Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं...

ओठावरलं गाणं…

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. आता जरी रेडिओ कमी प्रमाणात ऐकला जात असला तरी काही काही गाणी मात्र अजूनही आठवत रहातात एवढं मात्र निश्चित ! “चिमुकले घरकुल अपुले छान“, “असावे घर ते अपुले छान”, खेड्यामधले घर कौलारू”, “बघा तरी हो कशी बांधली जमवून काडी काडी | अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी” या गाण्यांप्रमाणेच आणखी एक जुनं गाणं आज आपण पहाणार आहोत जे लिहिलं आहे शब्दप्रभू ग दि माडगूळकर यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

तुझे नि माझे इवले गोकुळ
दूर आपुले वसवू घरकूल

प्रेमाच्या राज्यात एकमेकांच्या मिठीत भविष्याचं स्वप्न
पहाणाऱ्या दोन प्रेमिकांचं हे स्वप्न गदि माडगूळकरांनी शब्दबद्ध केलं आहे ते ही अगदी सोप्या शब्दात कि जे शब्द सहजपणे गुणगुणले जातील. दोघांचंही स्वप्न एकच आहे ते म्हणजे या दुनियेपासून थोडसं लांब राहून आपल्या दोघांचं छोटंसं घरकुल आपण बांधू या ज्यामधे आपल्या सोबत दोन बाळकृष्ण असतील आणि आपलं चौकोनी कुटुंब त्यात सुखाने नांदेल.

एकलकोंडी एक टेकडी
दाट तीवरी हिरवी झाडी
मधेच बांधू सुंदर घरटे
रानखगांची भवती किलबिल

माझ्या मनात इथली एक जागा भरली आहे. आपल्या गावापासून जवळच एक छोटीशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर असलेल्या हिरव्या हिरव्या झाडीमुळे तिथे सहसा कोणी जायला धजावत नाही. अशा ठिकाणी आपण आपली छोटीशी झोपडी बांधली तर निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्या चित्तवृत्ती नेहमीच प्रसन्न रहातील. रोज सकाळी सूर्य किरणांचं आगमन होण्यापूर्वी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आल्यावर त्यांचं सुखद दर्शन आपल्याला होत राहील.

घरट्यापुढती बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्न वेली
कुठे मारवा कुठे मोगरा
सतत उधळी तो सुगंध शीतल

प्रिये, तूला स्वतः ला फुलांची किती आवड आहे ते माझ्या लक्षात आलं आहे. मी जर कधी गजरा आणायला विसरलो तर तू जरी काही बोलली नाहीस तरी तुझ्या डोळ्यात दिसणारी नाराजी मला बरंच काही सांगून जाते. म्हणूनच मी मनाशी योजलेलं स्वप्न म्हणजे आपल्या घरासमोरील अंगणात एक छोटीशी बाग असेल ज्यामधे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडं आपण लावू म्हणजे त्यांना येणाऱ्या फुलांवर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार असेल. जाईजुई च्या प्रसन्न वेली दूरवर पसरणाऱ्या सुवासाने आल्या गेल्याचं, मित्र मैत्रिणींचं आणि कुणा पांथस्थाचंही स्वागत करतील. तुझी साथ असेल तर माझ्या या स्वप्नाचीही नक्कीच पूर्तता होईल.

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी
वाट पाहशील निज नाथाची
अधीरपणाने घेशी चाहूल

दिवसभर तू घरकामात दंग रहाशील पण संध्याकाळच्या वेळी तुला माझी आठवण येईल. माझ्या स्वागतासाठी नट्टापट्टा करून तू तयार रहाशील पण मला जर यायला उशीर झाला कि मात्र तुझी अस्वस्थता वाढत जाईल. घरातल्या घरात फेऱ्या मारून झाल्यावर तू बागेतल्या झोपाळ्यावर येऊन बसशील आणि हळूवारपणे झोके घेता घेता कानांनी मात्र माझ्या पावलांची चाहूल घेत रहाशील.

चंद्र जसा तू येशील वरती
मी डोळ्यांनी करीन आरती
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवा तो प्रसाद निर्मल

तू अगदी बरोबर ओळखलंस! तुला यायला कितीही उशीर झाला तरी मी आपल्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तुझी वाट पहात रहीन आणि कान तुझ्या पदरवांची चाहूल घेत रहातील. जेंव्हा तू मला दिसशील तेंव्हा प्रसन्न मनाने डोळ्यांची निरांजनं करून मी तुला ओवाळीन. आपण दोघंही मणीमंगळसूत्राच्या पवित्र बंधनात एकमेकांना बांधले गेलो असलो तरी लग्नापूर्वी जसे आपण आतुरतेने भेटत होतो तेव्हढ्याच आतुरतेने या रोजच्या भेटीचा देखील मी नव्याने स्वीकार करीन. आपलं हे स्वप्नातलं घर आता तुझ्या इतकंच मलाही खुणावू लागलंय एवढं मात्र निश्चित !

संगीतकार दत्ता डावजेकर यांनी ‘सुखाची सावली’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं तितक्याच सुंदर संगीताच्या साथीने लता मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात ऐकताना आपलं मनही आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत रहातं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. हिरव्या एकाकी झाडीवरचे घरकुल ,पती पत्नी व दोन पिल्ले आणि पतीची वाट पाहणारी पत्नी कवीकल्पनेप्रमाणे तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहिले.सुरेख चित्रण!

  2. विकास भावे यांचा लेख मनापासून आवडला! अनेक स्मृती जाग्या झाल्या!
    प्रतिभा सराफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं