नमस्कार 🙏
कालच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९३ वा वाढदिवस साजरा झाला. तसं पाहिलं तर आपली सकाळ लतादीदींच्या स्वरातल्या गाण्यानेच सुरू होते आणि उत्साह वाढवणारी, मन प्रसन्न करणारी गाणी लतादीदींच्या स्वरात ऐकली कि आपलाही दिवस अर्थातच चांगला मूड घेऊन सुरू होतो. त्यानिमित्ताने कालही रेडिओवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशीच छान छान गाणी लागली होती.
लतादीदींची अशी असंख्य गाणी वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला कधी अंतर्मुख करतात तर कधी त्या आवाजातून येणाऱ्या आनंदलहरी आपलाही आनंद द्विगुणित करतात.
“ओठावरलं गाणं” या सदरात रेडिओवर प्रेम करणा-या सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत. “कोरोना” च्या झंझावातामधुन हळूहळू आपल्या सर्वांचाच मूड पूर्वपदावर येऊ पहातो आहे. आज पाहू या आपला मूड आणखी आनंदी करणारं अर्थात त्र्यंबक बापुजी ठोंबरे म्हणजेच बालकवींचं एक आनंदी गीत ज्याची सुरुवात याच शब्दाने होते –
“आनंदी आनंद गडे | जिकडे तिकडे चोहीकडे”
“मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” ही उक्ती कधीकधी भोवतालच्या परिसरावर पसरलेल्या वातावरणातून साधली जाते. सकाळी खिडकीतून घरात येणारी सूर्याची सोनेरी किरणं आपल्याला अंथरूण सोडायला भाग पाडतात. आपण बाहेर येऊन पाहिल्यावर आपल्या नजरेला पडतं निरभ्र, स्वच्छ आकाश, वा-याने बागेतल्या झाडांची हलणारी पानं आणि त्यावर डोलणारी गुलाब पुष्पं ! हे दृष्य पाहिल्यावर बालकवींची ही कविता हलकेच आपल्या मनात रुंजी घालत आपल्या ओठांवर येते.

वरती खाली मोद भरे वायुसंगे मोद फिरे
नभात भरला दिशांत फिरला
जगात उरला
मोद विहरतो चोहिकडे
आनंद या शब्दाचा अर्थ तितक्याच ताकदीने सांगणारा प्रतीशब्द म्हणजे मोद ! आनंद या शब्दातून वहात येणारा अर्थ जसाच्या तसा हा शब्द आपल्या मनापर्यंत पोचवतो. वा-यावर स्वार होऊन कधी आकाशात, कधी आपल्या भोवतालच्या परिसरातून आपल्या सर्वांगाला आणि मनाला स्पर्शून जाणारा हा आनंद दाहिदिशांतून एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावताना बालकवींच्या नजरेला दिसतो आहे.
सूर्यकिरण सोनेरी हे कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे
मेघ रंगले चित्त दंगले
गान स्फुरले
न दिसणाऱ्या तरीही तनामनाला जाणावणा-या या आनंदाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या भोवतालच्या परिसरावर चैतन्याचा पिसारा फुलवला आहे. या आनंदासोबत येणाऱ्या प्रसन्नतेने मनाची मरगळ तर दूर झालीच आहे पण सूर्यकिरणातून झिरपणा-या या आनंदाचा परीणाम येणारी संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतर रात्री पसरणारा चांदण्यांचा प्रकाश यांच्यावरही झाला आहे. आकाशात विहार करताना ढग शांतपणे हे दृष्य अवलोकन करतायत आणि या ढगांच्या पाठीवर बसून ही आनंदाची सैर करणा-या माझ्या मनात शब्दरूपाने या आनंदाचं वर्णन करणारी काव्य शृंखला तयार होते आहे.
वाहती निर्झर मंदगती डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे कोणाला गातात बरे
कमल विकसले भ्रमर गु़ंगले
डोलत वदले
बारकाईने केलेल्या आजुबाजूच्या निरीक्षणातून माझ्या लक्षात येतंय ते म्हणजे मंदगतीने वाहणाऱ्या निर्झरातून आनंद पोहतो आहे तर कधी वा-याच्या पाठीवर बसून, लतावेलींवर झोके घेत, झाडावरून उड्या मारत तो दशदिशा भारून टाकतोय. पक्ष्यांच्या कुजनातून, वा-यावर डोलणा-या कमळामधुन आणि त्याभोवती फिरणा-या भ्रमरांच्या गुंजनातूनही हे आनंदाचं गाणंच माझ्या कानावर येतं आहे.
पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं लता मंगेशकर यांच्या हर्षोत्फुल्लं आवाजात ऐकताना प्रत्येकाला ते गावंसं वाटतं हेच बालकवींच्या शब्दांचं यश, लता मंगेशकर यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य आणि संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताची खासियत आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
बालकवींचे काव्य, हृदयनाथ मंगेशकर यांच संगीत व लतादीदींचा आवाज यामुळे हे गाणं अजरामर झालं . आपण केलेले ह्या गाण्याचे रसग्रहण फारच सुरेख झाले आहे.
धन्यवाद विवेकजी 🙏