नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन भरभरून स्वागत !
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी देवाज्ञा झाली आणि लतादीदींनी गायलेल्या असंख्य मराठी व हिंदी गाण्यांनी मनात गर्दी केली. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत आणि नंतरही लतादीदींचा आवाज कायम आपल्या सोबत असतो.
या गाण्याच्या रसग्रहणाद्वारे लतादीदींना मी माझी शब्द सुमनांजली वहातो आहे. रेडिओमुळे घराघरात पोचलेलं आजचं गाणं आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, ज्या गाण्याचे शब्द आहेत –
“असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला
कशी येऊ …. कशी येऊ …. असा बेभान हा वारा“
गाण्याच्या धृवपदावरूनच आपल्या लक्षात येतं ते म्हणजे आपल्या प्रियकराला भेटायला निघालेली ही युवती नदी पार करून पैलतीराला जाण्यासाठी होडीत बसून निघाली आणि निसर्गाचं रूप पालटलं. आपल्यावर ओढवलेल्या संकटाची त्याला कल्पना यावी म्हणून ती सांगते आहे. मी तर तुझ्याकडे यायला निघाले खरी पण मधेच निसर्गाचं रूप पालटलं आणि बेभानपणे धावणाऱ्या वाऱ्याबरोबर आता नदीच्या पाण्याचाही जोर वाढतोय आणि नदीला आलेल्या पुरामधे माझी नाव फसली आहे. त्यामुळे तुझ्याकडे येण्याच्या मार्गात मोठ्ठा अडथळा निर्माण झाला आहे.
जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना दिशांचे भोवरे होती
जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू
माझी अवस्था तुला कशी सांगू ? केसांच्या जटा मोकळ्या सोडून एखादी स्त्री आपल्या अंगावर धावून यावी तशा या लाटा माझ्या होडीभोवती उसळी घेतायत. कोणत्याही क्षणी अंगावर झेप घेऊन त्या माझ्या होडीसकट मला गिळंकृत करतील अशी मला राहून राहून भीती वाटते आहे. या भयाण काळोखात मी जीव मुठीत धरून होडी चालवते आहे खरी पण दाही दिशांनी लाटा अंगावर धावून येतायत आणि मला तर समर्पण भावनेने तुझ्याशी एकरूप व्हायचंय ! खरं तर हा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकायचा आहे, पण आता तुझ्याकडे यायचं तर ही नदीच माझी वैरीण बनली आहे.
कुळाचे लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे
दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ
आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या क्षणीही तुझी साथ सोडणार नाही असा विचार करून मी निघाले तेंव्हाच माझ्या माहेरचे सर्व पाश तोडून मी तुझ्याकडे यायला निघाले. माझ्या दृष्टीने माझा गाव आणि माझं नाव हे दोन्ही मी मागे सोडून आले आहे. एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची या विचाराने मी अतिशय आनंदात होते. आता मात्र अशी परिस्थिती आहे कि नदीच्या पाण्यात तयार झालेल्या या भोवऱ्यातून माझी सुटका होते की नाही असा प्रश्न आहे. त्यामुळेच दैवाने दिलेल्या या सौभाग्यदानाचा स्वीकार कसा करावा तेच मला समजत नाहीये.
जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया रे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता किती ही हाक मी देऊ
माझ्या घरातील माझी माणसं, नातेवाईक, येणारे जाणारे या सगळ्या लोकांचं काळजाला भोकं पाडणारं कुजकट बोलणं ऐकताना मी किती वेळा ते सहन केलं असेल ते माझ्या सहनशीलतेलाच ठाऊक आहे. जग कितीही विरोधात गेलं तरीदेखील तुझ्या सोबत आयुष्य जगायचं असं ठरवल्यावर मी माझं पाऊल मागे न घेता, आपल्या प्रेमावर आणि माझ्या सौभाग्यावर विश्वास ठेवून, अचानकपणे उद्भवलेल्या या वादळाशी सामना करत पैलतीरावर यायला निघाले आहे. माझी हाक तुझ्या ह्रदयापर्यंत पोचू दे म्हणजे तू मला पहायला पैलतीरावर येशील आणि आपली भेट होईल.
“नदीला पूर आलेला” या शब्दांचा अर्थ ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतातून प्रवाही होत जातो आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातून गाण्याचा अर्थ सहजपणे आपल्या ह्रदयापर्यंत पोचतो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Due to some technical issue, comment section is closed for this post only. Kindly WhatsApp us your comments on +91 9869484800, we will upload on your behalf.
Thank you.