नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात रेडिओ ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत ! मधुकर जोशी, सुरेश भट, शांता शेळके इतकंच नव्हे तर लेखक आणि विचारवंत म्हणून नावाजलेले लेखक अनंत काणेकर यांनी सुध्दा लिहिलेली गाणी रेडिओ मुळे आपल्याला माहित झाली.
आज पाहू या ठाणे शहराचं भूषण जनकवी पी सावळाराम यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –
“अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले”
आपल्या स्वप्नात रममाण झालेली आणि नुकतंच लग्न झालेली एक युवती स्वप्नातून जागी झाल्यावर ही तक्रार करते आहे. बहुधा तिचं आवडतं माणूस म्हणजेच तिचा प्रिय पती तिला स्वप्नात भेटला असावा. इतक्या दिवसांनी त्याला समोर पाहिल्यावर झालेला आनंद ती लपवू शकत नाही मात्र अचानक जाग आल्यावर तिच्या लक्षात येतं “अरेच्चा, हे तर स्वप्न होतं”. पण स्वप्न असलं तरी तिला असं वाटत रहातं कि आपल्याला जर जाग आली नसती तर निदान स्वप्नात तरी माझ्या अहोंची भेट झाली असती, मला त्यांच्याशी खूप बोलायचं होतं. आमचं लग्न झालं आणि ते सीमेवर निघून गेले. स्वप्नात का होईना मला त्यांच्याशी बोलता आलं असतं पण मधेच डोळे उघडले आणि हे स्वप्न काही पूर्ण झालं नाही त्यामुळे कृतक् कोपाने ती डोळ्यांनाच दटावते आहे की तुम्ही मला जागं केलं त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालंच नाही.
ओळख तुमची सांगून स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले
तुम्हाला काय सांगू ? तुझे काळेभोर डोळे सारखा माझा पाठलाग करत होते आणि त्यांनीच मला इथपर्यंत खेचून आणलं असं काहीतरी ते मला सांगत होते. मग मी ही नाटकीपणाने “कोण हवंय ? मी काही तुम्हाला ओळखत नाही” असं म्हणताच त्यांनी चक्क माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेले.
बोलत बसता वगळून मजला
गुपीत चोरटे ऐकू कशाला
जाण्याचा तो करूनी बहाणा
गुपचुप माझ्या मनात बसले
पण त्यांना आलेलं आईबाबांनी बघितलं आणि आईबाबा आत आल्यावर मग काय स्वारी मधून मधून माझ्याकडे बघत होती पण आईबाबांबरोबर मात्र लंब्याचौड्या गप्पा मारत बसले. मला माहित होतं की ते तर माझ्या साठी, मला भेटण्यासाठी आले होते पण ते म्हणजे स्पष्ट काही न बोलताही माहिती असलेलं गुपीत होतं. ते त्यांच्या तोंडून ऐकण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे स्वप्न जरी अपूर्ण राहिलं तरी माझ्या मनात मात्र त्यांची आठवण सतत पिंगा घालत राहिली.
नीज सुखाची तुम्हा लागली
मंद पाऊली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरांसी नच बोलू दिले
तुम्हाला मस्तपैकी झोप लागली होती तरीही पावलांचा आवाज न करता स्वारी हळूच माझ्या मागे येऊन उभी राहिली. ते माझ्या पाठीमागे येऊन उभे राहिले ते मलाही समजलं. अगदी मांजरीच्या पावलांनी जरी घरात प्रवेश केला असला तरी ते आल्याचं मी ओळखलंय हे माझ्या गालावर पडलेल्या खळीमूळे त्यांच्या लक्षात आलं. मग काय, स्वारी पटकन पुढे झाली, मला बाहुपाशात घट्ट धरून त्यांनी माझे ओठ बंद केले त्यामुळे मला काही बोलायची संधीच मिळाली नाही. मी काही बोलणार तेव्हढ्यात तुम्ही मला जागं केलं पण त्यामुळे माझं हे स्वप्न मात्र अपुरं राहिलं एवढं मात्र निश्चित.
संगीतकार वसंत प्रभू यांचं अगदी माफक संगीत असलेलं हे गाणं आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना ते आपल्याला पुन्हा एकदा रेडिओच्या काळात घेऊन जातं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800