Thursday, September 18, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"

“ओठावरलं गाणं”

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत.‌ तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. परमेश्वरा, तुझ्या कृपेने सारं काही व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना केली रे केली की काही जणांचं आयुष्य असं काही यू टर्न घेतं की गझल सम्राट सुरेश भट यांच्या शब्दांत म्हणावसं वाटतं –

“सूर मागू तुला मी कसा | जीवना तू तसा मी असा

तरीही काही काही लोक खूप म्हणजे खूपच बिनधास्त असतात. आयुष्य जसं फिरवेल तसं फिरायचं, चेहेऱ्यावर कोणतंही दडपण दाखवायचं नाही, उलट आयुष्याला म्हणायचं अरे वेड्या मला ठाऊक आहे तुझ्याकडे मी जर सौख्याचा, आनंदाचा, खूषीचा सूर मागितला, तर तो सूर मला कदापि मिळणार नाही. कारण मला वेडंवाकडं चालवायचं, कुठेतरी भरकटवायचं हेच तर तुझं अंतिम ध्येय आहे. त्यापेक्षा तुझ्याकडून काही अपेक्षा न करणं हेच जास्त चांगलं. मी तुझ्याकडुन राजमहालाची अपेक्षा करायची आणि तू मला एखाद्या झोपडीपुढे नेऊन उभं करणार. मी सरळ वाटेने चालायला सुरुवात केली की तू माझी पावलं मुद्दामच वाकड्या वाटेकडे नेणार.

कधीतरी मी तुझ्यावर वैतागून “एकदा तरी माझ्या मनासारखा वाग” असं मी तुला म्हणेन असं जर तुला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही. तू मला पाडायचा जरी प्रयत्न केलास तरी मी पडणार नाही. एकमेकांशी न पटणारे नवरा बायको आयुष्यभर एकत्र रहातातच ना ? मग तू तर माझंच आयुष्य आहेस. मला हवं ते तू मला देणार नाहीस आणि तुला हवं तसं मी कधी वागणार नाही कारण आपण दोघेही एकाच पंथातले आणि तो पंथ म्हणजे “हम नहीं सुधरेंगे !” पंथ

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकास न्याहाळीले
खेळलो खेळ झाला तसा

बालपण सरलं आणि आपली एकमेकांशी खऱ्या अर्थाने जान पहेचान झाली. सुरूवातीला मला असं वाटायचं की तूच माझा खरा दोस्त आहेस. मित्रा प्रत्येक गोष्ट मी समरसून केली, स्वतःला सिद्ध करण्याच्या दृष्टीने केली कारण मला जर यशा मिळालं असतं तर तुझाही उदोउदो झाला असता……! पण काही दिवसांनी माझ्या लक्षात यायला लागलं, माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास असला तरी माझ्या मनासारखी एकही गोष्ट तू घडू दिली नाहीस. दोन तीनदा असं घडल्यानंतर मग मात्र मी तुला अगदी जवळून न्याहाळलं आणि माझ्या लक्षात आलं की जेंव्हा जेंव्हा यश माझ्या नजरेच्या टप्प्यात येतंय असं मला दिसतं तेंव्हा तेंव्हा तू असा काही गुगली टाकतोस की मला धडपडायला व्हावं.

पण मित्रा (अजूनही मी तुला माझा मित्र मानतो), एक लक्षात घे तू टाकलेला गुगली मी आव्हान समजून जमेल तसा खेळलो. तुझ्यापुढे हार मानून मी विकेट फेकली नाही तर जमेल तसा प्रत्येक चेंडू मी खेळत आलो. भले चौकार आणि षटकार नसेल (तो मला द्यायचा नाही हे तूच ठरवलं होतं) पण न डगमगता मला जसा तुझा खेळ खेळता आला तसा मी तो खेळलो एवढं नक्की.

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
दु:ख माझे तुझा आरसा

तू मात्र कधीच माझ्या मनासारखं वागला नाहीस की मी तुला मित्र मानत आलो तरी मित्रप्रेमही दाखवलं नाहीस. स्वतः ची मनमानी मात्र कायम चालवलीस. प्रत्येक वेळी हाताशी आलेलं सुख, यश, आनंद हे केवळ तुझ्या हट्टीपणामुळे माझ्या हातातून निसटून गेलं आहे.‌ माझ्याशी इतका संलग्न राहून देखील कुठल्या तरी जन्मातला सूड घेत असल्यासारखा तू कायम माझ्याशी वैर घेत आलास.

माझ्या मनासारखं घडणार, घडणार असं वाटत असतानाच तू माझ्या मनासारखं न वागता माझ्या पदरात अपयश, अपमान, दु:ख टाकून मोकळा झालास. आता तुला स्वतःला तोच आरसा प्रिय होता त्याला मी तरी काय करणार? पण मित्रा….. या आरशात तू पहात असताना मी ही तुझ्या पाठी होतोच… तू इतके वेळा अपयश, दु:ख या नकारघंटा वाजवूनही माझ्या चेहेऱ्यावर दिसणारं हसू कधीच मावळलं नाही ही वस्तुस्थिती मात्र तुझ्या कधीच लक्षात आली नाही.

सदैव बेसूर सुरात गाणाऱ्या माझ्या आयुष्या, आता मला सांग, सुख, समाधानाचा जो सूर तुला माहितीच नाही तो मी तुझ्याकडे कसा मागू ? माझ्या आयुष्या, माझ्याकडे बघून तुला सरळमार्गी, सुखी आणि समाधानी समजणाऱ्यांना तुझी ही तिरकी चाल ठाऊकच नाही आणि त्यांना ती कळणार देखील नाही कारण “ये अंदर का मामला है”. मी देखील निष्कारण तुला बदनाम कशाला करू ना याचं कारण मला माहिती आहे आणि तुलाही ….. बरोबर …. “जीवना, तू तसा (तर) मी असा” तेरी भी चूप….मेरी भी चूप !!

गझल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेलं हे अर्थपूर्ण गाणं ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अरूण दाते यांच्या सुरेल आवाजात ऐकताना मनोमन पटतही जातं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. 🌹अतिशय सुंदर शब्दात आपण वर्णन केले
    🌹

    अभिनंदन श्री विकास भावे साहेब

    अशोक बी साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  2. अप्रतिम रसग्रहण. विकासजी तुमचं रसग्रहण नेहमी सुंदर असतं
    👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा