नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत !
आपण नुकताच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिनाला आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फार महत्वाचं स्थान आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणा-या अनेक वीरांच्या प्रयत्नांना यश मिळून आजच्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला.
यानिमित्ताने आज आपण पहाणार आहोत “छोटा जवान” या चित्रपटातलं स्फूर्ती गीत, ज्याचे शब्द आहेत शब्दप्रभू ग दि माडगूळकर म्हणजेच गदिमा यांचे.

“माणूसकीच्या शत्रूसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू”
माणूस आणि माणूसकी यांचं फार जवळचं नातं आहे. ही माणुसकी जो कोणी विसरेल तो कितीही बलाढ्य असला तरीही तो आमचा शत्रूच असेल आणि या शत्रूला नामोहरम करून नामशेष करण्यासाठी “बचेंगे तो और भी लडेंगे” या न्यायाने आम्ही मायभूमीचे शूर सैनिक लढू तरी किंवा शहीद तरी होऊ.
लढतील सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
माणुसकीची चाड नसलेल्या या शत्रूशी लढण्यासाठी आम्ही तर प्राणांची बाजी लावूच, पण आमच्या सोबत जाज्वल्य देशाभिमान असलेला प्रत्येक नागरिक शत्रूला चारी मुंड्या चीत करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामधे महिला आणि आज विद्यार्थी असले तरी उद्याच्या हिंदुस्थान च्या भूमीचे सैनिकही मागे नाहीत. हा लढा कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी आम्ही जिवाची शर्थ करू, प्राणांची बाजी लावून हे युद्ध जिंकू असा आम्हाला विश्वास आहे.
देश आमुचा शिवरायांचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
या देशाच्या इतिहासानं आम्हाला हेच तर शिकवलं आहे. यवनांच्या अत्याचारांंविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी रणशिंग फुकलं आणि बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक अशा अनेक मावळ्यांनी महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही तर एक स्त्री असूनही तिने ब्रिटीशांविरूध्द उठाव करत “हम भी कुछ कम नही” हे दाखवून दिलं. या शूरवीरांचं रक्त आमच्याही धमन्यांमधून उसळत असताना माणुसकी नसलेल्या या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी आमची जान कुर्बान करून आम्ही विजयश्री खेचून आणू.
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
“जसाश तसे, ठोशास ठोसा” या न्यायाने शस्त्राला शस्त्रानेच उत्तर दिलं जाईल याची शत्रूला आता जाणीव करून दिली जाईल आणि आम्ही तहाची बोलणी तर अजिबात करणार नाही. याऊलट तुम्ही आमचे दोन जवान मारलेत तर आम्ही तुमचे चार जवान मारून आमच्याहून दुप्पट तुमची हानी करू, तुमचं अपरिमित नुकसान करू. आम्ही मेलो तरीही पुन्हा याच पवित्र मातीच्या कुशीत जन्म घेऊन “दे माय धरणी ठाय” अशी शत्रूची दैन्यावस्था करून मगच आम्ही स्वस्थ बसू. हे आमच्या भारत मातेला आम्ही दिलेलं वचन आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी या देशाचे नागरिक या नात्याने आम्ही वचनबद्ध आहोत. तुम्ही जर आमच्या मायभूमीला बळकावू पहात असाल तर एक तसूभरही जमीन तुम्हाला मिळणार नाही हे पक्कं लक्षात ठेवा आणि मगच पुढे या. (गाणं एवढं जुनं असलं तरी या ओळीची सत्यता कारगील विजय मिळवून आपल्या जवानांनी सार्थ करून दाखवली.)
हानी होवो कितीही भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
माणुसकी सोडलेल्या या शत्रूबरोबरचं हे संगर, हे युद्ध सुरू झाल्यानंतर कितीही दिवस चाललं आणि युद्धामध्ये कितीही हानी झाली तरी या शत्रूचा पूर्णपणे बंदोबस्त केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. अगदी पिढ्यानपिढ्या जरी हे युद्ध सुरू राहिलं तरी शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो आणि आमची बाजू सत्याची असल्यामुळे आम्ही यशस्वी होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

महेंद्र कपूर यांच्या जोशपूर्ण आवाजातलं हे गाणं आजही लागलं कि आपलं मन उत्साहानं सळसळतं ही गदीमांच्या शब्दांची त्या शब्दांना तेव्हढंच अप्रतिम संगीत देणारे संगीतकार वसंत देसाई आणि गायक महेंद्र कपूर यांची आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने केलेल्या या गाण्याचं रसग्रहण भारतमातेच्या चरणी रूजू करतो.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
रसग्रहण फार सुंदर केले आहे. मनःपूर्वक आभार ! 🙏
नवनवीन मेजवानीच तुम्ही करत असलेले रसग्रहण म्हणजे.छान.
अप्रतिम रसग्रहण!
मुळात आधी कवीवर्य, गीतकार गदिमांचे ईश्वरी शब्द, त्याला संगीतकार आणि गायक यांची मिळालेली सुरेख साथ. वीर रसाने ओतप्रोत भरलेल्या ह्या गीताचे आपण अतिशय सुंदर रस विवेचन केले आहे. आपले मनापासून आभार 🙏🏻
धन्यवाद गौरी मॅडम🙏
एकेकाळी गाजलेल्या या गाण्याचे आपण फार सुरेख रसग्रहण केले आहे. आपण अशीच ओठावरल्या गाण्यांची रसग्रहणाद्वारे आम्हाला आठवण करुन देता त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद विवेकजी🙏
उत्तम रसग्रहण
धन्यवाद विराग 🙏