Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं....

ओठावरलं गाणं….

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात गाण्यांवर प्रेम करणा-या सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत !

राखी पौर्णिमा ! बहिणभावाच्या नि:सीम प्रेमाचा हा दिवस नुकताच आपण साजरा केला. आज आपण जे गाणं पहाणार आहोत त्या गाण्याचे शब्द आहेत –
धागा जुळला जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला

गाण्यातल्या या मुलीला ब-याच वर्षांनी तिचा भाऊराया भेटलेला आहे. आनंदाचं झाड तिच्या तनामनावर फुलून आलं आणि तो आनंद व्यक्त करताना ती म्हणते आहे किती महिने, किती वर्ष भाऊराया मी तुझी वाट पाहिली. आज खरोखरच आपल्या बहिण भावाच्या प्रेमाची जीत झाली आणि अनपेक्षितपणे आज आपली भेट झाली. हा प्रेमाचा धागा आता असा काही जुळला आहे कि “या वेड्या बहिणीचं भावावरचं प्रेम आज जिंकलं आणि मला माझा भाऊ भेटला” असं सा-या जगाला ओरडून सांगावसं वाटतंय.

ओढ लागे तुला कोटराची
भेट दोन्ही पिलापाखराची
दैव लिला खरी भाग्य आले घरी
अमृताने जणू देह न्हाला

आपल्या घराविषयीची ओढ तुझ्या हृदयात सतत वास करत असणार याची मला जाणीव आहे. असा एकही दिवस गेला नाही माझा कि मला तुझी आठवण झाली नाही. आज मात्र तुझ्या रूपाने जणू काही माझं भाग्य उजळून निघालंय. ही दैवाची लीला खरोखरच अगाध म्हणावी लागेल. देहावर फुलणारे हर्ष रोमांच सौख्याचं अमृत चांदणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यय मला देतायत.

मायाममतेची जुळतील नाती
राखी बांधीन रे आज हाती
उभी राहीन मी वाट पाहीन मी
दृष्ट लागेल या सोहळ्याला

आजची राखी पौर्णिमा ही माझ्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. इतके दिवस प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबीजेला आकाशातल्या चंद्राला भाऊ म्हणून मी ओवाळत असे आणि जिथे कुठे तू असशील तिथे माझ्या भावाला सुखात ठेव असं मागणं या चंद्राजवळ मागत असे. पण आज अचानक आपली भेट झाली आणि तुझ्या हाताला राखी बांधायची माझी ईच्छा आज पूर्ण होईल. आजचा हा राखी पौर्णिमेचा सोहळा ख-या अर्थाने दृष्ट लागण्यासारखा होणार आहे तरीही तुझ्या येण्याची मी नक्की वाट पाहिन.

देवदूतापरी आज येई
रक्षणाला उभा पाठी राही
स्वप्न साकारले भाव झंकारले
मोल येईल या जीवनाला

भाऊराया आज तू माझ्यासाठी देवदूत बनून ये आणि एक सांगू का इतके दिवस मी स्वप्न पहात होते कि तू सदैव माझ्या पाठीशी उभा आहेस पण आज मात्र मी हक्काने सा-या जगाला ओरडून सांगू शकते कि “होय. आज माझा भाऊ माझ्या रक्षणासाठी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे”. इतके दिवस मला माझं जीवन नीरस वाटत होतं, पण आज तू माझ्या जीवनात आलास आणि जगण्याचे सगळे संदर्भच बदलून गेले. आटलेला ओहोळ बनलेलं हे जीवन आज तुझ्या बंधूप्रेमाचा खळाळता झरा झालंय.

धाकटी बहीण” चित्रपटातल्या, जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला, उल्हसित संगीतसाज चढवला आहे, बाबूजी म्हणजे अर्थातच सुधीर फडके यांनी आणि नायिकेला झालेला आनंद, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात पुरेपूर उतरला आहे.
धन्यवाद 🙏

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. भावे,तुमच्या साहित्य विषयक लिखाणात तुमचा अभ्यास आणि चिंतन अगदी स्पष्ट दिसते. तरीही ते लिखाण नेहमीच अर्थवाही,रसाळ,आणि वाचनीय असते.
    पुस्तक परीक्षण,आणि काव्यात्मक रसग्रहण दोन्हीही लेखन नेहमीच मला आवडते.

  2. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याची वीण खूप सुंदरपणे उलगडून दाखवली आहे.गाण्याचे रसग्रहण खूप छान केले आहे.

  3. भावाबहिणीचे अतुट नाते आणि त्या नात्याचे सर्व धागे उलगडून आपल्या या रसग्रहणांत दाखवले गेलेत.खूप छान.

  4. भाऊ व बहीण यांच्या नात्यातील ओढ या गीतात उत्तम रित्या वर्णीली आहे. आपण केलेल्या रसग्रहणामध्ये ते सुरेख उलगडून सांगितले आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या व ओठावर रेंगाळणाऱ्या अनेक गाण्यांपैकी हे एक गाणं. हे सदर चालू करून विकास भावे व देवेंद्र भुजबळ यांनी जुन्या गाजलेल्या गाण्यांना उजाळा द्यायचा स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल त्यांना धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments