Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं"( ३९ )

“ओठावरलं गाणं”( ३९ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रेडिओवर बबनराव नावडीकर, जी एन जोशी, गोविंद पोवळे या गायकांप्रमाणेच दशरथ पुजारी आणि वसंत आजगावकर या दोन गायकांनी ही खूप छान छान गाणी देऊन आमचे कान आणि मन दोन्हीही तृप्त केले आहेत. आज पाहू या ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांनी लिहिलेलं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –

जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती
कळे न त्यांना मरण उद्याचे भाळी या अंती

“सारे प्रवासी घडीचे”
ही गोष्ट माणूस जीवन जगताना पूर्णपणे विसरून जातो. त्यामुळे परदु:ख हे नेहमीच शीतल वाटतं कारण त्याचे चटके आपल्याला बसत नाहीत. उद्या आपल्यालाही त्याच दु:खाच्या आणि संकटांच्या बोगद्यातून प्रवास करायचा आहे, आत्ताच्या परिस्थितीत दुसऱ्याला सोसावे लागणारे चटके उद्या आपल्याला सुध्दा सहन करावे लागणार आहेत, नव्हे आपलंही संचित तेच आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. आपणही एक दिवस भरडले जाणार आहोत, नव्हे तोच आपलाही भोग आहे आणि तो भोगावा लागणारच आहे आणि तेच जीवनाचं अंतिम सत्य आहे हे माणसानं कधीच विसरू नये.

भविष्य कळते काय कुणाला
फूल आजचे धूळ उद्याला
निर्मात्याला कधी घेतसे कोणी का हाती

उद्याच्या पोटात काय दडलंय, एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे का दु:खद, माझ्यावर संकट येणार आहे का जगावर, मॉर्निंग खरोखरच गुड असेल का, की उद्याचा सूर्य मला पहायलाच मिळणार नाही यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तरीही आणि आज उमललेलं फूल उद्याचं निर्माल्य आहे तसेच आपणही एक दिवस याच मातीत मिसळून जाणार आहोत हे विसरून माणूस उन्मत्तपणाने वागत रहातो. पण माणसानं कितीही विज्ञानाचे नवनवीन शोध लावले आणि कितीही प्रगती केली तरीही या सृष्टीच्या निर्मात्यापुढे तो फक्त एक शून्य आहे. विज्ञानाच्या मदतीने देखील उद्या काय घडणार आहे हे तो जाणू शकत नाही आणि म्हणूनच त्या अद्वितीय शक्तीसमोर विनम्र होणं हेच शहाणपणाचं प्रतीक आहे.

जन्म घेऊनी मृत्यू येतो
मृत्यूसंगे जीव जन्मतो
युगायुगांचे चक्र सारखे फिरते हे भवती

जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाला आज ना उद्या मृत्यूला सामोरं जावं लागणारच आहे. जन्म हे सुखाला आमंत्रण आहे, तर मृत्यू हे दु:खाला निमंत्रण आहे. सुख दुःखाचा हा झूला जन्म आणि मृत्यू या दोन दोऱ्यांवर झुलत असतो. जन्मानंतर वयाची एकेक पायरी चढत चढत मृत्यूकडे आपली वाटचाल सुरू असते. “बाबूमोशाय, जिंदगी और मौत ये दोनों उपरवाले के हाथ में है” ह्या आनंद सिनेमा मधील वाक्याची इथे आठवण होते. हेच सत्य कविवर्य मधुकर जोशी यांनी कितीतरी आधी आपल्याला या गाण्यातून सांगितलं आहे. ऋतू मागून ऋतू, दिवसामागून रात्र हे निसर्ग चक्र जसं शतकानुशतके नव्हे तर युगानुयुगे चालू आहे त्याचप्रमाणे जन्म मृत्यूचं हे चक्र देखील ईश्वरी शक्तीच्या आदेशानुसार सुरू आहे ‌….. मर्त्य मानवाची त्यापासून सुटका नाही.

का दुसऱ्याला उगा हसावे
तेच आपुल्या नशिबी यावे
चुकेल का कधी जे लिहिलेले कर्माने अंती

काही लोकांना दुसऱ्यांच्या परिस्थिती वर सतत चेष्टा करावीशी वाटत असते. परिस्थिती बदलू शकते ही गोष्ट अशा वेळेस या लोकांच्या लक्षातच येत नाही. उद्याच्या झोळीत आपल्यासाठी कोणतं दान पडणार आहे ही गोष्ट ते सांगू शकत नाहीत, तरीही सर्व काही माझ्या हातात आहे अशा प्रकारे ते या माणसांशी वागत असतात. पण अशा लोकांचं ही दैव जेंव्हा बदलतं तेंव्हा त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. कारण आपल्या दैवाला बांधलेली कर्माची फळं आणि त्याचे भोगावे लागणारे परिणाम याविषयी आपण अगोदर काहीच भाष्य करू शकत नाही. भविष्य उज्ज्वल आहे असं ज्योतिषाने जरी सांगितलं तरीही आपल्या गतजन्मीच्या कर्माच्या फळांचे या जन्मात काय परिणाम भोगावे लागणार आहेत ते आपल्याला ठाऊक नसताना आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर, व्यंगावर हसू नये, टीका करू नये. कारण कर्माची कडू गोड फळं तर सर्वांनाच चाखायची आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. आम्ही सारेच जन्मापासून मृत्यूपर्यंत जाणाऱ्या या जीवन नौकेचे प्रवासी आहोत. उद्या आपल्या नशिबात देखील तेच भोग कशावरून लिहिलेले नसतील ही गोष्ट नेहमीच आपण लक्षात ठेवावी.

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक दशरथ पुजारी यांनी संगीत देऊन आपल्या मुलायम आवाजात हे अर्थपूर्ण भावगीत आपल्या ह्रदयापर्यंत पोचवलं आहे.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. 🌹खूप छान कविता 🌹
    सुंदर वर्णन केलं आपण

    🌹धन्यवाद श्री. विकास भावे सर 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

  2. रसग्रहण खूपच छान. सुपातले दाणे आणि आपले जीवन याचा सुरेख संगम या गाण्यातून उलगडून दाखवला आहे.
    मरणाचे स्मरण असावे.आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणारच आहेत. पण असं कोणालाही वाटत नाही.
    सर्व जण स्वतःला अमर समजूनच जणू जगत असतात.
    जीवनात सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. मृत्यु ही त्याला अपवाद नाही. गाण्यातला सार लेखकाने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केल आहे
    कर्माचा अटळ सिद्धान्त कोणालाही चुकलेला नाही हेच खरं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं