ही गोष्ट आहे २०१९ सालची. माझा मित्र सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर राजेश मांडे याचा एक दिवस फोन आला, म्हणाला ओशोचे ऑन द स्पॉट पेंटिंग करायचे आहे. तू करताना ते शूट होईल. तुला केवळ दहा मिनिटे आहेत. त्या काळात तुला तीन फूट बाय चार फुटाचे पेंटिंग ओशो आश्रमात करायचे आहे. जमेल का तुला ? जमेल का म्हणजे काय,अरे सहज जमेल !
जमेल का ? या शब्दाने मला खडबडून जागं केलं. दीड दिवस उरला होता. मग ओशो च्या चित्राचा विचार करायला लागलो. तिथे रेफरंस घेवून काढणे शक्यच नव्हते. मग काय मेमरी ? होय मेमरीने करावं लागेल. मनात पक्के झाले. मी मनन करू लागलो. नीट ओशो चा चेहरा न्याहाळणे सुरू झाले.डोक्यात आता तो चेहरा पक्का होत चालला होता. शूट होणार म्हणजे चुकीला माफी नाही. शेवटी तो कॅमेराच !
घरून जायचा दिवस ठरला. माझा रियाझ पक्का झाला होता. तीन बाय चार चार कॅनव्हास ठाण्यातून विकत घेतला आणि राजेश ची गाडी लोणावळ्याच्या दिशेने धावू लागली. तासाभरात मळवली स्टेशन आले.
स्टेशनच्या जवळपास हा आश्रम होता. शूट सकाळी ११चे होते. गेल्या गेल्या मला डार्क ब्राऊन कलर ची कफनी घालायला लावली. गळ्यात ओशो यांची माळ. कॅमेरा सेट झाला होता.मी जाण्या अगोदर तिथे ओशो प्रेमी तरुण मंडळी जमली होती. काही वयस्कर सुद्धा होते. सर्वांनी ब्रावून कलरच्या कफनी परिधान केल्या होत्या. वातावरण ओशोमय झाले होते. माझ्या डोक्यात मात्र ओशो पूर्ण घोळत होते. चित्र कंपोज कसं करायचं हा घोळ होताच.पोर्ट्रेट डोक्यात फिट होतं फक्त वेळेवर आपण काय करतो याची मलाच उत्सुकता होती.
आश्रमात सर्वत्र मस्त हिरवी गार झाडी होती, राजेश ने एक स्पॉट निवडला. गेल्यागेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी कॅमेरा लाईट आणि माझा कॅनव्हास सेट करून ठेवला होता. शेवटी ते प्रोफेशनल म्हटल्यावर परफेक्ट होणार होते. मी सोडून सर्वच कमर्शियल तत्वावर आले होते. मला आपले काम करण्याची खुमखुमी होती. कॅमेरा लागला. मी कॅनव्हास जवळ येवून माझे कलर वगैरे सेट केले. पेंटिंग बघणारे राजेशने जमा केले होते.त्याचे शूट होऊन त्याची फिल्म बनणार होती, राजेश ने ग्रीन सिग्नल दिला.मी रंग ,ब्रश घेवून सज्ज झालो. राजेश ने पुन्हा एकदा विचारले, ओशो दिखना मंगता है. मेरे इज्जत का सवाल हैं. मी हसण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो. “राम जाने” म्हणून मी ब्रश हातात घेतला. राजेशने कॅमेरे स्टार्ट केले. वेळ सेट केला. बघणारे बघायला सज्ज झालेत आणि मी कॅनव्हास वर रंग रेषांचा खेळ खेळू लागलो. अवघ्या पाच मिनिटात ओशो कॅनव्हास वर दिसू लागले. बघणारे टाळ्या वाजवू लागले. “बिना देखे ओशो निकाले”, असे कौतुक होऊ लागले. माझी भीती आता पूर्णपणे संपली होती, ओशो नाही दिसले तर ? हा मनाचा कोपरा भीतीने काळवंडला होता. आता तो लक्ख झाला होता. रंग काम सुरू केले. राजेश ने दिल्या वेळेत काम पुढे सरकत गेले आणि झपाझप ओशो आकार घेवु लागले. काही मिनिटात चित्र पूर्ण झाले. सही ठोकली आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. चित्र पूर्ण झालं होतं.

मला गराडा टाकून सर्व जण एकच प्रश्न विचारीत होते,तो म्हणजे, “बिना देखे आपने इतना बडा पेंटिंग किया कैसे ?” मी काय उत्तर देणार, राजेशने विचारले होते की, जमेल ना…? पण ईश्वरी कृपेने जमले होते. आव्हान आणि संधी दोन्ही होते. बाकी दोन दिवस आश्रमात सॉलिड धमाल केली. ध्यान, नृत्य, व्याख्यान आणि रात्री संगीत असा वेळ मस्त गेला.
मी एकोणीस वर्षांचा झाल्यापासून ओशो वाचत आलोय. ते कॅनव्हास वर उतरलं होत. चिंतन, मनन कामी आलं होतं. हे पेंटिंग आश्रमाच्या मुख्य भिंतीवर लावल्या गेलं. कधी पुन्हा आश्रमात गेलो की मलाच ते पोर्ट्रेट बघायला आवडेल. बाकी त्या फिल्मचे पुढे काय झाले ते अद्याप मात्र कळले नाही !

— लेखन : विजयराज बोधनकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800