Wednesday, March 12, 2025
Homeकलाओठावरलं गाणं ( २७ )

ओठावरलं गाणं ( २७ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं गुलाबी थंडीसह स्वागत ! सध्या पडत असलेल्या थंडीमुळे काही कामं न करता मस्तपैकी चहाचे घुटके घेत थंडीची मजा चाखावी आणि बाजूला रेडिओ ठेवून सुंदर सुंदर गाणी ऐकत आठवणींचे कप्पे उघडावेत असं जरी वाटत असलं तरी आपल्या धावपळीच्या आयुष्यात असे क्षण आपल्याला फार काळ उपभोगता येत नाहीत हे ही तितकंच खरं ! मग ही तहान काही अंशी आपल्याला आवडणाऱ्या गाण्यांवर भागवली जाते.

मंडळी, बाहेर थंडी तर आहेच ‌‌…ती दिसत नसली तरी शरीराला जाणवते आहे. आपण घराच्या बाहेर पडलो नाही तरी मन मात्र आठवणींच्या हिंदोळ्यावर मस्त मजेत झोके घेतं आहे. आज पाहू या रेडिओच्या काळात वरचेवर लागणारं एक आवडतं गाणं. कविवर्य योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत –

“आठवणी दाटतात ….धुके जसे तरळावे,
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे
आठवणी दाटतात

माझ्या मनात तुझ्याविषयीच्या आठवणी इतक्या दाटून आल्या आहेत कि सकाळी सकाळी पडलेलं धुकं जसं नाहीसं न होता त्या दाट धुक्याचा हवेमध्ये मनसोक्तपणे संचार सुरूच असतो त्याचप्रमाणे या आठवणी माझ्या मनात पिंगा घालत आहेत. आपल्या नदीकाठच्या चोरट्या भेटीगाठी, एकमेकांच्या बाहुपाशात तासनतास घालवलेले क्षण, वचनं, आणाभाका ‌…. आणखीही बरंच काही. पण यातली कुठलीही आठवण मला विसरता येत नाही…..एक विसरू म्हंटलं कि दुसरी आठवण लगेच दत्त म्हणून समोर येऊन उभी रहाते. धुक्यात वाट हरवते असं म्हणतात पण हे आठवणींचं धुकं मात्र या मनाला अगदी वेढून बसलं आहे.

विसरावे नाव गाव आणि तुझे हावभाव
मूक भाव नजरेतील ह्रदयाला उमजावे

मी बरेच वेळा मनाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अगदी निक्षून सांगितलं कि बाबा रे, हा जो माणूस मघापासून त्याच्या आठवणींचा भुंगा घेऊन तुझ्या मागे लागला आहे तो तुझ्या ओळखीचा नाही… ‌‌त्याचं नाव, गाव, पत्ता हे सारं काही आपल्याला अनोळखी आहे. इतकंच नव्हे तर त्याचं प्रेमाचं बोलणं, आश्वासनं सारं काही झूठ आहे. मी बरेच वेळा समजावून सांगितल्यावर हळूहळू हा कोणीतरी अनोळखी माणूस इथे घुसू पहातोय या गोष्टींवर हळूहळू माझ्या मनाचा विश्वास बसायला लागतो पण तेव्हढ्यात तुझ्या नजरेकडे माझ्या ह्रदयाचं लक्ष जातं आणि ते चक्क माझ्याशी प्रतारणा करत मनाला सांगतं “थांब रे बाबा, या बाईवर विश्वास ठेवू नको. या माणसाच्या नजरेतले मूक भाव आत्ताच मी वाचले आणि ते शंभर टक्के सच्चे आहेत याची मला खात्री आहे. “मनाचा आणि पर्यायाने माझाही हृदयाच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि मी विसरू पहाणारी तुझी आठवण मात्र मजेत मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत रहाते आणि तुझ्या अस्तित्वाची जाणीव होत रहाते.

रात्र अशी अंधारी उरलेली संसारी
सोबतीस पहाटेस विरहाचे स्वप्न हवे

तू निघून गेल्यावर तुझ्या आठवणींना दूर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला पण माझ्या ह्रदयाने दगा दिला आणि त्याने तुझी बाजू उचलून धरली. या संसारात आता अंधारी रात्र आणि एकामागोमाग एक मन: पटलावर येणाऱ्या आपल्या दोघांच्या असंख्य आठवणी माझ्या सोबतीला आहेत. एखाद्या चलचित्राप्रमाणे हा आठवणींचा जीवनपट रोज रात्री डोळ्यासमोर उलगडत जातो. या काळ्याकभिन्न अंधाऱ्या रात्री दाटलेल्या धुक्याप्रमाणे येणाऱ्या तुझ्या आठवणी काही माझी पाठ सोडत नाहीत. त्यामुळे आता पहाटे जर चुकून माझा डोळा लागला तर त्या स्वप्नामधे इतक्या दिवसांचा विरह नाहीसा व्हावा आणि विरहाचं स्वप्न जरी असलं तरी आपली भेट व्हावी आणि विरहाच्या स्वप्नांचं रूपांतर आपल्या भेटीमध्ये व्हावं यासाठी तरी पहाटे पहाटे हे विरहाचं स्वप्न मला पडावं.

स्वप्नातील जादू अशी मज गमते अविनाशी
प्रेम तुझे सत्य गमे त्यास कसे विसरावे

“प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर” असते असं काहीजण म्हणतात ना ते स्वप्नांच्या बाबतीत मात्र अगदी खरं आहे. कारण स्वप्नात जेंव्हा तू मला भेटतोस ना तेंव्हा आपल्या भेटीने मी एवढी खूष असते कि ती जादू निरंतर….. म्हणजे अगदी अव्याहतपणे सुरू रहाणार आहे असंच मला वाटत रहातं. खरोखरच तू मला भेटायला आला आहेस असं वाटत रहातं आणि त्यामुळे तुझं माझं खरंखुरं प्रेम जिंकलं आणि माझ्यावर असलेल्या तुझ्या प्रेमानंच पुन्हा आपली भेट घडवून आणली आहे असं वाटावं इतकं तुझं प्रेम मला खरं वाटायला लागतं आणि मग जागी झाल्यावर पुन्हा एकदा आठवणींच्या मधमाशांचं मोहोळ मनावर उठत रहातं.

संगीतकार एम जी गोखले यांच्या संगीत संयोजनात चंद्रकंस रागातली ही विराणी सुमती टिकेकर यांनी अतिशय समरसून गायली आहे त्यामुळे संगीताचा फाफटपसारा नसूनही हे गाणं काळजात घर करतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. वा, काही गाणी अशी असतात जी थोडी बाजूला राहतात, पण भावे सर त्याना परत लखलखीत करून समोर आणतात ! धन्यवाद सर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित