नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आत्माराम रावजी म्हणजेच आ रा देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी लिहिलेलं एक विरह गीत ज्याचे शब्द आहेत –
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जागता
आपल्या प्रियकराची वाट पहाता पहाता तिचे डोळे पेंगुळले आहेत आणि पापण्यांच्या काठावर उभी असलेली झोप डोळ्यांच्या डोहात उडी घेऊ पहाते आहे. “मी माझं काम झालं की लगेच परत येतो” असं गोड शब्दांत आश्वासन देऊन, तिच्यापासून दूर गेलेला प्रियकर तिच्यापासून दूर जाऊनही, सहा महिन्यांच्या वर काळ उलटला तरी अजूनही परत आलेला नाही. रोज सकाळी दारात उभं राहून वाट पहायची, दुपारी समुद्रावर जाऊन लांबवर नजर टाकून आपल्या दिशेला एखादं मोठं जहाज येताय का पहायचं, निराश झालेल्या मनाची निराशा झटकून, नव्या उमेदीने आशेचा हात घट्ट पकडून ठेवायचा असाच काहीसा तिचा दिनक्रम गेले काही महिने सुरू होता.
सुकला रे कंठ माझा तुज आळविता
तुज आळविता रे नाम तुझे जपता
असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर उचकी लागली तर कोण आठवण काढतंय असा विचार त्या व्यक्तीच्या मनात येतो. तुला उचकी लागत असेल कि नाही या बाबतीत मला तरी अलिकडे शंका येऊ लागली आहे. पण तुला खरं सांगू का कुणा मैत्रिणींपैकी कुणी नुसतं तुझं नाव काढायचा अवकाश की माझा घसा दुखेपर्यंत मी तुझी स्तुती करत रहाते, तुझं गुणगान करत रहाते. इतकं की शेवटी माझ्या मैत्रिणी कंटाळतात, मग मलाही उगाच असं काहीतरी वाटत रहातं मी जर तुझ्या ऐवजी परमेश्वराचं नामस्मरण केलं असतं तर तो नक्कीच प्रसन्न झाला असता.
आटले रे अश्रू माझे वाहता वाहता
वाहता वाहता रे आठवणी काढता
तुझी मी किती वेळा आठवण काढली असेल म्हणून सांगू? माझ्या मनात तर तुझ्या आठवणी सतत जाग्या असतात. पण एखादा वाढदिवस समारंभ असला तर मला एकटीला पाहून कुणीतरी खवचटपणे “काय, अजून एकटीच रहातेस का?” असं विचारतात तर कुणी कुणी प्रेमाने तुझी आठवण काढतात, तुझी चौकशी करतात. घरामध्ये तर सणासुदीच्या दिवसात सगळ्यांनाच हमखास तुझी आठवण येते. त्यामुळे तुझा विरह सहन न होऊन माझ्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध अडवणं मला मुष्किल होऊन जात असे, पण एवढ्या दिवसांनंतर हे अश्रू मात्र आटले आहेत आणि तुझी वाट पहाणं हा फक्त या मनाला लागलेला चाळा आहे, आता त्यामध्ये पूर्वीची असोशी राहिलेली नाही.
शिणला रे जीव माझा तुजविण राहता
तुजविण राहता रे तुज नच भेटता
रोज सकाळ, संध्याकाळ, रात्र तुझी वाट पहाणं आणि तुझ्या आठवणींना उजाळा देणं, लोकांच्या चांभार चौकशांना उत्तरं देणं या सगळ्यावरचा उतारा खरं म्हणजे तू आता इकडे येणं हाच आहे. एवढे दिवस तू आज ना उद्या परत येशील या आशेवर राहून आता या जीवालाही शीण आला आहे. खरंतर आशा चिवट असते असं म्हणतात. पण हे वरवरचं हसणं आणि अंतर्यामी झुरणं याचा आता मला शीण येऊ लागला आहे आणि “तू परत कधी येणार? कि येणारच नाहीस?” असे प्रश्न हल्ली या थकल्या जीवाला आणि तुझी वाट पाहून कंटाळलेल्या मनाला वारंवार पडतायत ज्याचं उत्तर मात्र तुझ्याकडेच आहे.
या कवितेतील तरूणीच्या मनाची अवस्था आणि अस्वस्थता संगीतकार यशवंत देव यांनी तर अचूक जाणली आहेच पण गायिका उषा मंगेशकर यांनीही आपल्या आर्त आवाजातून ती रसिकांपर्यंत यशस्वीपणे पोचवली आहे यात शंका नाही.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
अतिशय भावपूर्ण रसग्रहण!!!!यथार्थ वर्णन
खूप यथार्थ रसग्रहण,खूप आवडले
आपण अनेक जुन्या आठवणी जागवल्यात विकास भावे सर!
थकले रे डोळे माझे हे गाणं वाट पाहण्यातील आर्तता दर्शविते. त्याचे रसग्रहण यथार्थ केले असून उचकी लागली तर आठवण काढली हेही किती छान वर्णन केले आहे.
सुंदर!
हे गाणं विस्मरणा गेले होते.तुमच्या भावपूर्ण रसग्रहणाने पुन्हा गुणगुणायला लागले. छान रसग्रहण.
छान
सर खूप छान लिहिले आहे
सुंदर रसग्रहण