Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आणि सर्वांनाच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

लता मंगेशकर यांनी अक्षरशः असंख्य मराठी गाणी गायली आहेत. गाण्याचा मूड जसा असेल त्याप्रमाणे लतादीदींच्या आवाजातून गाण्याचे भाव प्रगट होतात. मोठं झाल्यावर सुध्दा काही क्षणांसाठी का होईना पण मोठेपणाची झूल उतरवून ज्या गाण्याबरोबर आपण किमान पायांनी ठेका धरतो असं बालकवींनी लिहिलेलं आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याचे शब्द आहेत –

आनंदी आनंद गडे | जिकडे तिकडे चोहीकडे

“आनंदाचे डोही आनंद तरंग” अशी मनाची अवस्था कधीतरी आपल्याला अनुभवायला मिळते. मनाला झालेला हा आनंद मग दाही दिशांना पसरतो, आकाशात विहरतो, फुलाफुलातून डोकावतो, आपल्या डोळ्यात उतरतो आणि शरीरात पसरणाऱ्या शिरशिरीमधून तो पुन्हा एकदा त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत रहातो.

वरती खाली मोद भरे | वायूसंगे परत फिरे
नभात भरला | दिशांत फिरला
जगात उरला | मोद विहरतो चोहीकडे

आकाशातील काळ्या ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यातून हा आनंद वातावरण ढवळून काढतो, नद्यांच्या खळखळाट त्याचं अस्तित्व दर्शवतो, तो वाऱ्याबरोबर विहरतो, झाडाच्या फांद्यांवर झोके घेतो आणि सांगतो की बा मानवा, नीट डोळे उघडून पहा, नंतर डोळे मिटून पहा, सगळ्या जगात या आनंदाचं अस्तित्व “मोद” या दोन शब्दांमधून तुला सातत्याने जाणवत राहील.

सूर्यकिरण सोनेरी हे | कौमुदी ही हसते आहे
फुलली संध्या प्रेमाने | आनंदे गाते गाणे
मेघ रंगले | चित्त दंगले | गान स्फुरले

सकाळपासून मनुष्य व इतर प्राण्यांसाठी रोज हजेरी लावणाऱ्या रवीराजाला झालेला आनंद संध्याकाळच्या ह्या सोनेरी किरणांच्या रूपाने वातावरणात परावर्तित होतो आहे, तर आता काही क्षण का होईना, ज्या वेळेला माणूस कातरवेळ असं संबोधतो, तेव्हढा वेळ तरी या वातावरणावर माझं राज्य असणार आहे असा विचार करणाऱ्या सांज वेळेचा हा आनंद काही वेळातच अंधाराचं राज्य सुरू झाल्यावरही चंद्राच्या चांदण्यातूनही झिरपणार आहे. नेहमी हळूहळू का होईना पण कासवाच्या गतीने पुढे सरकणारे मेघही आज हे दृश्य पहात एकाच ठिकाणी थांबले आहेत, इतकंच नव्हे तर माझ्याही मनात आनंदाच्या उर्मी दाटून येत आहेत आणि छान असं काव्य प्रसवायला लागलं आहे, याला कारण चरचरात भरून राहिलेला आणि हर्ष, मोद ह्या विविध शब्दरूपातून प्रगट होणारा आनंद!

वाहती निर्झर मंदगती | डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे | कोणाला गातात बरे
कमल विकसले | भ्रमर गुंगले | डोलत वदले
जिकडे तिकडे | चोहीकडे | आनंदी आनंद गडे

नदीप्रमाणे संथ गतीने वहाणाऱ्या झऱ्यामधून जे संगीत ऐकू येतं त्याचं नाव आहे ….. आनंद! वाऱ्याची चाहूल लागली की डोलणाऱ्या लतिका, वाऱ्याच्या तालावर आपली पानं हलवताना होणारा सूं s s असा आवाज म्हणजे त्या लतांना आणि वृक्षांना झालेला आनंद!! निरनिराळ्या पक्ष्यांच्या कूजनामधून निर्माण होणाऱ्या संगीताचा आनंद!!! पूर्ण विकसित झालेलं कमळ वाऱ्यावर डोलताना पाहिल्यावर आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव होते ‌…ती म्हणजे आनंद !!!! त्याच कमलदलावर मोहित झालेल्या भ्रमराचा आनंद…..असा विविध ठिकाणी चराचरात भरून राहिलेला हा आनंद, मोद, हर्ष, अशी विविध रूपं घेऊन पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येतो आणि मग अर्थातच ओठातून शब्द येतात “आनंदी आनंद गडे | जिकडे तिकडे चोहीकडे”.

लता मंगेशकर यांच्या आवाजात ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की अजूनही वय विसरून नाचावासं वाटतं एवढं खरं !

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

12 COMMENTS

  1. नव वर्षाच्या आणि मराठी दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
    ओठावरल गाणं ह्या उपक्रमा अंतर्गत निवडलेली कविता खरोखरच आपण बालपणापासून त्याचा आस्वाद घेत आलो आहोत त्यात लतादीदींच्या स्वरात ऐकायला मिळत हा दुग्धशर्करा
    योग.तु केलेलं त्याच विश्लेषण अप्रतिम.असेचकळवत रहा.

  2. गाणं छान निवडलं आहे. आनंद शब्द म्हटला तरी आनंद गगनात मावेनासा होतो. वर्णन खूपच छान केले आहे. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं