर्यदेवाला संबोधलं जातं. दारव्हेकर मास्तरांनी हे गाणं लिहिताना या तेजाने तळपणाऱ्या लोहगोलाला आकाशाचा राजा म्हणून संबोधलं आहे. व्योम म्हणजे सुध्दा आकाश! सहस्त्ररश्मीचं हे वर्णन ऐकताना नकळतपणे आपले हात जोडले जातात कारण याच्या तेजस्वी शलाकांमुळे पृथ्वीवर तेज पसरतं. आपल्या किरणांमुळे पृथ्वीवर पसरणारं तेज अवघी धरा झळाळून टाकतं. रोज नित नियमाने तेजस्वी शलाकांची बरसात करणाऱ्या या व्योमराजाला मी आदरपूर्वक वंदन करतो.

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परी होऊन अणुरेणू उजळिती
तेजातच जननमरण तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज भास्कर हे गगनराज

व्योमराजा, तू आकाशात प्रविष्ट झालास कि तुझे कोटी कोटी किरण जणूकाही अग्नीबाणाप्रमाणे तू चराचरात उधळून देतोस. पण तुला गंमत सांगू का, अग्नीबाणाप्रमाणे भासणारे तुझे किरण पृथ्वीवासियांसाठी अमृताचे कण होऊन अणुरेणू उजळून टाकतात. उत्साहाचा, चैतन्याचा बूस्टर डोस जणूकाही ह्या किरणांमधून आम्हाला ड जीवनसत्वाद्वारे मिळत जातो. तेजाचा हा पसारा घेऊन तू चराचरात त्याचं शिंपण करत जातोस आणि मावळतीला जाताना हेच तेज तुझ्यासोबत घेऊन जातोस, उद्यासाठी पुन्हा एकदा नव्याने हाच तेजाचा साज घेऊन तू आम्हा पृथ्वीवासियांसाठी दुसऱ्या दिवशी नव्याने आकाशात उगवतोस.

ज्योतीर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परी संजीवक तरूणारूण किरणप्रभा
हो जीवन विकास वसुधेची लाज राख
हे दिनमणी व्योमराज भास्कर हे गगनराज

हे आदित्यनारायणा, सकाळच्या वेळी जेंव्हा जेंव्हा आम्ही तुझ्याकडे पहातो तेंव्हा तेजोमय अशी तुझी मूर्ती आम्हाला उत्साहाचं धन वाटत रहाते. आकाशामध्ये तुझ्या किरणांच्या रथाभोवती फिरणारे अनेक ग्रहदेखील या किरणांमुळे तेजस्वी होतात आणि जणू काही आकाशात या सगळ्या ग्रहांची अलौकीक अशी दिव्य सभा सुरू झाली आहे असंच वाटत रहातं. तुझ्या सूर्य किरणांचं तेज दिवस वर येतो तसतसं दाहक वाटू लागतं हे खरं असलं तरीही तुझ्या किरणांमधून मिळत रहाणारं तेज आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा ठेवा आहे जो रोज तू आम्हाला देत असतोस. पृथ्वीवर येणाऱ्या तुझ्या तेजोमय किरणांमुळे आमचंही जीवन उजळून निघू दे आणि पृथ्वीवर होणारे दिवस आणि रात्र हे प्रहर असेच चालू राहू दे आणि त्यासाठी रोज सकाळी तुझी तेजोमय किरणं आम्हाला मिळत राहू दे.

अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेलं आणि तेजाची उपासना असलेलं हे गाणं वसंतराव देशपांडे यांनी आपल्या खड्या आवाजात कट्यार काळजात घुसली या नाटकात गायलं आहे.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. विकास भावे यांचा गाण्यांचा खजिना उघडून दाखवण्याचा हा उपक्रम खरोखरीच चांगला आहे.
    या बाबतीत ते रत्नपारखी आहेत त्यामुळे त्यांची निवडही चांगली असते.
    तेजोनिधी लोहगोल हे काव्य दार्व्हेकर मास्तरांचे आहे हे अनेकांना माहितही नसेल.तेजाची उपासना असलेलं हे गीत केवळ अमर आहे.दाहक परी संजीवक असे असलेले सूर्याचे अस्तित्व ज्यांनी ओळखले त्या माणसांची दृष्टी काय असेल?
    साहित्यातील हा अमोल ठेवा विकास भावे यांनी आमच्यासमोर ठेवला आणि प्रेमाने त्यावर विवेचन केले
    .धन्यवाद विकासजी!

  2. वा, खूप सुंदर! गीत, संगीत आणि स्वरसाज यांचा सुंदर मिलाफ असलेलं गीत भावे सर तुम्ही उलगडून दाखवलं आहे.👌👌

  3. खूप छान नाट्य गीत आणि त्याचा तुम्ही सांगितलेला अर्थही.

  4. कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं हे गाणं व जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि तितक्याच समर्थपणे वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं सूर्याचे वर्णन करणारे हे गीत मनाला आनंद देते व उत्साह निर्माण करते. आपण केलेले रसग्रहण हे नेहमीप्रमाणेच उत्तम जमले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments