Thursday, February 6, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. लावणी हा खरं तर नजरेने पहाण्याचा प्रकार ! पण सुलोचना चव्हाण, आशा भोसले आणि पुष्पा पागधरे या तीन गायिकांच्या आवाजात जेंव्हा रेडिओवर आपण तीच लावणी ऐकतो तेंव्हा त्या लावणीवर अदाकारी करणाऱ्या नटीचा चेहेरा जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो याचं श्रेय गायक आणि संगीतकार यांना जेव्हढं आहे तेव्हढंच ते कविच्या शब्दांना देखील आहे. आज पाहू या कवी संजीव यांनी शब्दबद्ध केलेली एक लावणी जिचे शब्द आहेत –

“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया…. मला आणा राया”

लावणी ऐकायला, लावणी सम्राज्ञीच्या नर्तनाची अदाकारी पहायलाही बरेच जण येत असतात. त्यातले काहीजण खरोखरच रसिक असतात, काही गाण्याचे शौकिन असतात तर काही आंबटशौकीनही असतात. रोज लावणी पहाण्यासाठी हजेरी लावणारं या लावणी सम्राज्ञीचं प्रेमाचं माणूस काही दिवसांसाठी तिच्यापासून दूर जाणार आहे. त्यानं त्याची आठवण म्हणून काहीतरी द्यावं असं तिला मनापासून वाटतं आहे. तिची मागणी काही फार मोठी नाही. “तुम्ही नेहमी वापरता ते उंची अत्तर माझ्यासाठी घेऊन या” इतकी साधी सोपी मागणी तिने केली आहे.

विरहाचे उन बाई
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरती चंदनाची छाया

पावणं, तुमच्या इथे येण्याची मलाही आता सवय झाली आहे. मी जरी गाणं म्हणत नृत्य सादर करायला सुरुवात केली तरीदेखील पाय सवयीने थिरकत असतात, कान तुमच्या येण्याची चाहूल घेत असतात आणि डोळे दरवाजाकडे लागलेले असतात. तुमचं इथे नसणं म्हणजे माझ्यासाठी तुमच्या विरहाचं उन आहे जे बाकी कुणाला दिसत नाही पण मला मात्र त्याचे चटके सहन करावे लागतात. मी जरी तुमच्या गैरहजेरीत गात असले, नृत्य सादर करत असले तरी या तापलेल्या देहामुळे मनाला चटके बसून मन उदास होतं. तुमच्या सहवासात जणू चंदनाची शीतल छाया पसरते आणि पुन्हा मन प्रसन्न होतं.

नाही आग नाही धग
परी होई तगमग
विस्तवाशिवाय पेटे कापराची काया

तुम्ही निघून गेलात कि माझी विरहावस्था कोणाला दिसून येत नाही त्यामुळे नेहमीचे व्यवहार हसत खेळत सुरू ठेवावेच लागतात. कारण इथे दृष्यमान असं काहीच नाही. विरहावस्थेतली आग दिसत नाही कि धग लागत नाही पण मनाची मात्र तगमग होत रहाते. बरं कुणाला सांगायला जावं तर ते माणूस आपली अवस्था समजून न घेता आपल्याला चिडवत रहातं. त्यामुळे आगीशिवाय आणि धगीशिवाय होणारी मनाची तगमग दिवसेंदिवस वाढतच जाते. तगमगीच्या या चकमकीमुळे होणाऱ्या घर्षणातून आग न लागता देखील देहाचा कापूर मात्र जळत रहातो.

सुगंधाने झाले धुंद
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे अशी करा माया

तुम्ही लावलेल्या अत्तराचा सुगंध माझ्या मनाला आणि देहाला अधिकच धुंद करतो आहे, मन सैरभैर होतं आहे. अत्तराच्या सुगंधाची ही धुंदी जसजशी तनामनावर पसरते आहे तसतशी तुमच्या सहवासाची ओढ वाढते आहे. म्हणून तर पावणं, आज तुम्ही माझ्याकडे मुक्काम करा म्हणजे तुमच्या सहवासात माझ्या जीवाची बेचैनी दूर होईल. तुमच्या प्रेमाच्या सावलीत, तुमच्या मायेच्या कुशीत माझं देहभान हरपून जाईल अशी माया आणि प्रेम मला तुमच्या कडून मिळू दे कि तुमच्या मिठीत विरहाचं दु:ख विरघळून जाईल.

भाऊबीज चित्रपटासाठी वसंतकुमार मोहिते यांनी संगीतबद्ध केलेली ही लावणी सुलोचनादीदींवर चित्रित झाली असून आशा भोसले यांच्या आवाजात ती ऐकताना मन त्या सुरांवर तरंगत रहातं आणि लावणी संपली तरी ती आपल्या मनात सुरूच रहाते.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. लावणीचं रसग्रहण हा साहित्यिक दृष्ट्या काहीसा अवघड प्रकार आहे, पण आपण तो यशस्वीरीत्या हाताळला आहे. अभिनंदन !! 👌👌👍💐

  2. ‘ लावणी’ चे रसग्रहण !
    आतापर्यंत ही लावणी ऐकली-बघितली पण यापुढे ऐकतांना
    तुमचे कडव्याचे स्पष्टीकरण आठवेल आणि लावणी ऐकण्याची रंगत वाढेल,इतक छान रसग्रहण.
    खूप खूप छान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी