Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात मराठी गाण्यांवर प्रेम करणा-या सर्व रसिकांचं मन:पूर्वक स्वागत !

प्रत्येकाच्या आयुष्यात आणि मनातही आपल्या आईवडिलांविषयी आदरभाव असतो, अभिमान असतो, प्रेम असतं. शिस्त आणि प्रेम, माया, ममता या दोन चाकांवर आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालावी यासाठी आई-वडील कष्ट घेतात, प्रसंगी त्यागाचं महत्त्व शिकवतात.

मराठी गाण्यांमधे “आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला” हे आईबाबांचं महत्व सांगणारं गाणं असू दे, “आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी” किंवा “आई तुझी आठवण येते” हे गाणं असू दे नाहीतर “ए आई, मला पावसात जाऊ दे” हे लाडीक हट्ट करणारं गाणं असू दे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ही गाणी आईवडिलांच्या छत्रछायेप्रमाणेच आपली साथ करत असतात.

आईचं महत्त्व विशद करणारं असंच एक गाणं आज आपण पहाणार आहोत. या गाण्याचे शब्द आहेत शब्दप्रभू ग दि माडगूळकर यांचे.

गदिमा

“आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही” “वैशाख वणवा” चित्रपटात असलेल्या या गाण्याचं धृवपद आहे

“आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ इ

आईवडिलांना गुरू म्हणून आपण सगळेच मान देतो, देवाला नमस्कार केल्यानंतर आई-वडिलांना नमस्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो. गदिमा मात्र धृवपदातील पहिल्याच ओळीत म्हणतात की आई ही गुरू तर असतेच पण त्याच बरोबर हे असं दैवत आहे कि, जगाच्या पाठीवर शोधूनही असं दैवत सापडणार नाही. खरंतर “आई” हा शब्द लिहायला सोपा आहे पण या दैवतानं मात्र आपला हात धरून आपल्याला पहिला शब्द “श्री” कसा लिहायचा ते शिकवलं.

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

आपल्या जन्मापासून नि:स्वार्थ भावनेने ती आपल्या आजारपणात आणि सुखदुःखाच्या अनेक प्रसंगी आपल्याबरोबर असते. काही दुखलं खुपलं तरी आणि मुलांनी यश मिळवलं तरीही प्रथम आईच्या डोळ्यात दु:खाश्रू आणि आनंदाश्रू येतात. आईवर कितीही प्रेम असलं तरी आईनं केलेली सेवा, आईनं आपल्यासाठी वेळोवेळी केलेला त्याग असू दे, मार्गदर्शन असू दे किंवा योग्य सल्ला असू दे आईनं केलेल्या सेवेचा हवा तसा आदर केला जात नाही. किंबहुना आईला त्या साठी गृहीत धरलं जातं. माडगूळकर म्हणतात आईनं आपल्यासाठी केलेल्या या त्यागाचं मोल हे अनमोल आहे आणि हे जाणून प्रत्येकानं परमेश्वराला नमस्कार केल्यानंतर आईच्या चरणी नतमस्तक व्हायला हवं.

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

आईचं प्रेम, आईची माया, आईचा त्याग हे सर्व अनुभवायला मिळावं म्हणून भगवंताने कौसल्येच्या पोटी जन्म घेतला आणि एकवचनी, एकपत्नी श्रीरामाच्या अवतार धारण करून आईचं प्रेम मिळवलं, इतकंच नव्हे तर “आई, मला खेळायला चंद्र हवा” असा बालहट्ट पुरवून घेतला. श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला पण यशोदेकडून आपले सर्व लाड पुरवून घेतले आणि दोन स्त्रियांकडून मातृसुखाचा अनुभव घेतला. राम-कृष्ण हे खरंतर भगवंताचे अवतार पण मातृसुख मिळवण्यासाठी देवानंही लहान होणं पसंत केलं. मोगलांची राजवट उलथवून मराठ्यांचं महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांवर केलेल्या संस्कारांतून महाराजांनी मराठ्यांचं राज्य निर्माण केलं. अशी ही मातृपदाची थोरवी आहे.

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष ठरून तियेचा होई उतराई

मुलावर निस्वार्थीपणे संस्कार करणा-या आईची माया, प्रेम, ममता, त्याग हे सारं न फेडता येणारं ऋण आहे. या साऱ्याचं ऋण मान्य करून आईनं लहानपणापासून केलेल्या संस्कारातून तू आपल्या देशाचा चांगला नागरिक हो, दुसऱ्याचं दु:ख हे स्वतः चं समजून कोणासाठी तरी त्याग करावास आणि निरपेक्षपणे, निस्वार्थीपणाने समाजासाठी काही काम केलंस तर तुझ्या आईच्या चेहे-यावर जे समाधान दिसेल आणि काही अंशी तरी तिने तुझ्यावर केलेल्या संस्कारांतून तू आईचा उतराई होशील.

दत्ता डावजेकर

दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं सुमन कल्याणपूर,

यांच्या मधुर आवाजात ऐकताना प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येत असेल एव्हढं नक्की !

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. व्वा… व्वा… विकासजी… खूपच सुंदर!
    …. आईसारखे दैवत ….
    व गदिमांसारखे तिची महती वर्णन करून लिहिणारे कवी …
    सुमनताईंचा गोड आवाज….फारच सुंदर!!…
    आपण केलेले रसग्रहण तर अतिशय सुंदर!!!….

  2. खूपच छान रसग्रहण!
    आईच्या मायेची, प्रेमाची महती सांगणारी ही गदिमांनी सुरेख लिहलेली रचना आणि त्यावर तुम्ही लिहलेले , केलेले विश्लेषण सुंदर!
    👌👌💐💐💐

  3. माझं हे गाणं अतिशय आवडतं, रसग्रहण वाचतांना आई तर आठवतेच पण डोळेही भरुन येतात. आपण यात दिलेली उदाहरणे, आईचे दैवत, गुरू म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात असलेले स्थान अवर्णनीय. खूपच छान.

  4. कवी श्रेष्ठ ग.दी.माडगुळरांचे अतिशय हृदयस्पर्शी
    गीत आणि काळजाला हात घालणारे सहज व ओघवते आपले रसग्रहण विकासदादा..वाचतांना मन भरून आले.आपली लेखनशैली उत्तरोत्तर बहरत राहू दे..ही ईश्वरचरणी प्रार्थना!

  5. आईचे महत्व विशद करून सांगणारी अनेक गाण्यांपैकी हे एक अजरामर गाणं. या गाण्याचे रसग्रहण आपण वेगवेगळ्या उदाहरणांसह पटवून दिले आहे. वैशाख वणवा या चित्रपटातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४